मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक १८ वा

एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


प्रबुद्ध उवाच-

कर्माण्यारभमाणानां दुःखहत्यै सुखाय च ।

पश्येत्पाकविपर्यासं मिथुनीचारिणां नृणाम ॥१८॥

मुख्य मायेचें तरण । प्रबुद्धचि जाणे पूर्ण ।

प्रबुद्ध जाहलिया आपण । मायेचें विंदान न तरतां तरती ॥२९॥

मनीं विषयाचा छंदु । तो केवळ महाबाधु ।

विषयत्यागी तो प्रबुद्धु । तोचि विशदु भावो आइका ॥२३०॥

विषयीं लोभलें अत्यंत मन । तेथ नव्हतां वैराग्य पूर्ण ।

कदा नव्हे मायेचें तरण । वैराग्यार्थ जाण विषय निंदी ॥३१॥

केवळ नश्वर विषय देख । तेंचि मानिती परम सुख ।

तें सुखचि दुःखदायक । स्त्रीकामें मुख्य माया बाधे ॥३२॥

वेंचूनि धनाचिया गांठी । सुखार्थी स्त्री बैसविली पाटीं ।

तेचि भोगवी दुःखकोटी । जगीं माया लाठी स्त्रीकामें ॥३३॥

स्त्रीकामें प्रपंचु सबळ । स्त्रीकामें दुःख प्रबळ ।

स्त्रीकामें मायेसी बळ । स्त्रीकामें सकळ मोहिलें जग ॥३४॥

आवडीं स्त्री बैसवितां पाटीं । ते प्रपंचाच्या वाढवी कोटी ।

महामोहाच्या पाडूनि गांठी । दुःखसागरीं लोटी स्त्रीकामु ॥३५॥

जे नवमास वाहे उदरांत । ते माता करुनि अनाप्त ।

स्त्रियेसी मानिती अतिआप्त । ऐशी माया समर्थ स्त्रीकामें ॥३६॥

जे तोंडींचें पोटींचें खाववित । जे सदा सोशी नरकमूत ।

ते मातेहूनि स्त्री आप्त । जाहली जगांत मायामोहें ॥३७॥

स्त्रिया मेळवितां असंख्य मिळती । परी माता न मिळे त्रिजगतीं ।

ऐसें जे सज्ञान जाणती । तेही आप्त मानिती स्त्रियेतें ॥३८॥

मातेतें भजतां भुक्तिमुक्ती । स्त्रियेतें भजतां नरकप्राप्ती ।

ऐसें जे शास्त्रज्ञ जाणती । तेही माता उपेक्षिती स्त्रीकामें ॥३९॥

एवं स्त्रीकामाचिया व्याप्ती । माया व्यापिली त्रिजगतीं ।

सज्ञानही पाडले भ्रांतीं । स्त्रीकामासक्ती महामाया ॥२४०॥

मानूनि विषयांचें सुख । काम्य कर्म करितां देख ।

तेणें अतिदुःखी होती लोक । दुःखदायक काम्य कर्म ॥४१॥

कामिनीकामें गृहासक्ती । प्राणी प्राणांतें स्वयें शिणविती ।

त्या श्रमाची निदानस्थिती । सांगेन तुजप्रती राजाधिराजा ॥४२॥

निर्मळ जळें भिंती धुतां । जळाचीच नासे निर्मळता ।

हात माखती धुतले म्हणतां । भिंतीही तत्त्वतां निदळ केली ॥४३॥

तेवीं विषयांचेनि सुखें सुख । न पावतीच ब्रह्मादिक ।

विषयाचा जे मानिती हरिख । ते परममूर्ख पशुदेही ॥४४॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP