मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|
चिरंजीवपद

श्रीएकनाथ महाराज - चिरंजीवपद

’ चिरंजीवपद ’ म्हणजे श्रीनाथांच्या सर्व शिकवणुकीचे सूत्ररूपाने वर्णिलेले सार होय. अक्षय्य असे चिरंजीवपद प्राप्त करण्याची ज्याला प्रबळ इच्छा असेल त्यासाठी हे थोडक्यात मार्गदर्शन आहे.

चिरंजीवपद पावावयासी । आन उपाय नाहीं साधकांसी । किंचित् बोलों निश्चयासी । कळावयासी साधकां ॥१॥

येथे मुख्य पाहिजे अनुताप । त्या अनुतापाचें कैसे रुप । नित्य मृत्यु लागला समीप । न मानी अल्प देहसुख ॥२॥

म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो मीं विषयस्वार्थी लाविला । थिता परमार्थ हातींचा गेला । करी वहिला विचार हा ॥३॥

ऐसा अनुताप लाहतां । तंव वैराग्य ये तयाच्या हातां । त्या वैराग्याची कथा । ऐक आतां सांगेन ॥४॥

तें वैराग्य बहुतांपरी । आहे गा हें अवधारी । सात्त्विक राजस तामस त्रिप्रकारीं । योगीश्वरी बोलिजे ॥५॥

नाही वेदविधिविचार । नेणें सत्कर्म साचार । कर्मधर्मी भ्रष्टाकार । तो अपवित्र तामस ॥६॥

त्याग केला पूज्यतेकारणें । सत्संग सोडूनि पूजा घेणें । शिष्यममता धरुनि राहणें । ते जाणणें राजस ॥७॥

वैराग्य राजस तामस । तें न मानेंच संतांस । तेणें न भेटे कृष्णपरेश । अनर्थास मूळ तें ॥८॥

आतां वैराग्य शुद्धसात्त्विक । जें मी जगद्वंद्य मानी यदुनायक । तें तूं सविस्तर ऐक । मनीं निष्टंक बैसावया ॥९॥

भोगेच्छाविषयक । तें तों सांडी सकळिक । प्रारब्धें प्राप्त होतां देख । तेथोनि निष्टंक अंग काढी ॥१०॥

कां जे विषय पांच आहेती । ते अवश्य साधकां नाडिती । म्हणोनि लागो नेदी प्रीति । कवणे रीति ऐक पां ॥११॥

जेणें धरिला शुद्ध परमार्थ । त्यासि जनमान हा करी अनर्थ । तेणें वाढे विषयस्वार्थ । ऐक नेमस्त विचार हा ॥१२॥

वैराग्य पुरुष देखोनी । त्याची स्तुती करिती जनीं । एक सन्मानें करुनी । पूजे लागोनी पैं नेती ॥१३॥

त्याचें वैराग्य कोमल कंटक । नेट न धरीच निष्टंक । देखोनि मानस्तुति अलोलिक । भुलला देख पैं तेथें ॥१४॥

जनस्तुति लागे मधुर । ह्नणती उद्धरावया हा हरीचा अवतार । आह्मांलागीं जाहला स्थिर । तेणें घरी फार शब्दगोडी ॥१५॥

हा पांच विषयांमाजीं प्रथम । शब्दविषय संभ्रम । स्पर्शविषय सुगम । उपक्रम तो ऐसा ॥१६॥

नाना मृदु आसनें घालिती । विचित्र पर्यंक निद्रे प्रति । नरनारी शुश्रुषा करिती । तेणें धरी प्रीति स्पर्शगोडी ॥१७॥

रुपविषय कैसा गोंवी । वस्त्रें भूषणें देती बरवीं । तेणें सौदर्य करी जीवीं । देहभावी श्लाध्यता ॥१८॥

रुपविषय ऐसा जडला । रसविषय कैसा झोंबला । जें जें आवडे तें तें याला । गोड गोड अर्पिती ॥१९॥

ते रस गोडीकरितां । घडी न विसंबे धरी ममता । मग गंध विषय ओढितां । होय तत्त्वतां त्या कैसा ॥२०॥

आवडे सुमनचंदन । बुका केशरविलेपन । ऐसे पांचहि विषय जाण । जडले संपूर्ण सन्मानें ॥२१॥

मग जे जे जन वंदिती । तेचि त्याची निंदा करिती । परि अनुताप नुपजे चित्तीं । ममता निश्चिति पूजकांची ॥२२॥

म्हणाल विवेकी जो आहे । त्यासी जनमान करील काये । हें बोलणें मूर्खाचें आहे । जया चाड आहे मानाची ॥२३॥

ज्ञात्यासि प्रारब्धगति । मान झाला तरी नेघो म्हणती । परि तेथेंची गुंतोनि न राहाती । उदास होती तात्काल ॥२४॥

या परी साधकाच्या चित्ता । मान गोडी न संडे सर्वथा । जरी कृपा उपजेल भगवंता । तरी होय मागुता विरक्त ॥२५॥

तो विरक्त कैसा म्हणाल । जो मानलें सांडी स्थळ । सत्संगी राहे निश्चळ । न करी तळमळ मानाची ॥२६॥

मांडीना स्वतंत्र फड । आंगा येईल अहंता वाढ । न धरी जीविकेची चाड । न बोले गोड मनधरणी ॥२७॥

नावडे प्रपंचीं बैसणें । नावडे कोणांशीं बोलणें । नावडे योग्यता मिरविणें । बरवें खाणें नावडे ॥२८॥

नावडे लौकिक परवडी । नावडती लुगडी लेणी । नावडे परान्नगोडी । द्रव्यजोडी नावडे ॥२९॥

नावडे स्त्रियांत बैसणें । नावडे स्त्रियांचें रगडणें । नावडे स्त्रियांतें पाहणें । त्यांचें बोलणे ॥३०॥

नको नको स्त्रियांचा सांगत । नको नको स्त्रियांचा एकांत । नको नको स्त्रियांचा परमार्थ । करिती आघात पुरुषासी ॥३१॥

म्हणाल गृहस्थ साधकें । स्त्रियां सोडून जावें कें । येच अर्थी उत्तर निकें । ऐक आतां सांगेन ॥३२॥

तरी स्वस्त्रीवांचोनि । नातळावी अन्यकामिनी । कोणे स्त्रियां सन्निध वाणी । आश्रयो झणीं न द्यावा ॥३३॥

स्वस्त्रीसहि कार्यापुरतें । पाचारावें स्पर्शावें निरुतें । परी आसक्त होऊनिया तेथें । सर्वथा चित्तें नसावें ॥३४॥

नरनारी शुश्रुषा करिती । भक्ति ममता उपजविती । परी शुद्ध जो परमार्थी । तो स्त्रियांचे संगती न बैसे ॥३५॥

अखंड एकांतीं बैसणें । प्रमदासंगें न राहाणें । जो निःसंग निरभिमानें । त्याचे बैसणें सर्वदा ॥३६॥

कुटुम्ब आहाराकरणें । अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणें । ऐसें स्थिति जें वर्तणें । तें जाणणें शुद्ध वैराग्य ॥३७॥

ऐसी स्थिति नाही ज्यांसी । तंव कृष्णप्राप्ति कैची त्यासी । यालागी कृष्णभक्तिसी । ऐशी स्थिति असावी ॥३८॥

या स्थितिवेगळा जाण । कृष्णीं मिले तो अज्ञान । तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान । लटकें तरी आण देवाची ॥३९॥

हें बोल माझियें मतीचे । नव्हेति गा साचे । कृष्णें सांगितले उद्धवहिताचे । मी साच ते बोलिलों ॥४०॥

साच न मानी ज्याचें मन । तो विकल्पी न पवे कृष्णचरण । माझें काय जाईल जाण । मी बोलोन उतराई ॥४१॥

साधावया वैराग्यज्ञान । मनुष्यदेही करावा प्रयत्न । सांगे एका जनार्दन । आणिक प्रयत्न असेना ॥४२॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP