'' .... अहो तें सगळें खरें ! पण माझ्या मागची ही व्याद टळेल, तेव्हं तुमची मुंबई, आणखी तिची मजा ना ? तुमची शपथ, मला अगदीं त्रास आला आहे ! वर्ष होत आलें, पण माझी बायको बाळंतरोगानें आपली अधिकाधिक कुजतेच आहे ! अहो, मी म्हणतों, एकदां बरें तरी व्हावें, किंवा कायमचें मरुन तरी जावें ! प्लेगचीं माणसें नाहीं, कशी चोवीस अगर छत्तीस तासांत निकाल ! - रागावूं नको तर काय करुं ? सगळें जग लोटलें आहे मौज पाह्यला ! फार लांब कशाला ? माझ्या शेजारचाच तो गणू शिंपी. घरांत बायको एक दिवसाची बाळंतीण, गावांत तर प्लेगचा कहर, असें असून घरांतली दोन मोठीं भांडी घेतली, तीं माझ्याकडे आणून ठेवलीं, पंधरा रुपये घेतले, आणि लागलीच पठ्ठ्या मुंबईस चालता झाला ! - कां ? आहे कीं नाहीं ? नाहींतर आम्ही, बसलों आहोंत कीं नाहीं असे रडत ! - नाहीं ? नाहीं, आपणच सांगा की, अशी मौज, अशी लाइट, कधीं या जन्मांत तरी फिरुन आपल्याला पाह्यला सांपडेल का ? - अहो बाबूराव, मी चांगले ठरविलें होतें कीं, बेळगांवास जावें, चंद्राजीला घ्यावी, आणि तसेच मुंबईस परस्पर चालते व्हावें ! पण म्हण आहे ना, कीं माणूस योजितो एक, आणि देव घडवून आणतो दुसरेंच ! चांगला बेळगांवास जायला निघालों, तोंच आमच्या बाईसाहेबांची प्रकृति एकाएकी बिघडली, आणि काय ? घटकेंत जीव जातो, घटकेंत येतो, असें आतांशा चार दिवस सारखें चाललें आहें ! शपथ ! मी तर अगदी रडकुंडीस आलों आहें बुवा !.... ''
७ डिसेंबर १९११