एषा माया भगवतः सर्गस्थित्यन्तकारिणी ।
त्रिवर्णा वर्णिताऽस्माभिः किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥१६॥
उत्तम मध्यम अधम जन । तिन्ही अवस्था त्रिभुवन ।
त्रिविध कर्में तीन गुण । हें जाण विंदान मायेचें ॥२॥
ध्येय ध्याता आणि ध्यान । पूज्य पूजक पूजन ।
ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेही त्रिपुटी पूर्ण मायेची ॥३॥
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म कर्ता क्रियाचरण ।
भोग्य भोक्ता भोजन । हे त्रिपुटी जाण मायेची ॥४॥
शब्द श्रोता आणि श्रवण । घ्रेय घ्राता आणि घ्राण ।
रस रसना रसस्वादन । हे त्रिपुटी जाण मायेची ॥५॥
कर क्रिया आणि कर्ता । चरण चाल चालता ।
बोल बोलणें बोलता । हे त्रिविधावस्था मायेची ॥६॥
अहं सोहं जडमूढता । साधक साधन साध्यता ।
देवी देवो परिवारदेवता । हेही त्रिविधता मायेची ॥७॥
देह देही देहाभिमान । भव भय भवबंधन ।
मुक्त मुमुक्षु अज्ञान । हेंही विंदान मायेचें ॥८॥
सुख दुःख जडत्व पूर्ण । आधी समाधी व्युत्थान ।
उत्पत्ति स्थिति निधन । इंहीं लक्षणीं संपूर्ण माया विलसे ॥९॥;
नभीं नीळिमा पूर्ण भासे । शेखीं नीळिमेचा लेशही नसे ।
तेवीं स्वरुपीं माया आभासे । मिथ्यावेशें मायिक ॥२१०॥
जेवीं प्रत्यक्ष दिसे मृगजळ । परी तें निदाघचि केवळ ।
तेवीं स्वरुपीं माया प्रबळ । मुळीं निर्मूळ आभासे ॥११॥
हे मिथ्या माया कल्पनावशें । प्रबळ बळें भासली दिसे ।
नासूं जातां नाशिजे ऐसें । सत्यत्वें नसे निजांग ॥१२॥
नांवरुपाचिया भडसें । ब्रह्मादिक केले पिसे ।
मिथ्या त्रिपुटीविन्यासें । ज्या बांधिलें दिसे त्रैलोक्य ॥१३॥
जेवीं रुपासवें दिसे छाया । नाशितां नातुडे नाशावया ।
तेवीं स्वरुपीं मिथ्या माया । अतिदुर्जया देवांसी ॥१४॥
जेवीं देहासवें मिथ्या छाया । तेवीं ब्रह्मीं मिथ्या माया ।
कल्पनायोगें वाढली वायां । यालागीं ’अजया’ वेदशास्त्रें म्हणती ॥१५॥
राया कल्पना वाढे जे ठायीं । तेंचि मायेचें दृढ मूळ पाहीं ।
जो निर्विकल्प निजदेहीं । त्यासी माया नाहीं तिहीं लोकीं ॥१६॥
कल्पिती कल्पना जे राया । तेचि जाण मुख्य माया ।
आणीक रुपकें सांगावया । नातुडे माया निरुपणीं ॥१७॥;
तेचि त्रिविध मुख्यलक्षणीं । माया सांगितली विवंचोनी ।
आतां कोण्या अर्थींचे श्रवणीं । अत्यादरु मनीं वर्ते राया ॥१८॥
माया दुस्तर दारुण । ऐकूनि ऋत्विज ब्राह्मण ।
थरारले सभाजन । राजाही पूर्ण विस्मित जाहला ॥१९॥
नवल मायेचें रुपक । नाशूं न शकतीच ज्ञाते लोक ।
जिया गोंविले ब्रह्मादिक । इतरांचा देख पाडु कोण ॥२२०॥
माया आक्रमूनि शिवासी । तोही आणिला जीवत्वासी ।
ते माया तरवे दीनासी । तो उपावो यासी पुसों पां ॥२१॥
सुखोपायें दीन जन । दुस्तर माया तरती पूर्ण ।
तदर्थी राजा आपण । अत्यादरें प्रश्न श्रद्धेनें पुसे ॥२२॥