मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
कोकिलाबाई गोडबोले

दिवाकर - कोकिलाबाई गोडबोले

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... मेले हात धुऊन पाठीस लागले आहेत जसे ! काडीइतकें सुद्धां कार्ट्यापासून सुख नाहीं ! - कस्सें, करुं तरी कसें आतां ! जेवा मुकाट्यानें ! नाहीं तर चांगली फुंकणी घालीन पाठीत एकेकाच्या ! - काय, काय म्हटलेंस गण्या ? - मेल्या ! मी मोठमोठ्यांनें ओरडते का ? - ऊं ! - चूप ! ओक्साबोक्शी रडतो आहे मेला ! जीव गेला ? का घालूं आणखी पाठींत ? - काग वेणे ? गप कां बसलीस ? - भाकरीवर तूप हवें ? - मेलें माझें तोंड नाही धड आतां ! बापानें ठेवलें आहे तूप तुझ्या टवळे ! तूप पाहिजे नाहीं ? हें घे ! - गप्प ! नाहीं तर आणखी रपके घालीन चांगले ! - मिटलें का नाही तोंड ? का अस्सा आणखी ! - हात तुला घातले चुलींत नेऊन अवदसे ! - कोण आहे ? कोण हांका मारते आहे बाहेर ? - आहेत हो, आहेत ! आलें, आलें ! - या पोरट्यांच्या गागण्यानें अमळ ऐकूं येईल तर ना ? लग्न होऊन घरांत आल्यापासून सारखी पाहत आहें, रात्रंदिवस मेला जंजाळ पाठीमागे ! - सांडलेंस पाणी ? - बाई ! बाई ! भंडावून सोडलें आहे या पोरट्यांनी - ! पहा, आहे ? नीट मुकाट्यानें जेवायचें, त्या मिटक्या रे कशाला वाजवायच्या ? - थांब !! हा झारा तापवून चांगला चरचरुन डाग देतें तोंडाला ! - दळिद्री कारटी ! खाऊन पिऊन मेली झालीं आहेत पहा कशीं ! मरुं घातली आहेत जशीं ! - आलांत ? आज लवकर येणें केलें ? स्वारीचें भटकणें लवकरच संपलें म्हणायचें ! रोज उठून तीं मेलीं मंडळें का फंडळे ! कर्माची करा आपल्या मंडळें ! - उद्यां जा तर खरे, कीं ही सगळी कारटी आणून तिथें उभी करते अन् पहाते तमाशा ! - आलें हो, आलें ! - केव्हांच्या त्या मुरलीबाई हांका मारीत आहेत, तेव्हां अमळ - ऐकलें का ? - असें घुम्यासारखें बसायचें नाहीं ! संभाळा या कारट्यांना, नाहीं तर मेली आग लावून देतील घरादाराला ! - आलें बाई !!.... ''

१ जानेवारी १९१२

N/A

References : N/A
Last Updated : September 17, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP