अध्याय ९ वा
आता " योग्यासूत्रीय " नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१॥२॥
विद्यार्थी अध्ययन करुन शास्त्रात पूर्ण पारंगत झाला असला तरी त्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे क्रिया हातून करता आली पाहिजे . ह्यासाठी त्याच्याकडून नित्य क्रिया यथायोग्य करुन घ्यावी . स्नेहन - स्वेदनादि कर्मे व छेदनादि शस्त्राकर्मे प्रत्यक्ष कशी करावी हे त्याला शिकवावे . तो बहुश्रुतपणाने शास्त्रात कितीही प्रवीण झाला असला तरी त्याच्या हातून क्रिया चोखपणाने जर होत गेली नसेल तर प्रत्यक्ष क्रिया करण्याच्या प्रसंगी तो निरुपयोगी होतो ॥३॥
शस्त्रक्रियेचा प्रत्यक्ष अभ्यास हातून घडविण्याकरिता कोहाळा , भोपळा , कलंगडे , तवसे , वाळूक , खरबूज इत्यादि मोठमोठ्या फळांवर शस्त्राचे प्रयोग करुन कापण्याची निरनिराळ्या पद्धतीची कामे कशी करावी हे प्रथम दाखवावे व उभेआडवे कसे कापावे हेही शिकवावे .
नंतर पखाल , बस्ति , जनावराचे मूत्राशय ( मृत जनावराचे काढून ठेवलेले ) व कातड्याच्या पिशव्या , बुधले वगैरे पाण्याने कालविलेल्या चिखलाने भरुन त्याचवर भेदन ( फाडणे ) कर्म प्रथम शिकवावे . केसासह असलेले कातडे घेऊन ते पसरुन त्याजवर लेख्यकर्म शिकवावे , मृत पशूंच्या शिरा व कमळाचे देठ ह्यावर वेध्य म्हणजे छिद्र पाडण्याचे काम शिकवावे . किड्याने पोखरलेले लांकूड वेळू , देवनळ , कमळाचे देठ ( किंवा वेली ) व वाळलेले भोपळे ह्यांच्या छिद्रांतून एषणी घालून एष्यकर्म ( नाडीव्रणाची गती पहाणे , पू - वगैरेचा मार्ग शोधणे हे काम ) शिकवावे . फणस , तोंडलीची फळे व बेलफळे ह्यांतील बिया व मेलेल्या पशूंचे दात ह्याजवर आहार्य कर्म शिकवावे . सांवरीच्या लाकडाच्या फळीवर मेणाचा जाडी लेप करुन त्यावर स्त्रावकर्म . ( पाणी काढणे वगैरे काम ) शिकवावे . पातळ किंवा जाड कापड आणि मऊ कातडे ह्यांच्या किनारीवर ( कडावर ) शिवण्याचे काम शिकवावे . मनुष्याचा पुतळा करुन त्याच्या निरनिराळ्या अवयवाचे ठिकाणी जखमांवर पट्ट्या बांधण्याचे शिकवावे . मऊ कातडे , मांसपेशी व देठ ह्यांचेवर कानाचा सांधा कसा बांधावा हे शिकवावे . मऊ अशा मांसाच्या तुकड्यावर अग्निकर्म ( डाग देणे ) व क्षारकर्म ही कामे शिकवावी . पाण्याने भरलेल्या घागरीला बाजूस पाझरण्याकरिता छिद्र राखून त्यात किंवा कडू भोपळ्याच्या देठाचे ठिकाणी छिद्र पाडून त्यात ( व इतरत्र ) नेत्रावरील क्रिया कशी करावी , बस्तीची वगैरे नळी कशी घालावी ( नळीने पाणी कसे काढून घ्यावे ), उत्तरबस्ति , शोधनबस्ति कसा द्यावा , पिचकारीने व्रण कसा धुवून काढावा वगैरे कामे शिकवावी ॥४॥
हे जे वर प्रत्यक्ष क्रियेचा अभ्यास करवून घेण्याविषयी पदार्थ सांगितले आहेत ते किंवा तसेच दुसरे प्राणी किंवा वस्तू घेऊन त्याजवर जो बुद्धिवान वैद्य प्रत्यक्ष क्रियेचा नित्य अभ्यास करितो तो प्रत्यक्ष काम करावयाचे वेळी घाबरत नाही .
ह्यासाठी ज्याला शस्त्रचिकित्सा , क्षारकर्म व अग्निकर्म ( डाग देणे ) ह्या कामांत पूर्ण निष्णात व्हावयाचे आहे , त्याने ज्या कर्मात ज्या पदार्थाचे साधर्म्य दिसेल म्हणजे शरीराचे निरनिराळ्या अवयवाशी ज्यांचे साम्य असेल ते ते पदार्थ संग्रह करुन त्याजवर नित्य त्या त्या कर्माचा अभ्यास चालू ठेवावा . नंतर प्रत्यक्ष रुग्णावर क्रिया करावयाचा अभ्यास करावा ॥५॥६॥
अध्याय नववा समाप्त .