अध्याय ८ वा
आता " शस्त्रावचारणीय " अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरीनी सांगितले आहे तसे सांगतो ॥१॥२॥
शस्त्र
३ ) शस्त्रे वीस प्रकारची आहेत ती अशी -
१ . मंडलाग्र - हे सहा अंगुळे लांब असते . ह्याचे मुख्य प्रकार दोन आहेत . एकाचे अग्र ( पान ) वर्तुळाकृति असते व एक वस्तर्याच्या आकाराचे असते . ही शस्त्रे लेखन व छेदन कर्मात उपयोगी पडतात .
२ . करपत्र - हे बारा अंगुळे लांब व दोन अंगुळे रुंद असून त्याला करवतासारखे दाते असतात . ह्याची धार तीक्ष्ण असते . हे अस्थिछेदनाचे उपयोगी पडते .
३ . वृद्धिपत्र - वृद्धिपत्राचे दोन प्रकार आहेत . दोन्हीचीही लांबी सात अंगुळे असते . एकाचे अग्र पाठीकडून किंचित वर्तुळाकार असते व दुसर्याचे सरळ असते . ही छेदन - भेदन कर्मात उपयोगी पडतात . सरळ पानाचे वर उंच वाढलेल्या व्रणाच्या सुजेला व दुसरे नाडीव्रणाला उपयोगी पडते .
४ . नखशस्त्र - ह्याचे पान दोन अंगुळे लांब व एक अंगुळ रुंद असते . ( असे टीकेत आहे पण त्याचा योग्य खुलासा नाही . नखशस्त्र हे छेदनाकरिता आठ अंगुळे लांब व तोंडाला अर्धांगुळ रुंद असून धार तीक्ष्ण असते , असे भोजाचे मत आहे . )
५ . मुद्रिका - हे आंगठीप्रमाणे तर्जनीच्या शेवटच्या पेर्यात घालून उपयोगात आणितात . ह्याचे स्वरुप पुढे सांगितले आहे .
६ . उत्पलपत्र - ह्याचा आकार कमळाच्या पाकळीसारखा असतो . धार तीक्ष्ण असते व हे सहा अंगुळे लांब असते . ह्याचे पाते तीन अंगुळे लांब व एक अंगुळ रुंद असावे .
७ . अर्धधार - हे आठ अंगुळे लांब असून ह्याची रुंदी फळाच्या बाजूस दोन अंगुळे असते . " अध्यर्धधार " असेही म्हणतात . हे वरील उत्पलपत्र ही छेदन व भेदन कर्मात उपयोगी आहेत .
८ . सूची - सुया तीन , दोन व दीड अंगुळ लांबीच्या असून त्यात काही धनुष्याप्रमाणे वाकड्या असतात . ह्याचे वर्णन पुढे सांगितले आहे .
९ . कुशपत्र - हे दर्भाच्या पानाच्या आकाराचे असते . ह्याचे पाते दोन अंगुळे लांबीचे असते .
१० . आटीमुख - चोचीच्या आकाराचे हे शस्त्र आंगठ्याइतके लांब असते . हे स्त्राव करण्याच्या कामी उपयोगी असते .
११ . शरारिमुख - शरारि नावाचा एक पक्षी आहे , त्याची मान पांढरी असते व चोच लांब असते . त्याच्या चोचीसारखे हे शस्त्र असते , म्हणून ह्याला शरारिमुख म्हणतात . व्यवहारात त्याला कातरी म्हणतात . ही बारा अंगुळे लांब असून हिची पाती हालणारी असतात .
१२ . अंतर्मुख - हे आठ अंगुळे लांब असून टोकाला अर्धचंद्रासारखे अथवा चंद्रकोरीसारखे वक्र असते . ह्याची धार आतील बाजूस असते . हे शस्त्रही कातरीप्रमाणेच आहे .
१३ . त्रिकूर्चक - ह्या शस्त्राला अंतर्मुख अशी तीन तीन अंगुळे लांबीची तीन पाती असतात व प्रत्येक पात्यामध्ये तांदुळाच्या दाण्याइतके अंतर असते . ह्याचा मागचा धरावयाचा भाग पाच अंगुळे असून त्याला सुशोभित मूठ असावी .
१४ . कुठारिका - हिचा दांडा साडेसात अंगुळे असून धारेची बाजू गाईच्या दातासारखी पसरट असते .
१५ . व्रीहिमुख - ह्याचे अग्र साळीच्या भाताच्या दाण्यासारखे असते . हे सहा अंगुळे लांब असते . त्याची मूठ दोन अंगुळे व पाते चार अंगुळे लांब असते .
१६ . आरा - चांभाराच्या आरीसारखेच हे शस्त्र असते . हे दहा अंगुळे लांब असून पाते तिळप्रमाणे असते .
१८ . बडीश - ह्याची लांबी सहा अंगुळे असावी . एक टोक मासे धरण्याच्या गळाप्रमाणे बरेचसे वाकलेले आणि दुसरे किंचित वाकलेले ह्याची मूठ साडेपाच अंगुळे असावी .
१९ . दंतशंकु - ह्याची लांबी सहा अंगुळे असून अग्र शंकूप्रमाणे असावे . ते अर्धांगुळ रुंद व चौकोनी असून त्याला तीक्ष्ण धार असावी . ह्याने दंतशर्करा वगैरे काढितात .
२० . एषणी - हे शस्त्र गंडुपदाकृति असून एका टोकास तीक्ष्ण धार असते . हिचे टोक काट्यासारखे तीक्ष्ण असते . हिच्या सहाय्याने व्रणशोथ फोडून त्याचा आतील भाग तपासणे ॥३॥
शस्त्रांची अष्टविध कर्मे व योजना
१ ह्या शस्त्रापैकी मंडलाग्र व करपत्र ही यंत्रे कापणे व लेखन ( खरवडणे , तासणे ) ह्या कामी घेतात . २ वृद्धिपत्र , नखशास्त्र , मुद्रिका , उत्पलपत्र व अर्धधार ही शस्त्रे कापणे व चिरणे ह्या कामात उपयोगात येतात . ३ सूची , कुशपत्र , आटीमुख , शरारिमुख , अंतर्मुख व त्रिकूर्चक ह्यांच्या उपयोग व्रणातील पू , रक्त व जलोदरातील पाणी काढणे ह्या कामी होतो . ४ कुठरिका , व्रीहिमुख , आरा व वेतसपत्र व सूची ही शस्त्रे वेधकर्मात म्हणजे छेद पाडण्याचे कामी उपयोगी असतात . ५ बडीश व दंतकुश ही शस्त्रे शल्य व दातांच्या कपर्या वगैरे काढण्याच्या उपयोगी असतात . एषणी हे व्रणाची गती कशी आहे ते पहाण्यास व आतील पू , रक्त वगैरे दोषांना मार्ग करुन बाहेर काढण्याच्या कामी उपयोगी असते . सुया ( सूच्या ) ह्या शिवण्याच्या कामी उपयोगी पडतात .
आता ही शस्त्रे शस्त्रक्रिया करतांना त्या त्या कर्मानुसार कशी घ्यावी हे संक्षेपाने सांगतो .
त्यापैकी वृद्धिपत्र हे त्याची मूठ व पाते ह्यांच्या साधारणतः मध्यभागी धरावे . व ह्याचप्रमाणे चिरफाड करण्याची सर्व शस्त्रे धरावी .
वृद्धिपत्र व मंडलाग्र ही शस्त्रे लेखनकर्मात ( घासून काढण्याच्या किंवा तासून काढण्याच्या कामात ) बहुतेक उंच हाताने चालवावे .
सूची वगैरे पू , रक्त किंवा जलोदरातील पाणी वगैरे वहावयास लावणारी शस्त्रे मुठीच्या अग्रभागी धरावी . लहान मूल , वृद्ध पुरुष , नाजूक मनुष्य , भित्रा , स्त्रिया , राजे व राजकुमार ह्यांचे व्रण वगैरे विस्त्रावण करणे ( पू वगैरे काढणे ) असल्यास विशेषतः त्रिकूर्च शस्त्राने करावे .
व्रीहिमुखशस्त्र धरावयाचे ते त्याची मूठ तळहाताने झाकेल अशा बेताने आंगठा व तर्जनी ह्यांनी धरावे .
कुठारिकाशस्त्र डाव्या हाताने दांडा व उजव्या हाताचा आंगठा व मधले बोट ह्यामध्ये धरुन चालवावे .
आरा , करपत्र व एषणी ही शस्त्रे मुठीच्या मुळाशी धरावी .
बाकीची शस्त्रे जशी सोईस्कर वाटतील तशी धरावी .
ह्या शस्त्रांच्या आकृति त्यांच्या नावानुसार सांगितल्यासारख्याच आहेत .
ह्या शस्त्रांपैकी नखशास्त्र , व एषणी ही आठ अंगुळे सूची पुढे सांगावयाच्या आहेत . मुद्रिका ही तर्जनीच्या शेवटच्या पेर्याएवढी शरारीमुखी म्हणजे कातरी ही दहा अंगुळे आणि बाकीची शस्त्रे सहा अंगुळे लांब असतात ॥४॥७॥
ती सहज धरता येण्यासारखी उत्तम शुद्ध लोखंडाची केलेली , उत्तम धारेची , दिसण्यांत सुंदर व सुबक , ज्यांची तोंडे व अग्रे योग्य प्रमाणांत आहेत अशी , व ज्यांना खिडी वगैरे नाहीत अशी असावी . हे शस्त्राचे उत्तम गुण आहेत .
ह्या उलट म्हणजे - वाकडे , बोथट , अर्धवट तुटलेले किंवा खिंडी पडलेले , खरखरीत धारेचे , अति मोठे , अति लहान , अति लांब , अति आखूड हे आठ शस्त्राचे दोष आहेत . म्हणून ह्याच्या उलट गुण ज्यामध्ये आहेत म्हणजे ह्यातील एकही दोष नाही अशी करपत्र वगळून अन्य शस्त्रे घ्यावी . कारण अस्थि छेदनाकरिता वापरण्याचे शस्त्र खरखरीत धारेचेच असावे लागते .
ह्या शस्त्राच्या धारेचे प्रमाण भेदनकर्मात ( फाडण्याचे कामात ) वृद्धिपत्र वगैरे जी शस्त्रे घ्यावयाचीए त्यांची धार - मसुरेच्या डाळीच्या कडेइतकी पातळ असावी . लेखनकर्मात वापरावयाची मंडलाग्रादी जी शस्त्रे त्यांची धार मसुरेच्या डाळीच्या कडाच्या निम्मी असावी . छेदनकर्मात ( कापण्याच्या कामी ) जी शस्त्रे घ्यावयाची त्यांची धार अर्धकेश केसही कापला जाईल इतक्या प्रमाणाची असावी .
बडीश व शंकु ह्यांची टोके वाकलेली असावी . एषणी काट्याप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेली एक , सातूच्या मोडाला प्रथम येणारे जे पान त्या पानाच्या आकाराचे तोंड असलेली दुसरी आणि गंडुपदाकारमुखी तिसरी .
शस्त्रांना पाजणी देण्याचे तीन प्रकार आहेत . एक क्षाराचीम दुसरी पाण्याची व तिसरी तेलाची . त्यापैकी क्षाराची पाजणी दिलेल्या शस्त्राचा उपयोग बाणादिकांचे शल्य काढणे व अस्थिछेदनकर्मात होतो . पाण्याची पाजणी दिलेल्या शस्त्राचा उपयोग मांस कापून काढणे , भेदन करणे व फाडणे ह्या कर्मात होतो आणि तेलाची पाजणी दिलेल्या शस्त्राचा उपयोग शीर तोडणे व स्नायु कापणे ह्या कामात होतो .
शस्त्रांना धार लावण्याकरिता उडदाप्रमाणे काळ्या रंगाच्या कुरुंदाची गुळगुळीत अशी शिळा ( निपणा ) असावी व धार कायम राखण्याकरिता शेवरीच्या लाकडाच्या फळीच्या तुकड्याची योजना करावी ॥८॥१३॥
प्रत्येक महत्त्वाचे शस्त्र केस निघतील इतकी तीक्ष्ण धार असलेले व सुव्यवस्थित ( चर्मकोशात किंवा लोकरीच्या जाड कोशात ) ठेविलेले व प्रमाणशीर पद्धतीने हातात चांगले धरता येणारे असे असेल तरच ते उपयोगात आणावे ॥१४॥
अनुशस्त्रे
शस्त्रासारखे उपयोगी पडणारे ( किंवा शस्त्रकर्मात उपयोगी पडणारे ) पदार्थ - पोकळ कळक , स्फटिकमणी , काच , कुरुंदाचा दगड , जळवा , अग्नि , क्षार ( अनेक प्रकारचे ), नखे ( वाघाची वगैरे ). पाथरी ( किंवा सोहाडा ), निर्गुडी , सागवान ह्यांची पाने , कळकाचे कोंब , केस व बोटे हे पदार्थ शस्त्रकर्मात उपयोगी आहेत ॥१५॥
अनुशस्त्रांचा उपयोग
लहान मुले व ज्यांना शस्त्राची भीती वाटते असे लोक , ह्यांच्या ठिकाणी शस्त्रकर्म करावयाचे असता पोकळवेळु , स्फटिकमणि , काच व कुरुंद ( ह्यांच्या केलेल्या शस्त्राची ) ह्यांची योजना करावी . याच्या सहाय्याने छेदन भेदनकर्म करावे . शल्य काढणे , कापणे व फाडणे ह्या कर्मात निर्विष वाघनखे किंवा नखशस्त्राने काम होणे शक्य असल्यास त्याची योजना करावी . क्षारकर्म , अग्निकर्म , व जळवा लावणे ह्यांची माहिती पुढे सांगितली आहे त्याप्रमाणे करावे . तोंडाचे व डोळ्याच्या पापण्यांचे जे रोग विस्त्रावण करण्यासारखे असतील ते सोहाड्याची पाने खरवतीची ( शेफालिका ) किंवा सागाची पाने ह्यांच्या सहाय्याने , विस्त्रावण करावे . व्रणाच्या शोधनाचे कामी एषणीयंत्र ह्यांच्या सहाय्याने , विस्त्रावण करावे . व्रणाच्या शोधनाचे कामी एषणीयंत्र किंवा शस्त्र नसेल तर घोड्याचे वगैरे केस , हाताची बोटं किंवा कळकाचे वगैरे कोंब ह्यांच्या सहाय्याने ते काम करावे .
ही शस्त्रे करावयाची ती बुद्धिमान वैद्याने आपल्या कामात कुशल असणारा व कसलेही काम आले तरी युक्तीने करणारा असा जो लोहार असेल त्याच्याकडून शुद्ध पोलादाची करवून घ्यावीत ॥१६॥१९॥
शस्त्रे कशी चालवावी ह्यासंबंधाने जो शस्त्रवैद्य पूर्ण माहितगार असतो त्याला शस्त्रक्रियेत नेहमी यश प्राप्त होते . म्हणून शस्त्रवैद्याने शस्त्रक्रिया करण्याचा नित्य अभ्यास ठेवावा ॥२०॥
अध्याय आठवा समाप्त