मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
सायकॉलॉजिकली !

दिवाकर - सायकॉलॉजिकली !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... थांब, ये नारु ! - अरे, आधीं नीट ऐकून घेतलेंस का काय काय आणायचें तें ? - हां बरोबर, पानाच्या तीन पट्टया आणि एक सिगारेटसची पेटी ! - पण ती कोणती ठाऊक आहे का ? - सीझर्स ! कैची छाप ! भलतीसलती उगीच आणूं नकोस ! - चल आटप, ठोक धूम लवकर ! सगळे आम्ही इथें वाट पहात आहोंत ! - छे बोवा ! काय तुम्ही मघांपासून उगीच पिरपिर लावली आहेत हो ? - तुम्हांलाच तेवढी घाई अन् आम्ही काय इथें राह्यला आलों आहोंत ? अनायासें सुट्टी मिळाली आहे, बसूं थोडा वेळ आणखी ! समजलें हो ! काम .... काम .... काय कामाचें सांगतां येवढें ? येऊन जाऊन स्नान करुन जेवायचें, अन् खुशाल आढ्याला पाय लावून ताणू न द्यायची, हेंच कीं नाहीं ? सत्तेची येवढी बायको असल्यावर मग हो कां इतकी घाई ? - असें ! हें नव्हतें मला ठाऊक ! तुमची आमची विशेष ओळखही नुकतीच झालेली ! त्यामुळें .... कधींची बरें गोष्ट हीं ? - म्हणजे जवळजवळ चार वर्षे झालीं म्हणानात ! - ब.... रं ! फिरुन कांही मग ? - ना .... हीं !! अरे, म्हणजे सांगतां आहां काय तुम्ही ! खरेंच का ? - मग मोठें विलक्षण आहे बोवा ! बायको जाऊन चार वर्षे झाली आणि अजून लग्न नाही म्हणतां ? - हेः स्टुपिड् ! - रागावूं नका तुम्ही ! पण खरें सांगायचें म्हणजे .... साफ इथें चुकतां आहां तुम्ही ! यावरुन होतें काय ठाऊक आहे का ? - अहो, बायकोवर तुमचें प्रेम नाहीं हें उघड उघड दिसतें ! - भलतेंच एखादें ! - असें आहें त्याचें.... इतकें कशाला प्रत्यक्ष माझेंच घ्या ना ! पहिली बायको माझी मेली, तेव्हां लगेच दुसरी केली ! म्हणजे झालें काय ? - पहिलीवर झालें माझें दुप्पट प्रेम ! पुढें दुसरी गेल्यावर तिसरी ! त्यामुळें .... लक्षांत आलें का काय झालें तें ? .... पहिलीवर माझें झालें तिप्पट, दुसरीवर दुप्पट अन् तिसरीवर एकपट, म्हणजे सर्वात कमी प्रेम तिच्यावर ! असें मोठें हें .... ' सायकॉलॉजिकली ' - म्हणजे मानसशास्त्रदृष्ट्या .... बरें का ? - मानसशास्त्रदृष्टया हें मोठें विचित्र त्रांगडें आहे ! - भले महाराज ! टॉलस्टॉय आणि टागोर वाचून हेंच का शेवटीं सार काढलेंत ? .... ''

१६ मे १९२८

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP