परोक्षवादो वेदोऽयं बालानामनुशासनम् ।
कर्ममोक्षाय कर्माणि विधत्ते ह्यगदं यथा ॥४४॥
जेवीं रोगु जावया निश्चित । बापु बाळा भेषज देत ।
तेथें साखर घाली हातांत । तत्सेवनार्थ प्रलोभें ॥७७४॥
तेवीं वेदांचा परोक्षवाद । सत्य मानिती बुद्धिमंद ।
कर्में छेदवी कर्मबाध । हा वेदानुवाद मुख्यत्वें ॥७७५॥
वेदु बोले स्वर्गादि फळ । तो प्रवृत्तिलोभ केवळ ।
परी कर्में छेदी कर्ममूळ । हें मुख्यत्वें फळ वेदोक्तीं ॥७७६॥
लोहाची बेडी पडली पायीं । ते तोडावया घणु आणिला पाहीं ।
तो घणुचि विकून खादला जिहीं । त्यांचें बंधन कहीं तुटेना ॥७७७॥
तेवीं कर्में छेदावें कर्मबंधन । तें कर्म वेंचिती विषयीं पूर्ण ।
त्यांचें कदा न तुटे भवबंधन । जन्ममरण सरेना ॥७७८॥
आम्ही स्वर्गफळा विरक्त । म्हणोनि नाचरे जो वेदोक्त ।
त्याचें ज्ञान जालें विपरीत । अति अनर्थ पावे तो ॥७७९॥