Dictionaries | References

अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी

   
Script: Devanagari

अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी     

एखाद्याचा लहानसा गुन्हा, किंवा लहानशी चोरी पचली किंवा त्याच्याकडे डोळेझांक केली म्हणजे साहजिकच त्याची मोठमोठे गुन्हे व चोर्‍या करण्याकडे प्रवृत्ति होते. एका मुलानें एके दिवशीं एक पेरु चोरुन आणला व आईजवळ दिला. आईनें त्यास शिक्षा करण्याऐवजीं शाबासकी देऊन ,तो पेरु खावयास दिला. पुढें तो मुलगा मोठमोठ्या चोर्‍या करुं लागला. अखेरीस एका मोठ्या दरोड्यांत तो सांपडून त्यास फांशीची शिक्षा झाली. फांसावर जाण्यापूर्वीं त्यानें आपणांस एक वेळ आईस भेटावयाचें आहे अशी इच्छा प्रदर्शित केली. तेव्हां त्याच्या आईस त्याचेजवळ आणण्यांत आलें. त्यावेळीं त्यानें आईच्या गळ्यास मिठी मारुन तिला भेटतांना तिच्या गालाचा कडकडून चावा घेतला. तेव्हां सर्व लोक त्याला फार दूषण देऊं लागले कीं, पहा हो ! हा मरणाच्या वेळींहि आईस दुःख देत आहे ! तेव्हां त्यानें सर्व लोकांस ओरडून आपली हकीगत सांगितली व म्हटलें कीं, पहिल्यानें मीं ज्यावेळीं पेरु चोरुन आणला त्यावेळीं जर मला आईनें शिक्षा केली असती तर मजवर हा प्रसंग आला नसता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP