मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
सिंहगड

शिवाजी महाराज पोवाडा - सिंहगड

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


चौक १

धन्य शिवाजीतो रणगाजी धन्यचि तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥ध्रु०॥

देशमाजीं कहर गुदरला पारतंत्र्य जहरें ।

हलाहलहि या परदास्याहुनि झणिं प्राशितां बरें ॥

गोमातांची मान आणि ती शिखा ब्राह्मणांची ।

परदास्याची सुरी बंधु हो चिरी एकदांची ॥

देश हिंदुचा, हाय ! तयाचा मालक म्लेंच्छ ठरे ।

परि परमेशा फार दिवस हें रुचेल केविं बरें ॥

चाल

मग आर्य देशतारणा । अधम मारणा ।

कराया रणा । परदास्य रात्रि नाशाला ।

स्वातंत्र्य सूर्य उदयाला । शिवनेरीं श्रीमान्‌ झाला ।

त्या सूर्याचा किरण रणांगणि तळपे तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१॥

चौक २

ठायीं ठायीं वीर मराठा सरसावुनि भाला ।

रामदास मत छत्रपतीचा अनुयायी झाला ॥

स्वातंत्र्य श्री-तोरण, तोरण-गड अवघड पडला ।

भगवा झेंडा त्या भाल्यासह सरसर वर चढला ॥

प्रतापगडची शांत कराया स्वतंत्रता देवी ।

पुढती फाडुनि अफझुल्याला भग तो मग ठेवी ॥

चाल

ते धन्य मराठे गडी । घेति रणिं उडी ।

करुनि तांतडी । देशार्थ मृत्युही वरिला ।

शाहिस्ता चर चर चिरिला । गनिमांनि वचक बहु धरिला ।

झुरतो परि रिपु अजुनि नांदतो सिंहगडामाजीं ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥२॥

चौक ३

जरा लढाई पाहुनि वदली जिजा शिवाजीला ।

गड सर केल्याविण वरणें ना अन्न शपथ तुजला ॥

परके बाळा भूमातेला ते लाथा देतां ।

अन्न न गमतें गोमांसाचा घांसचि तो घेतां ॥

गुलामगिरिची बेडिच पायीं अशीच खुपतांना ।

गुलामगिरिच्या नरकामाजीं असेच पचताना ॥

चाल

निर्जीव अन्न कां रुचे । उदर शत्रुचें ।

फाड तेथिंचें । रक्तानिं भूक शमवावी ।

मांसानि भूक शमवावी । अतडयांनि भूक शमवावी ।

घ्या गड कड कड फोडुनि अधरां धावा ये काजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥३॥

चौक ४

धन्या माता जिजा तिलाची शिवबा सुत साजे ।

स्वतंत्र झाल्यावीण सुताला अन्नचि दे ना जे ॥

स्वातंत्र्याच्या सुखनीमाजीं जन्म स्वतंत्रांचे ।

गुलामगिरिच्या उकिरडयावरी गुलाम निपजाचे ॥

श्वानहि भरतें पोट बापुडें चघळुनिया तुकडे ।

शेणामाजीं बांधुनि वाडे नांदति शेणकिडे ॥

चाल

संसार असा जरि करी । मनुजता तरी ।

कशासी धरी । हो तुच्छ किडाचि न कां तो ।

जो गुलाम असुनी हंसतो । परदास्यीं स्वस्थचि बसतो ।

धिग् धिग् वदला श्री शिव घेउनि गड राखूं बाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥४॥

चौक ५

प्रभात झाली वाद्यें झडली मुहूर्त लग्नाचा ।

बोहल्यावरी उभा राहिला सुत तानाजीचा ॥

घटिका पात्रें मोजुनि द्विजगण शेवटच्या घटिला ।

दंगल सोडुनि मंगल व्हाया सावधान वदला ॥

वदला द्विज परि कुणि भेटाया तानाजीस आला ।

आला तो तों तरवारींनीं मंडप खणखणला ॥

चाल

तों हर हर एकचि झाला । चमकला भाला ।

म्हणति रे चला । शिवराय दूत पातले ।

हें लग्न राहुं द्या भलें । युद्धार्थ जनन आपुलें ।

लहान मोठा निघे मराठा पुढती तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥५॥

चौक ६

परमात्म्याशीं जीवात्म्याची तन्मयता झाली ।

वायुकुमर कीं रघुविरचरणीं मिठी पुन्हां घाली ॥

अरुणचि की श्रीजगन्मित्रवर सूर्या आलिंगी ।

आलिंगी कीं तानाजी श्रीशिवरायालागीं ॥

भेट जाहली मसलत बसली राया धाडिं मला ।

प्राणहि देईन, घेईन गड परि तानाजी वदला ॥

चाल

हें पर्व स्वातंत्र्याचें । शत्रु रुधिराचें ।

स्नान मज साचें । घडुं द्यावें हो शिवराया देशार्थ पडो द्या काया ।

जाईल ना तरी वाया । अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥६॥

चौक ७

शिवरायाच्या तीरा जा बा तानाजी वीरा ।

वीरामाजीं हो रणगाजी अरि मारुनि घोरा ॥

सिंहगडावरी तुझी आर्य भू फोडी हंबरडे ।

गुलामगिरीचा खून पाडण्या जा जा जा तिकडे ॥

देवदूत हो स्वातंत्र्याच्या पवित्र कार्याला ।

जातो आहे अमुचा ताना रक्षण व्हा त्याला ॥

चाल

हे मंगल तारागण हो । अप्सरा जन हो ।

गडावरि जा हो । तानाजि लढाया जातो ।

अरि फार, एकला कीं तो । परि धीर पुढेंची घुसतो ।

त्या धीरावरि वर्षा अमृत आणि फुलें ताजीं ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥७॥

चौक ८

मध्य रात्रिची वेळ शांत परि भयदायी थोर ।

गडा खालच्या झाडी मध्ये घन अंधःकार ॥

रात्रीलाही निद्रा लागे किर्र शब्द उमटे ।

करवंदीच्या एका झाळिंत तो ध्वनि घोर उठे ॥

"अहो मारिती पूर्वज तुमचे स्वर्गांतुनि हांका ।

अहो मराठे कान देउनी तुम्ही सर्व ऐका ॥

आई तुमची ही भूमाता पाठीवरी तिच्या ।

उठला चाबुक फुटल्या ना रे धारा रक्ताच्या ॥

या रक्ताच्या एका थेंबासाठीं लक्ष शिरा ।

अरिच्या कुटुनी मलम लावणें आईच्या शरिरा ॥

अस्सल जो जो बीज मराठा तो तो मज व्हावा ।

त्यानें येउनि, देउनि प्राणा, मजसह गड घ्यावा ॥

चाल

बाकीचे षंढ हो चला । गृहाप्रति वळा ।

बचावुनि गळा । गळसरी त्यांत घालणें ।

तें योग्य तयांना लेणें । तलवार करीं ना घेणें ।"
हर हर गर्जुनि सिंह झाडिंतुनि चवताळुनि ये जी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥८॥

चौक ९

रामा लक्ष्मण किंवा भीमा अर्जुन तो गमला ।

अपुल्या भावा सूर्याजीला तानाजी वदला ॥

कल्याणाचे दारामागें दबा धरुनि बसणें ।

शंभर घेउनि गडी दार मी फोडिन लाथेनें ॥

शंकित कां हो, हस्त, मस्तकें लढतां जरि पडतीं ।

धडें तथापि दार फोडितिल पार आमुची तीं ॥

चाल

हें कार्य आमुचे ठरे । बाकि जें उरे ।

तें करा पुरे । किल्ल्यांत शिरुनि तें खानीं ।

आणि तुम्हीं वीर मर्दानीं । हां निघा चाललों हा मी ।

जा तरि येशिल परत भेटण्या केव्हां तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥९॥

चौक १०

दरड उभट बहु चढणें मुश्किल घोरपडीलाही ।

म्हणुनि पहारा तिथें गडावरि मुळिं नव्हता कांहीं ॥

साधुनि ही संधी तानाजी तिथें नीट आला ।

सज्ज नव्हे चढण्यासि हवेमधिं उडण्यासी झाला ॥

कोणी वदतां, ’पाय निसरतां अहा ! काय होई ।’

वदे ’शूर देशार्थ मरोनी स्वर्गाप्रति जाई ॥’

चाल

यशवंती सरसर चढतां । हर्ष हो चित्ता ।

सोल घे हातां । तानाजि चढूं लागले ।

सद्‌भाग्य चढूं लागले । स्वातंत्र्य चढूं लागलें ।
सांभाळी रे म्लेंच्छा आतां आला तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१०॥

चौक ११

एकामागुनि एक मराठा सरसर वर चढला ।

दहा हजारावरि रिपु असुनी चढविति ते हल्ला ॥

कोण कोठुनी किती आणखी कसें कुठें लढलें ।

दडले अंधारीं रिपु अपसामधिं झुंजुनि पडले ॥

खालीं वरती मागें पुढती आजूबाजूनीं ।

सैरावैरा पळतां मारिती भाला भोंसकुनी ॥

चाल

तो मर्द मराठा गडी । शत्रुंचीं मढीं ।

हजारों पाडी । तुडवीत चिखल मांसाचा ।

पोहुनी पूर रक्ताचा । दे मार करित ये साचा ।

कल्याणाचें दार धडाडे झाली रे बाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥११॥

चौक १२

झाली बाजी परि तो कोठें आहे तानाजी ।

मारित काटित छाटित चढला रणरंगामाजीं ॥

उदयभानु तो नजरे पडतां घे घे मार उडे ।

झुंज झुंजतां नजरा फिरल्या गर्जे सिंह पुढें ॥

सह्याद्रीच्या वाघा शेळी उदयभानु खाशी ।

खान आपुल्या बापा म्हणतो मी रजपुतवंशी ॥

धिक्‌ धिक्‌ नीचा लाविसि वंशा लाज रजपुतांच्या ।

श्रीकृष्णाच्या श्रीरामाच्या प्रतापसिंहाच्या ॥

मुसलमान कां बाप तुझा जो लढसी आम्हांसी ।

आर्यभूमिला मुक्त कराया जे झटती त्यांशी ॥

वदोनि पुनरपि तुटोनि पडला जरि तो श्रमलेला ।

उदयभानुचा वार मर्मिंचा अवचित तो बसला ॥

चाल

मूर्च्छना तया भीतरी । पातकी खरी ।

वीररसशाली । तानाजी खाली येतो ।

तो धैर्य मेरु उसळीतो । शिवकरिचा भाला गळतो ।

भूमातेच्या मांडीवरती पहुडे तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१२॥

चौक १३

पडतां ताना आणि मराठे बंधू पळतांना ।

सूर्याजीची सिंहगर्जना भय देते कर्णा ॥

’अरे चालला सांगा कोठें सर्व मराठे हो ।

भाला ठेवा भरा बांगडया मग पुढती जा हो ॥

बाप तूमचा मरुनी पडला येथें लढतांना ।

परत जाउनी नरकी ढकला अपुल्या पितरांना ॥

जाउं इच्छितां काय धरोनी अपुल्या दोराला ।

अहो षंढ तो दोर मघांची तुटोनीयां गेला ॥

चाल

धिक्कार शब्द उठले । पुन्हा परतले ।

मराठे भले । घनधोर युद्ध मातले ।

वीरासि वीर तो भिडे । देशार्थ मराठा लढे ।

धमार्थ मराठा लढे । त्यांना घुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१३॥

चौक १४

’अहो धरा तो अधम घातकी मातृघातकी हो ।

चला चला हो त्या ठायाला अन्य विषय राहो ॥

सर्व मराठा लोटे तिकडे घ्याया सूडाला ।

उदयभानु परि अधींच कोणी वर कां पाठविला ॥

त्याच्या रक्तीं भिजवुनि फडका केला झेंडा तो ।

स्वातंत्र्याचा विजयध्वज जो अजुनि तिथें डुलतो ॥

चाल

तानाजिकडे जन वळे । दाटले गळे ।

वाहती जळें । तानाजि कांहींसा उठला ।

जय पाहुनि ’हर हर’ केला । ’देशार्थ मरें मी’ वदला ।

मागुति पडला आतां कैंचा उठतो तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१४॥

चौक १५

मग त्या गडची भूमी ठेवी तानाजिस उदरीं ।

तेव्हां पासुनि रत्‍नाकर बहु तीचा द्वेष करी ॥

स्वातंत्रतेच्या रणांत लढतां स्वतंत्रतेसाठीं ।

त्या पक्षाचा कैवारी श्री मुरहर जगजेठी ॥

देशाला हो धर्माला हो स्वातंत्र्याला हो ।

बा तानाजी सूर्याजी श्री शिवरायाला हो ॥

धन्य मराठे पुनीत झाले अरि-रुधिर स्नानें ।

आणि ’विनायक’ त्यांच्या नामें यशःसुधापानें ॥

असो समाप्ती छत्रपतीच्या सरस्वतीमाजीं ।

’गड आला परि सिंह चालला’ अमुचा तानाजी ॥

धन्य शिवाजी तो रण गाजी धन्यचि तानाजी ।

प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP