मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
शेवटची किंकाळी !

दिवाकर - शेवटची किंकाळी !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' ..... कसें कोंवळे ऊन पडलें आहे पण ! अश वेळेला नाचण्याबागडण्यानें जिवाला किती आनंद वाटतो ! - हो, हा माझा देह सडलेला असला म्हणून काय झालें ? जीव कोठें सडला आहे, आणी या कुत्र्याच्या आयुष्याला कंटाळला आहे ? - अरे ! आज असें छातींत धसके बसल्यासारखें काय होत आहे ! मघाशी त्या माणसानें हंसत हंसत माझ्यापुढें काय बरें खायला टाकले होतें ? - असेल काही तरी ! गोड होतें ना ? झालें तर ! - रात्रभर या देहाला ओरबडून - कुरतडून - खाणार्‍या यातना जर आतां अमळ थकून भागून निजल्या आहेत, तर आतां मजेनें इकडे तिकडे फिरायला काय हरकत आहे ? - चला ! जरा त्या बाजूला धांवत धांवत जाऊं ! - क्या ! क्या !! - अरे, सोड मला, इतक्या जोरानें - कडकडून - चाबूं नकोस ! सोड मला !! - हंसत आहे कोण ? मला कासावित होऊन ओरडतांना ऐकून, कोणाचें बरें राक्षसी हदय खिदळलें हें ! - अरे ! हा तर रस्त्यांतून खरडत - खरडत - गांवांत भीक मागात फिरणारा तो महारोगी ! काय रे ए ! पांगळ्या - सडक्या - महारोग्या ! माझें ओरडणें ऐकून तूं का रे असा खदखदां हंसलास ? काय ? - काय म्हटलेंस ? मला गोळी - विष - घातलें आहे ? आणि मी आतां मरणार ? अस्सें ! - पण मी - आ ! माझ्या मस्तकावर व छातीवर उभें राहून कोण बरें मला एकसारखें दडपतो आहे ? - पण मी कोठें आधीं मरायला तयार होतों ? माझी इच्छा नसतांना मला कां मारलें रे ? - तुम्ही माणसांनीं माझा कां जीव घेतला रे ! काय ? - थांब ! पुनः - पुनः बोल ! माझा त्रास होतो म्हणून मला मारले ? आपल्या वेदनांनीं विव्हळ होऊन मी रात्रभर रडत होतों - तुम्हांला त्रास देत होतों - म्हणून मला विष घातलें ? मी पिसाळेन ? तुम्हांला चावेन ? म्हणून माझा जीव घेतला ? होय ! - आणखी काय म्हटलेंस ? माझ्या जिवाला होत असलेल्या यातना तुम्हांला पाहवत नाहींत म्हणून मला विष चारलें ? बरें तर ! आपल्या जगण्यानें जर इतरांना त्रास होतो तर कशाला उगीच जगा ? - पण हो ! कायरे महारोग्या ! माझ्याप्रमाणें तूंही सडलेला नाहींस का ? माझ्याप्रमाणें तूंही नाहीं का आपल्या रडण्यानें - गागण्यानें - जगाला त्रास देत ? आपल्या मटकण्यानें तूं नाही का गांवांत महारोग पसरीत ? तुझ्या यातनांची नाहीं जगाला कीव येत ? आणि माझ्या यातनांची तेवढी येते काय ? - आ ! आ !! मला भाजलें ! मला जाळलें ! हा ! - दुष्टा ! चल, नीघ येथून ! - अरेरे ! या जगांत देहानें तडफडून सडणारी - मनानें पिसाळलेलीं - एकमेकांचें हंसत हंसत गळे कापणारी - भयंकर माणसें - किती ! - कितीतरी सांपडतील ! - कां नाहीं ? त्यांना कां नाहीं गोळी घालून - विष घालून - जाळून पोळून मारीत ? - नाहीं ! तसें नाहीं ! अरे कुत्र्या ! तीं माणसें ! - ईश्वराचीं लाडकी शहाणी माणसें आहेत ! जग त्यांचें आहे ! तुम्हां कुत्र्यांचें नाहीं ! समजलास ! नाहीं सोसवत मला या यातना ! देवा ! मला लवकर तरी मरुं देरे ! अरेरे ! नासलेलीं कुत्री जशी मारतात - तशीं नासलेलीं माणसे गोळ्या घालून कां नाही ठार करीत ! - दाबला ! माझा गळा कोणी दाबला ! - अरे कुतरड्या ! माणसाशीं बरोबरी करुं नकोस ! बरोबरी करुं नकोस ! - अरे ! मनुष्यदेहांत प्रत्यक्ष परमेश्वरानें अवतार घेतलेले आहेत ! तुम्हां कुत्र्यांमध्यें कधी - कधीं तरी त्यानें अवतार घेतला आहे का ? मग ! आदळ ! आपट आपलें टाळकें एकदांचें या दगडावर ! - जिवाला त्रासून जर आपण होऊन कोणी माणूस मेलें, तर परमेश्वर त्याला अनंत काल नरकांत लोटतो - नरकांत ! इतकी मनुष्यानें आपल्या जिवाची - आपल्या वर्तनानें ! - ईश्वराजवळ किंमत वाढवून ठेवलेली आहे ! ठाऊक आहे ! - अहा ! कसा तडफडत आहेस आतां ! - नासलेलींच काय ! - पण चांगलीं - चांगली कुत्रीसुद्धां मारुन टाकूं ! हो ! - नासलेली माणसेंसुद्धा नाही मारायची आम्हांला ! मग ! - ओरड ! लागेल तितका ओरड ! - मनुष्याची शारीरिक असो ! - किंवा मानसिक असो ! ती घाण - तो गाळ - आम्हांला काढायचा नाहीं ! तर ती जतन करण्याकरितां आम्ही अनेक संस्था काढूं ! लागतील तितके आश्रम काढूं ! पण ती जपून ठेवूं ! जपून ! हें जग कुत्र्यांसारख्या भिकार प्राण्यांकरिता नाहीं ! निवळ माणसांकरितां आहे ! - माणसांकरितां ! - जा ! चालता हो ! - असें काय ? आम्हां कुत्र्यांकरिता हें जग नाहीं काय ? ठीक आहे ! ठीक आहे ! प्रत्येक गोष्टीला अंत आहे ! तर याद राखून असा - याद राखून ! कीं आम्ही कुत्रींही कधीं तरी जगाचे मालक होऊं ! क्या ! क्या !! आणि मग तुमचीं हदयें फाडून - नरड्यांचा कडकडून चावा घेऊन रक्त पिऊं - रक्त ! कधींधी सोडणार नाहीं ! - क्या !! ..... ''

२९ फेब्रुवारी १९१२

N/A

References : N/A
Last Updated : September 17, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP