मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक २१ वा

एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तस्माद्गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम् ।

शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम् ॥२१॥

जाणोनि विषयांचें नश्वरपण । पावावयालागीं ब्रह्म पूर्ण ।

सद्गुरुसी अनन्यशरण । रिघावें संपूर्ण श्रद्धायुक्त ॥७३॥

सद्गुरुवचनमात्रें माया । तरेन हा निश्चयो राया ।

येणें सद्भावें लागतो पायां । पावावया निजस्वार्थु ॥७४॥;

’गुरु’ ऐसें जें म्हणणें । तेंही आहे बहुसालपणें ।

ऐक राया तीं लक्षणें । तुज कारणें सांगेन ॥७५॥

एक वेदाध्ययन गुरु । एक व्याख्यानदानीं उदारु ।

एक ज्योतिषज्ञानीं गंभीरु । परी ते सद्गुरु न म्हणती ज्ञाते ॥७६॥

एक आगमोक्त मंत्र उपासिती । जप करावा विधानयुक्ती ।

मग कैं होईल निजप्राप्ती । हें नकळे निश्चितीं गुरुशिष्यां ॥७७॥

एक वायुधारणा लाविती । एक नाना लक्ष्यें दाविती ।

एक हठयोगें गोंविती । एक बैसविती महामुद्रा ॥७८॥

एक ब्रह्मानुवादें चोखटु । तत्त्वनिरुपणीं उद्भटु ।

वैराग्यबोलिका वरिष्ठु । उपजवी विटु उभयभोगांचा ॥७९॥

कैसें निरुपी शुद्ध ब्रह्म । ऐकोनी सात्विकां येत प्रेम ।

परी निजहृदयींचा भ्रम । निरसे तें वर्म नेणेचि ॥२८०॥

जेवीं गुळ-उसांचा घाणा । तोंडींचा रसु भरे भाणा ।

शब्दचोपटें भरोनि वदना । करी परिभ्रमणा करकरितु ॥८१॥

ऐसा जो कां शब्दज्ञानी । उत्तम व्याख्याता ज्ञानगुणीं ।

तो जन रंजवी निरुपणीं । स्वयें कोरडेपणीं करकरितु ॥८२॥

योगक्षेम चाले गोमटा । लौकिकीं थोर प्रतिष्ठा ।

तेथें निजप्राप्तीची उत्कंठा । न वचे वरिष्ठा शिष्यांची ॥८३॥

जेवीं अमृत म्हणतां । चवी न लभे गा सर्वथा ।

तेवीं शाब्दिक ज्ञानयोग्यता । अनुभववार्ता स्वयें नुपजे ॥८४॥

जेणें स्वयें चाखिली नाहीं चवी । तो दुजयातें गोडी केवीं लावी ।

यालागीं जो पूर्णानुभवी । तो तारि सद्भावें सच्छिष्यासी ॥८५॥

एवं गुरुपणाची वदंती । असे बहुपणें नांदती ।

जो करी अपरोक्षप्राप्ती । त्यातें म्हणती सद्गुरुस्वामी ॥८६॥

ज्याचेनि वाक्यें असंतता । निःशेष मावळे तत्त्वतां ।

त्यासीचि गा सद्गुरुता । वेदशास्त्रार्थां प्रतिपाद्य ॥८७॥

जे उपदेशिती मंत्रतंत्र । तेही पूज्यत्वें अतिसधर ।

जेथें नुरे पूज्यपूजकताविचार । तोचि साचार सद्गुरुस्वामी ॥८८॥

एकाचें शुद्ध ब्रह्मज्ञान । वस्तु देखोनि विरालें मन ।

मावळलें द्वैताचें भान । पडिलें मौन चहूं वाचां ॥८९॥

इंद्रियें टंवकारिलीं समस्त । प्राण पांगुळला जेथींचा तेथ ।

वस्तु देखोनियां परमाद्भुत । पडलें ताटस्थ्य देहभावा ॥२९०॥

ऐसा जो आत्मानुभवी । त्यातें सद्भावें शिष्यु विनवी ।

तंव तो पुसे ना समजावी । ताटस्थ्यभावीं अबोलणा ॥९१॥

एका अनुभवा आलें ब्रह्म । फिटला बाध्यबाधकतेचा भ्रम ।

मोडलें द्वैतभावाचें कर्म । जगीं विषम असेना ॥९२॥

परी अचुंबित वर्तणें । अघटमान कर्म करणें ।

अत्यंत उग्रता मिरवणें । दुर्धरपणें भयानकु ॥९३॥

आपण आपणियामाजीं हंसत । ध्वनितें बोले परमार्थ ।

तेथें बोधेना शिष्याचें चित्त। पडे दुश्चित्त ते ठायीं ॥९४॥

ऐसा जो वर्ते ब्रह्मज्ञानी । त्याची ब्रह्मस्थिती न मने जनीं ।

मा कोण जाईल भाव धरोनी । बोधालागोनी त्यापाशीं ॥९५॥;

आतां सद्गुरुचीं जीं निजलक्षणें । राया सांगेन तुजकारणें ।

जे ऐकतां अंतःकरणें । सुखी होणें सद्भावें ॥९६॥

तरी जो कायावाचामनें । अतिकृपाळू दीनाकारणें ।

तोडी शिष्याचीं भवबंधनें । उठवी ठाणें अहंकाराचें ॥९७॥

जो शब्दज्ञानें पारंगतु । ब्रह्मानंदें सदा डुल्लतु ।

शिष्यप्रबोधनीं समर्थु । यथोचितु निजभावें ॥९८॥

ज्याचा जैसा जैसा भावो । तैसा तैसा करी अनुभवो ।

तरी गुरुत्वाचा अहंभावो । अणुमात्र पहा हो धरीना ॥९९॥

शिष्यापासूनि सेवा घेणें । हें स्वप्नींही न स्मरे मनें ।

शिष्याची सेवा स्वयें करणें । पूज्यत्वें पाहणें निजशिष्यां ॥३००॥

शिष्य देखावा पुत्रासमान । हें स्मृतिवाक्य असे प्रमाण ।

दृष्टीं देखों नेणे गौण । शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वें ॥१॥

शिष्य सेवा करी निजभावार्थें । परी तो सेवक न म्हणे त्यातें ।

ज्यासी भगवद्रूप सर्व भूतें । शिष्य वेगळा तेथें सेवकत्वें नुरे ॥२॥

ऐसा मी एक महायोगी । हेंही न मिरवी तो जगीं ।

गुरुत्वाचा ताठा अंगीं । सर्वथा शिगीं लागों नेदी ॥३॥

आपुल्या योगक्षेमाचें सांकडें । स्वप्नींही न घाली शिष्याकडे ।

शिष्यसंकट अतिगाढें । निवारी रोकडें निजांगें जो ॥४॥

मी एक अकर्ता निजात्मयोगी । म्हणौनि विषयांतें न भोगी ।

अथवा विषयो निःशेष त्यागी । हाही आग्रहो अंगीं असेना ॥५॥

तो विषय भोगी ना स्वयें त्यागी । तो अदृष्टाच्या निजविभागीं ।

लावूनियां देहाच्या अंगीं । परब्रह्मयोगीं विचरत ॥६॥

देह दैवें पालखीमाजीं चढे । अथवा विष्ठेमाजीं पडे ।

तें दोहींचें सुखदुःख त्याकडे । मी म्हणौनि पुढें कदा न रिघे ॥७॥

देहीं असोनि नाहीं अहंकृती । गेहीं असोनि नाहीं गृहासक्ती ।

शेखीं लोकांमाजीं लौकिकस्थिती । सुखें वर्तती लोकांसरिसें ॥८॥

त्यासी स्त्री म्हणे माझा भर्ता । पुत्र म्हणे माझा पिता ।

शिष्य म्हणती गुरु तत्त्वतां । तो त्यांहूनि परता त्यांमाजीं वर्ते ॥९॥

ऐशिया पूर्णप्रतीती । आचरोनि दावी भक्ती ।

हरि भजावा सर्वां भूतीं । हेंच शिष्यांप्रती उपदेशी ॥३१०॥

हीं सद्गुरुचीं निजलक्षणें । पंडितां न कळती ज्ञातेपणें ।

पूर्णानुभवी जाणती खुणे । इतरांचें जाणणें पांगुळे तेथ ॥११॥

त्याचे गुरुत्वाची वोळखण । अंगीं निजशांति पूर्ण ।

हेंचि सद्गुरुत्वाचें लक्षण । मुख्य भूषण हेंचि राया ॥१२॥

जगीं शांति जाली परदेशी । कोठेंही ठावो न मिळे तिशीं ।

ते आली सद्गुरुपायांपाशीं । सुखवासासी वसावया ॥१३॥

यापरी सद्गरुपाशीं शांती । स्वयें आली सुखवासवस्ती ।

जेवीं कां माहेराआंतौती । स्वानंदें क्रीडती कन्या जैशी ॥१४॥

जाणोनि वेदशास्त्र निश्चितीं । जो न मिरवी गा व्युत्पत्ती ।

ज्यासी अपरोक्षें पूर्ण शांती । तो सद्गुरुमूर्ति निश्चयें राया ॥१५॥

झणीं श्रोते कोपती येथ । म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ ।

’निष्णात’ या पदाचा अर्थ । काढितां तेथ स्फुरलें हो ॥१६॥

हे माझे गांठीची नव्हे युक्ती । सद्गुरु आपण आपली स्थिती ।

बोलवीतसे ग्रंथार्थी । पदपदार्थी साधूनि ॥१७॥

तरी सद्गुरुचीं लक्षणें । न वर्णवती अगाधपणें ।

वेद वेडावले मुकेपणें । तेथें माझें बोलणें सरे केवीं ॥१८॥

येथ आश्चर्य कैसें देखा । श्रीभागवत देशभाखा ।

परमार्थु साधिला नेटका । तुष्टला निजसखा जनार्दनस्वामी ॥१९॥

एका जनार्दना शरण । त्याची जैं होय कृपा परिपूर्ण ।

त्या देहीं असतां देहबंधन । नातळे जाण गुरुभक्तां ॥३२०॥

ज्याचे सेवितां निजचरण । देहीं न बाधी देहबंधन ।

त्यासी जाहलिया अनन्य शरण । दे अगाध कोण हें न कळे वेदां ॥२१॥

न करितां सद्गुरुभक्ती । कदा नव्हे परमार्थप्राप्ती ।

यालागीं सद्गुरुभक्ती । बोलिली ग्रंथीं शिष्यहितार्थ ॥२२॥

यालागीं पूर्ण सद्गुरुपाशीं । अनन्य शरण होतां त्यासी ।

तो सद्भावें निववी शिष्यासी । निजबोधेंसीं यथार्थ ॥२३॥

सद्गुरुस्थितीचें निरुपण । राया सांगितलें संपूर्ण ।

आतां शिष्याचें लक्षण । सावधान अवधारीं ॥२४॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP