मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
शिवरायांचा गनिमी कावा

शिवाजी महाराज पोवाडा - शिवरायांचा गनिमी कावा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

ऐका ऐका शिव चरित्र, परम पवित्र, ख्यात सर्वत्र ।

धाडशी शिवाजीचा गनिमी कावा, शाहीस्तेखानाचा उडवी धुव्वा ।

शूर मर्दाचा पोवाडा गावा ॥जी जी॥

शिवबाचे शौर्य पाहून औरंगजेबानं, सरदार बोलावून,

भरविला दरबार एक मोठा, काढाया शिवाजीचा काटा,

कोण जाणार मर्द उठा ॥जी जी॥

मैं मैं जाता हूँ, असे बोलला शाहिस्तेखान, उठला गर्वान,

बोले गर्जून, मी ! मी करितो शिवाजीला ठार,

त्याविना नाही परत येणार, प्रतिज्ञा करी अशी अनिवार ॥जी जी॥

चाल

शाहिस्त्याच्या ऐकून बोलला, लई आनंद झाला बादशाला,

दाढीवरुन हात फिरवला, या सुभान अल्ला बोलला,

केला हुकूम बादशान त्याला, तीन लाख घेऊन फौजेला,

दारु गोळा घेऊन संगतीला, जाव तुम्ही दख्खन देशाला,

शिवबावर कराया हल्ला हुकूम घे तुजला ॥जी जी॥

लवून मुजरा बादशाला केला, आणि शाहिस्तेखान लढाया निघाला,

तीन लाख घेऊन फौजेला, पण मनामध्ये भ्यालेला,

अफझुलखान नुकताच मारलेला, वो शिवाजी हिकमतीवाला,

अचानक करिल हल्ला, म्हणून झोप नव्हती हो बघा त्याला,

पुण्यावरती हल्ला त्यानं केला, अन लाल महालामध्ये राहीला,

कडेकोट बंदोबस्त केला, चौभवती पहारा बसविला,

ही वार्ता कळली शिवबाला लाले लाल झाला ॥जी जी॥

चाल

जमवून सर्व मावळ्याला, शिवराय बोलू लागला ॥जी जी॥

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, जिथे आम्ही योजना केल्या ॥जी जी॥

देश धर्माच्या चिंतनी, झोपेवीण रात्री जिथे गेल्या ॥जी जी॥

त्या लाल महालात आज, खुनाच्या छावण्या पडल्या ॥जी जी॥

घेऊया तयाचा सूड, ज्या फौजा पुण्यामध्ये शिरल्या ॥जी जी॥

चाल

शिवराय सज्ज जाहला, चिलखत चढवी अंगाला,

त्यावरती झगा घातला, शिरस्त्राण चढवून डोईला,

मंदील भोवती बांधीला, डाव्या हातात बिचवा घातला,

उजव्या हाती धरल भवानीला, वंदन करुन अंबेला,

शिवराजा बाहेर पडला, सोडून घरा-दाराला,

देशासाठी प्राण देण्याला, स्वामीसाठी तयार मरण्याला,

असा मावळा घेऊन पाठीला शिवबा चालला ॥जी जी॥

चाल

दरी खोरी काळोख पडले, त्यातून दौड ती चाले ॥जी जी॥

एक लाख शत्रू कापाया, दोनशे वीर निघाले ॥जी जी॥

चाल

ते मर्द मराठे पूत, काळाते दूत, घुसले पुण्यांत,

काळ ही ज्याला दचकावा, धाडसी शिवाजीचा गनिमी कावा,

खानाला कसा ओळखावा ॥जी जी॥

निघाली होती तिथं वरात, त्या हो वरातीत,

सामील होत, खेळू लागले दांडपट्टा,

लाठी काठी भाला बर्ची विट्टा, कुणी खुणेच्या मारी शिट्टया ॥जी जी॥

चाल

त्यावेळी सावध झाले, लग्नातून बाहेर पडले,

लाल महालाकडे मग गेले, तटाला भगदाड पाडले,

बिन बोलता आमध्ये शिरले, कोण दिसेल तयाला चिरले,

सपासप तलवार चाले, निजल्या जागी कैक मारले,

रक्ताने भाले भरले, खानाचे पोर कापले,

तवा पहारेकरी धावले, त्यांना तिथल्या तिथें ठार केले,

कुठे लपला शाहिस्तेखान शोधू लागले ॥जी जी॥

चाल

दौडो भागो म्हणू लागले आया बे सैतान,

जो तो उठला पळत सुटला वाचवाया प्राण ॥जी जी॥

कोण कुठून आला कळेना झाले बेभान,

दास दासी रडू लागल्या बेगम ही जाण ॥जी जी॥

चाल

दासीला पुसें मराठा, दाखिव कुठें तो खान ॥

बेगमला पुसे मराठा, दाखिव कुठे तो खान ॥

स्वप्राणाच्या भीतिन, दाखिवला बोट करुन ॥

चाल

शिवराया धावून गेला, मारायला खानाला,

वार जरा चुकला, खानाचं दैव होतं मोठं,

तुटली बघा नुसती त्याची बोटं, पळून गेला खिडकी वाटं ॥जी जी॥

चाल

प्राणावर घाव झालेला, बोटावर निभावून गेला,

तवा खान घाबरुन गेला, या अल्ला अल्ला बोलला,

उठा, उठा सैतान आला, असा खान वरडू लागला,

तवा गोट जागा जाहला, शिवराय बोले सर्वाला,

घ्या मागे पाय आपला, आपला कार्यभाग साधला,

चला आता सिंहगडाला, शत्रूला घालूनी धाक शिवा--

सिंह गेला ॥जी जी॥

चाल

वाजू लागली वाद्ये खुणेची खिंडी--खोर्‍यांत,

एका एकी पोत पेटले कात्रज घाटात ॥जी जी॥

त्या खूणेवर शत्रू धावले दांत-ओठ खात,

पण इकडे शिवाजी सिंहगडावर सुखरुप जात ॥जी जी॥

आश्चर्य वाटे शत्रूला, कसा हा गेला, नाही उमगला,

धाडसी शिवाजीचा गनीमी कावा, शाहिस्तेखानाचा उडवी,

धुव्वा, कवी शाहीरांनी पोवाडा गावा ॥जी जी॥

N/A

References :

शाहीर : राजाराम सखाराम जगताप

Last Updated : April 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP