मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
अवघें पाउणशें वयमान

दिवाकर - अवघें पाउणशें वयमान

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


''.... अहो छे हो ! तिला आणखी तिच्या मुलाला मरुन अजून पुरते दोन महिनेसुद्धां झाले नाहींत ! प्लेगचेच दिवस होते ते ! कांही फार दिवसांची गोष्ट नाहीं मी सांगत तुम्हांला - हं ! तिला विचारीला स्मशनांत एकटीला चैन पडलें नसेल, म्हणून माझ्या दामूलाही घेऊन गेली असेल झालें ! असो, जशी ईश्वराची इच्छा ! - यमू म्हणजे माझी प्रत्यक्ष सख्खी चुलत बहीण ! ती प्लेगानें आजारी पडून, तिला वायु झाला आहे, हीं अक्षरें दामूच्या पत्रांत दिसायचा अवकाश, तों मला जें कांहीं रडूं कोसळलें, तें कांहीं पुसूंच नका ! किती वेळां तरी मनांत आलें कीं, तिच्याकडे जावें म्हणून ! पण अगदी नाइलाज होता ! - एक तर ते प्लेगचेच दिवस; व दुसरें असें कीं, घरामध्यें इकडे माझ्या नातवाचा दिवाळसण ! आणि त्यांतून, पुण्यापासून मुंबईपर्यतच्या प्रवासाची दगदग ! या वृद्धावस्थेंत, दम्यानें अगदीं गांजलेल्या या जिवाला, कशी बरें सहन झाली असती ! नाहीं, तुम्हीच सांगा ! - अनंतराव, काय सांगूं तुम्हांला ! ते दोन दिवस माझा जीव कसा अगदीं काळजीच्या भोंवर्‍यांत सांपडला होता ! - अहो पुढें काय ? प्रारब्ध माझें ! दामूच्या पत्रानंतर अगदीं चौथ्या दिवशी सकाळींच, त्याच्या एक स्नेह्याचें पत्र आलें कीं, माझी यमू व तिचा तो दामू, दोघेंही बिचारी प्लेगाच्या वणव्यांत सांपडून तडफडून मेली म्हणून ! दुःखाचा अगदीं पर्वत कोसळला होता माझ्यावर ! - पण तसाच धडपडत कसा तरी एकदांचा चार - पांच तास मुंबईस जाऊन, दामूच्या मित्रानें - मोठा सच्चा माणूस ! जें कांहीं त्यांचें किडूकमिडूक ठेवलें होतें, तें सगळें कांहीं मी येथें घेऊन आलों ! - आतां त्यांच्या घरादारांची व शेतांची कांहीं तरी व्यवस्था मला नको का करायला ? माझ्या यमूला आतां मीच काय तो एकटा वारस - हर हर ! या प्लेगाच्या वादळानें त्यांचा वंशवृक्षच किं हो कोसळून पडला ! कठीण ! - काळ मोठा कठीण येत चालला आहे ! असो ! पण का हो अनंतराव, माझ्या यमूची घरेंदारें व शेतें आतां माझ्या कबजांत यायला मार्गात कांहीं अडचणी तर नाही ना येणार ? .... ''

४ नोव्हेंबर १९११

N/A

References : N/A
Last Updated : September 13, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP