मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
स्वराज्याचे तोरण

शिवाजी महाराज पोवाडा - स्वराज्याचे तोरण

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

आई जिजाई वंदन माझे तुझिया चरणाला ।

तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला ॥

होम देहाचा ज्याने केला स्वदेश कार्याला ।

असो शाहिरी मुजरा माझा श्रीशिवरायाला ॥

गद्य

(युगायुगात भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो;

त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.)

छत्रपति शिवाजी वीर । पराक्रमी धीर ।

खरा झुंझार । हिंदी स्वराज्य स्थापाया खास ।

स्वराज्याच बांधल तोरण तोरण्यास ।

ऐका हा स्फूर्तिदायक इतिहास ॥

विजापूरचे यवन माजले । वर्चस्व आपले ।

गाजवू लागले । न्याय नाही अन्यायाचा बाजार ।

साधुसंतांची विटंबना फार । वैतागुन गेली जनता अनिवार ॥

चाल : बाणा मर्दानी

शिवरायाचे वडील शहाजी राजे समयाला । विजापूरी होते नोकरीला ॥

त्यांनी नेले विजापूरी या बाल शिवाजीला । बादशाही दरबार पहाण्याला हो ॥

चाल : कटाव

विजापुरी बाल शिवाजीला । भलभलता प्रकार दिसला ।

कोण मानीत नाही कोणाला । माणुसकी नाही माणसाला ॥

हे कळता सर्व शिवबाला । येऊन परत पुण्याला ।

हिंदवीराज्य स्थापण्याचा निश्चय केला । आई जिजाईने दिला आशिर्वाद शिवबाला ॥

विजापूरच्या यवनी सत्तेला शह देण्याला । त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला ॥

स्वराज्याच तोरणा बांधण्याचा मनसुबा केला ॥

मिळवणी

कानद खोर्‍यात तोरणा किल्ला । दरवाजे पाहा ।

दोहो बाजूला । एक पुण्याच्या उत्तरेला ।

बिनीदरवाजा म्हणती याला । कोकण दरवाजा पश्चिमेला ॥

सह्याद्रीच्या कडे पठारात । दर्‍याखोर्‍यांत ।

वाडया वस्त्यात । स्वराज्याच महत्व पटवून सर्वांस ।

शेकडो मावळे बाल शिवबास । येऊन मिळाले साह्य करण्यास ॥

चाल : जी जी जी

त्यांत बाजी तानाजी फिरंगोजी नरसाळा ।

एकाहुन एक मावळा घेऊन शपथेला ।

शिवाजीच्या हुकमती खाली उभा राहिला ॥

गद्य

(यावेळी उत्तरेकडे बलाढय मोगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्धी इतक्याशी मुकाबला करुन स्वराज्य स्थापणं सोपं नव्हतं पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोमरोमांत भरली होती म्हणूनच---)

कटाव

वंदन करुन भवानीला । जिंकाया तोरणा किल्ला ।

शेदोनशे मावळे संगतीला । शिवराय घेऊन चालला ।

अंधार्‍या रात्री किल्ल्याचा तळ गाठला । किल्ल्यावर चढून जाण्याला ।

मारुनीया मेखा बुरजाला । पागोटे बांधिले त्याला ।

हा हा म्हणता मावळा चढून वरती गेला । गर्जना केली हरहर महादेव बोला ॥

गद्य

(अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करुन उभा राहिला. तोच शिवाजीने किल्लेदाराला घेराव घालताच-----)

कटाव

किल्लेदार शरण आला । बिनशर्त तोरणा किल्ला ।

शिवबाच्या स्वाधीन केला । यावेळी पंधरावे वर्ष होते शिवबाला ॥

चाल : कोल्हापूरचा शाहीर

तोरणा किल्ल्यावरती पहिला बिनी दरवाज्याला ।

महाराष्ट्राचा विजयी भगवा झेंडा फडकला ॥

मिळवणी

स्वराज्याच बांधलं तोरण । तोरणा जिंकून ।

शिवाजी राजानं । सारा सह्याद्री गर्जत उठला ।

जय शिवाजी राजा आपला । शाहीर पिराजीचा मुजरा त्याला ॥

N/A

References :

शाहीर : पिराजी सरनाईक

Last Updated : April 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP