मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
फाटलेला पतंग

दिवाकर - फाटलेला पतंग

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... छे ! आतां कोठून मी धड व्हायला ! अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक ! - अहो ! नका ! त्या आकाशाकडे पाहूं नका ! हरहर ! हेंच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्राण्यालासुद्धा, गोड - सुंदर - अशीं मोठमोठीं स्वप्नें पाडून - बिचार्‍याला नादीं लावून - कधीं म्हणून लवकर मरुं देत नाहीं बरें ! अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्‍या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे ? ' - पण अरेरे ! तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली ! खालीं खेंचा ! नाहीं तर तो वेडा होऊन, कोठें तरी भडकेल ! ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते ! मग काय ? खालीं जग, वर स्वर्ग, या उभयत्नांच्या जोरानें - अगदी निकरानें - चाललेल्या ओढाताणीमध्यें बिचार्‍या जिवाची - हाय ! - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला ! - नको ! त्या दिवसाची - त्या स्थितीची आठवणसुद्धां नको ! अहो ! एके काळी धड असलेला हा फाटका पतंग, अशाच जगाच्या व स्वर्गाच्या ओंढाताणीमध्यें सांपडला होता बरें ! अहाहा ! किती सुखाचा - माझ्या पूर्ण भाग्याचा - दिवस होता तो ! ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता ! जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय ? जग कोठें मला विसरलें होतें ? माझी किंमत किती ? पण तिचासुद्धां जगाला कांही केल्या लोभ सुटत नाहीं ! शेवटीं ! जग मला खेंचूं लागलें - ' स्वर्ग जातो ! स्वर्ग जातो ! ' असें म्हणून मी मोठमोठ्यानें रडूं लागलों - अगदी सुचेनासें होऊन संतापाच्या - सोसाट्याच्या - वावटळींत सांपडून धाडकन् - या बाभळीच्या झाडावर येऊन आदळलो ! आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो ! - नाहीं ! - नाहीं ! - नाही !! - उलट मी आतां दिवसानुदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार ! - अहो ! माझ्या स्थितीबद्दल रडूं नका ! आधी ऐका ! एकदां धड असलेल्या पतंगाचें - या बाभळीच्या कांट्यांवर बसून अहोरात्र रडणारें - कण्हणारें - फाटत चाललेलें पिशाच्च ! - काय सांगतें तें ऐका ! गर्वानें भरार्‍या मारुं नकोस ! भरार्‍या मारुं नकोस ! नाहीं तर अस्सा फाटून - जन्मभर, जन्मभर - रडत बसशील !.... ''

२६ जानेवारी १९१२

N/A

References : N/A
Last Updated : September 17, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP