इष्टं दत्तं तपो जप्तं वृत्तं यच्चात्मनः प्रियम् ।
दारान्सुतान्गृहान्प्राणान्यत्परस्मै निवदनम् ॥२८॥
अग्निहोत्रादि ’याग’ होम । ग्रहणादि ’दान’ अनुत्तम ।
’तप’ म्हणिजे स्वधर्म । जो वर्णाश्रम यथोचित ॥५५४॥
आगमोक्त यथाशास्त्र । आवरणविधि-विधानतंत्र ।
गुरुदीक्षा शुद्ध मंत्र । अथवा नाममात्र जो ’जपु’ कीजे ॥५५५॥
तें यज्ञ दान क्रिया तप । दीक्षामंत्र कां नामजप ।
तेथें न घालितां संकल्प । करी निर्विकल्प कृष्णार्पण ॥५५६॥
हरीशीं जाहले जे अनन्य शरण । ते हरीचे लडिवाळ पूर्ण ।
त्यांचें हरि करी प्रतिपाळण । जेवीं जननी जाण तानुलेया ॥५५७॥
यालागीं जें जें जीविकावर्तन । तेंही करावें कृष्णार्पण ।
’हें माझे’ म्हणोनि अभिमान । भक्त सज्ञान न धरिती कदा ॥५५८॥
ज्याची आवडी अतिशयें चित्तीं । ज्याची आपणिया अतिप्रीति ।
तें तें कृष्णार्पण करिती । गुरुवाक्यस्थिती विश्वासें ॥५५९॥
यालागीं आठही प्रहर । सेवेसी वेंचिती निजशरीर ।
निमिषार्धही व्यापार । विषयाकार करिती ना ॥५६०॥
अन्नालागीं होऊनि वेडें । सधनांच्या पायां न पडे ।
आयुष्याचे तीन कवडे । विषयाचे चाडे कदा न करी ॥५६१॥
आयुष्याची अर्ध घडी । वेंचितां न मिळे लक्ष कोडी ।
तेणें आयुष्यें परमार्थ जोडी । विषयांच्या कोडी थुंकोनि सांडी ॥५६२॥
त्यागोनियां राज्यसंपत्ती । राजे जाऊनि वनाप्रती ।
स्वयें परमार्थ साधिती । विषयासक्ति थुंकोनि ॥५६३॥
कैशी भक्तीची गोडी संपूर्ण । रिता जावों नेदी अर्ध क्षण ।
अवघें जीवितचि जाण । करी कृष्णार्पण सर्वस्वें ॥५६४॥
आणि पुत्रदारादिक जें जें घरीं । तें तें भगवत्सेवेवारीं ।
स्वयें कृष्णार्पण करी । माझी म्हणोनि न धरी ममता जीवीं ॥५६५॥
दारा पुत्र देह गेह प्राण । यांसी आत्मा पूर्ण सबाह्य ।
तेथें संकल्पेंवीण जाण । ब्रह्मार्पण सहजचि ॥५६६॥