मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी !

दिवाकर - तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... या आळीला का ? ' ख्राइस्ट लेन ' असें म्हणतात. त्या समोरच दिसणार्‍या खांबाच्या कपाळावर काळ्या अक्षरांनीं लिहिलेली पाटी ठोकलेली आहे, तिकडे आपण पाहिलेंच नाहीं वाटतें ? - ते पहा, अजून रक्ताचे डाग आहेत त्या खांबावर ! फळीवरही थोडेसे शिंतोडे उडालेच आहेत. - अहो, परवां रात्रीचीच गोष्ट. दारुबाज नवर्‍यानें घराबाहेर हाकून दिलें म्हणून ज्या बिचारीनें - किती गरीब आणि सद्गुणी होती ती ! - रागाच्या आवेशांत त्याच, त्याच, खांबावर आपलें कपाळ फोडून जीव दिला, त्याच बाईच्या आत्म्यानें जातां जातां ' ख्राइस्ट ' या अक्षरांवर ते रक्ताचे शिंतोडे उडविले आहेत ! - हें झालें ? तसेंच एकदां त्या खांबाजवळ एक मूल - अरेरे ! त्या अर्मकाच्या नरड्याला व छातीला पांच, पंचवीस खिळे ठोकलेले ! - असें तें मूल, कोणीं चांडाळानें आणून टाकलें होतें ! - जाऊं द्या कीं ! आपल्याला काय करायचें आहे या गोष्टीशी म्हणा ! - काय चिरुट ? कोणत्या छापाचा आहे ? वेलिंग्टन चिरुट असेल, तर मग हरकत - नाहीं ! अहो परवां काय झालें ! जवळच इमर्सन चौकांत विस्मार्क कंपनीचें दुकान आहे - तेथें मीं जवळजवळ दोन शिलिंगाचे पैगंबर छापाचे चिरुट, जो तो त्यांची स्तुति करायला लागला, म्हणून मोठ्या हौसेनें विकत घेतले ! - झालें ! थोड्या वेळानें मी जो त्यांतला एक ओढून पाहातों तों काय ! सारखा अर्धा तास ठसका ! - असा कांहीं संताप आला कीं, ते सगळे चिरुट घेतले, अन् लागलीच शेजारच्या गटारांत फेंकून दिले ! - नांवें मात्र मोठमोठ्यांचीं, पण येथून तेथून बदमाषगिरी ! - अरे वा ! तुमचा नेपोलियन शू बराच टिकला आहे कीं ! - मी तुम्हांला सांगत नव्हतों कीं तो सॉक्रेटिस बूट घेऊं नका म्हणून ? असो. आपण आमच्या देशामध्यें, माझ्या घरीं पाहुणचार घेत कांहीं दिवस तरी राहिलेंच पाहिजे. पहिल्यानेंच येथें आलां आहांत - तो पहा ! आमच्या वाइजमनच्या बहिरी ससाण्यानें कसा पक्षी धरुन आणला आहे ! - मोठा चलाख आहे ! जवळजवळ रोज तीसपासून पस्तीसपर्यत पांखरें धरुन आणतो ! त्याचें नांव काय ठेवलें आहे ठाऊक आहे का ? - शेक्सपीअर ? - कारण तो म्हणतो कीं, जसा कविराज शेक्सपीअर, माणसाच्या अंतःकरणांत अगदीं सांदीकोपर्‍यांत दडून बसलेले विचार पकडून आणण्यांत मोठा हुशार होता, तस्सा माझा हा ससाणा पांखरें धरुन आणण्यांत मोठा वस्ताद आहे ! हः हः हः का ? आहे कीं नाहीं ! .... ''

१७ नोव्हेंबर १९११

N/A

References : N/A
Last Updated : September 16, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP