मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अन्नपानविधि ७

सूत्रस्थान - अन्नपानविधि ७

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


सुवर्णादि धातु वर्ग

सोने हे मधुर , हृद्य (मनाला प्रिय ), पौष्टिक , रसायन (शरीरातील सर्व धातूंना नवेपणा आणणारे ), त्रिदोषनाशक , थंड , डोळ्य़ांना हितकारक व विषनाशक आहे . रुपे आंबट , सारक , थंड , स्निग्ध आणि पित्त -वातनाशक आहे . ताम्र हे तुरट , मधुर लेखन , थंड व सारक आहे . कासे किंचित् कडु , लेखन , डोळ्य़ांना हितकारक व कफवातनाशक आहे . लोह (लोखंड ) वातकारक थंड आणि तहान , पित्त व कफनाशक आहे . कथील व शिसे हे तिखट , कृमिनाशक , किंचित् खारट व लेखन आहे .

मोती , पोवळे , हिरा , इंद्रनीळ , वैडूर्य (लसण्या ) व स्फटिक इत्यादि रत्ने डोळ्यांना हितकारक , थंड , लेखन , विषनाशक , पवित्र , अंगावर धारण करण्यास योग्य आणि पाप , दारिद्र व मळनाशक आहेत ॥३२६ -३३०॥

धान्ये , अनेक प्रकारचे मासं , नानाविध फळे व नानातऱ्हेच्या भाज्या अशा प्रकारे द्रव्यसमुदाय पुष्कळच आहे . त्यामुळे ह्या शास्त्रात ज्यांचे गुण सांगितले नाहीत अशा एखाद्या द्रव्याचे गुण जाणण्याची जरूर पडल्यास , ते त्या पदार्थाच्या रुचीवरून व त्याच्या ठिकाणी असणार्‍या पंचमहाभूतांच्या गुणधर्मावरून चतुर वैद्याने सूक्ष्म विचाराने त्यांचे गुणधर्म सांगावे .

साठे तांदुळ , सातु , गहुं , तामसाळ , मुग , तुरी व मसुरा ही धान्ये सर्व धान्यांत श्रेष्ठ आहेत .

लावा , तित्तिरपक्षी , काळा व पांढरा हरीण , तांबडा हरीण , एण (काळा हरीण ), कर्पिजल (गौरतित्तिर ), मोर , वर्मि (रोहीमासा ) व कासव ह्यांचे मांस सर्व प्रकारच्या मांसात श्रेष्ठ आहे .

डाळिंब , आंवळा , द्राक्षे , खारीक , फालशाची फळे , रांजणीचे फळ व महाळुंग ही फळे सर्व प्रकारच्या फळांत श्रेष्ठ आहेत .

विष्णुक्रांता , चंदनबटवा (अथवा चाकवत ), चिचु (चंचुशाक ), चिलघोळ , कोवळा मुळा , ब्राह्मी व जीवंति ह्या भाज्या सर्व शाकवर्गामध्ये श्रेष्ठ आहेत .

सर्व प्रकारच्या दुधात व तुपात गाईचे दूध व तूप श्रेष्ठ आहे .

सर्व लवणामध्ये (मिठाच्या जातीत ) सैंधव श्रेष्ठ आहे . आम्लवर्गात आवळा व आंबट डाळिंब ही फळे श्रेष्ठ आहेत सर्व तिखट पदार्थात पिंपळी व सुंठ श्रेष्ठ आहे . सर्व कडु पदार्थात कडु पडवळ व डोरली वांगे श्रेष्ठ आहे . सर्व मधुर पदार्थात तूप व मध श्रेष्ठ आहे . सर्व तुरट पदार्थात सुपारी व फालशाचे फळ श्रेष्ठ आहे . उसाच्या सर्व पदार्थात साखर श्रेष्ठ आहे . सर्व पेय पदार्थात मधुर (गोड ) आसवे (मद्ये ) श्रेष्ठ आहेत . (द्राक्षासव किंवा मार्दिक मद्य श्रेष्ठ आहे .)

एक वर्षाचे जुने धान्य खाण्यास उत्तम . फळामध्ये पिकलेले , फळ खाण्यात चांगले आणि न वाळलेली चांगल्या जोमाची व अगदी ताजी तोडून आणलेली अशी भाजी खाण्यासस फार उत्तम समजावी ॥३३१ -३३९॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP