मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
काय ! पेपर्स चोरीस गेले ?

दिवाकर - काय ! पेपर्स चोरीस गेले ?

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... तर काय हो ! जिवावर केवढी थोरली धोंड आहे माझ्या ! एक नाहीं दोन नाहीं, आठ तुकडयांचे दणदणीत पेपर्स ! शिवाय प्रत्येक तुकडींत चाळीस पंचेचाळीस काटी ! रोज एक गठ्ठा म्हटला, तरी दिवस पाहिजेत आठ ! अन् राहिलेत सारे चार ! - तितकेहि नाहींत ? अरे म्हणजे म्हणतां आहां काय तुम्ही ! बेडबडि तर नाहीं लागलें ! - एकवीस तारीख आज ? - छेः ! भलतेंच कांहीं तरी ! आणा पाहूं ती डायरी इकडे ! - उगीच आपलें कांहीं तरी .... अरे भाई, खरेंच कीं, हें तर वीस तारखेचें पान ! धडधडीत मीं लिहिलें आहे - हो, हो, अगदी शंकाच नको ! बापरे ! आज एकवीस तारीख, आणि उद्याला तर हें खलास व्हायला हवें ! राम राम ! प्राण खातील माझा आतां ! काय, करुं तरी काय आतां ! - हो, रात्रीचे आतां आठ वाजलेले, अन् सकाळींच उद्यां आठाला सगळे हजर करायचे ! तेव्हां काय जीव देऊं इथं ? - बरं, आता रातोरात बसून तपाशीन म्हटलें तर पोरटयांनी थोडं का हो लिहिलं आहे ! - आग लागो त्या पेपरांना ! नाहींसे कुठें होतील तर देव पावेल ! हो, आतां मी तरी .... अरे कोण तिकडे, काय बडबडतां आहां रे ? गोंगाट कसला येवढा ? - काय .... काय .... म्हणतोस विष्ण्या ? अरे ! काय सांगतो आहेस तरी काय ! पेपर्स चोरीस गेले ? चल ! कांही तरी बरळतो आहेस झालें ! गाढवा ! पेपर्स का कधीं चोरीस गेले आहेत ? - थांब, मीच उठून .... माय गॉड ! खरेंच कीं ! पार सगळेच्या सगळे गठ्ठे .... वा, वा ! फारच छान झालं ! पेपर्स चोरीस गेले ! बस, बस ! केवढा आनंद .... काय आनंद झाल आहे म्हणून सांगूं ! जा जा, पळ लवकर ! आधीं चहा ठेवायला सांग ! - आणि हें बघ विण्या ! साखर थोडी जादा ढकलायला सांग ! बस ! आज मैं तो बादशहा हूं ! - अरे ! काय, मांडलें आहेत काय तुम्ही ! इतक्या लवकर चहा आणलास ? - आधींच ठेवला होता होय ? शाबास ! हुशार आहांत रे सगळे तुम्ही ! पण काय रे ! हें सगळें स्वप्न तर नाहीं ना ? नाहीं तर .... हो बाकी लागतो आहे खराच .... हाताला चांगलाच पेला कढत लागतो आहे ! आणि वास काय झकास सुटला आहे ! रंगसुद्धां खुलून आला आहे कीं ! - थांब, बेटा विष्णु ! मला एकदां चांगला मनापासून .... अस्सा अगदीं हातपाय ताणून आ .... आळस - अरे ! का .... काय रे हें ! अरे काय माझ्या टाळक्यांत पडलें हें ! - हर हर ! हे तर पेपर्स ! आणि मघांशी चोरीस गेले ते ? - स्वप्नांतच का ? .... ''

३ फेब्रुवारी १९२८

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP