रायगडची सांगतो थोरी--ऐका तुम्ही सारी गोष्ट एक घडली त्या रायगडला----
ऐकताना नवल वाटे मजला--सुरवात करतो पोवाडयाला -जी-जी---(१)
छत्रपती होते गडवरी--पुनव कोजागिरी--समारंभ घनदाट भरला
आनंदाने गड सारा फुलला---किती वर्णावे प्रसंगाला --जी---जी (२)
एक खेडे होते शेजारी--गड पायतारी---गौळी लोक रहात होती गावाला---
नित जाती दूध विकण्याला--नेहमीचा परीपाठ त्यान्ला-जी-जी---(३)
गौळी लोक गेले गडावरी--दूध डोईवरी --हाळी ते देती गिरायकाला --
झटदिशी दूध विकण्याला---विकून ते येती परत घरला जी--जी (४)
चाल दुसरी
त्याच गावी होती गौळण -- नाव तिचे हिरा हे जी जी
बेगीबेगी निघाली गडावरी -- काढुनीया धारा हे जी-जी
दुसरी गौळण बोलती तीला--झाल का ग हिरा हे जी-जी
हिरा म्हणते तुम्ही जा पुढे-येती मी उशीरा हे जी-जी
पाळण्यात बाळ घालूनी --लावीते निजरा हे जी-जी-
चाल तिसरी-हिरा बाळाला झोपविते
हिरा बोले निजनिज बाळा-तुला लागू दे आज डोळा
गडावरी गौळ्याचा मेळा--दूध विकाय झाले गोळा
कोजागिरी पुनवेचा सोहळा-मला जावू दे लडीवाळा
चाल पहिली
हिरा गौळण निघाली गडावरी--चरवी डोईवरी
जाता जाता सांगे म्हातारीला --झोक्यामधे बाळ झोपवीला
उठला तर घेवून बसा त्याला-दिस मावळायला येते घरला जी (५)
चाल तिसरी
हिराबाई गेली गडावरी--दूध घेणारी पांगली लोक सारी
दूध घ्या हो म्हणती कुणी तरी-आशी हाळी देती गडावरी
दिस मावळून गेला बगा तरी-हिरा दूध विकण्याची गडबड करी
निघाया घरला जी-जी (६)
चौकीदार दरवाज्यावरी-दिस मावळाय दार बंद करी
हीरा आली दरवाजावरी-पहाती हालवून दारे सारी
चौकीदार होते शेजारी-हिरा बोले त्याना सत्वरी
मला जायाच हाय बगा घरी-बाळ माझा तान्हा हाय घरी
कुनी न्हाय घियाला जी-जी (७)
चौकीदार तिची समजूत करी-महाराजांचा हुकूम आमच्यावरी
आम्ही हूकमाचे ताबेदारी-आशी गोष्ट गेली त्यांच्या कानावरी
न्हेत्याल टकमक टोका वरी-मुकू प्रानाला जीर हे जी-जी (८)
हिराबाई विनंत्या करी--पण ऐकेना पहारेकरी
हिरा मनात कष्टी भारी--बाळ दिसे तीच्या समोरी
हिरा गडावर घिरटया मारी--फिरुनी वाटेचा शोध ती करी
आवरी मनाला जी-जी (९)
चारी बाजूला मारुन फेरी-भरली उबळ मायेची उरी
गाय वासराला चुकली पाखरी--पक्षा सारखी मारावी भरारी
पडती डोळ्यातून आसवाच्या सरी-दुध न्हाय तिजला-जी-जी (१०)
ठाम विचार केला अंतरी--हिराबाई गेली बगा कडयावरी
म्हणे देवा तू धाव लौकरी - आले संकट माझ्यावरी
माझे रक्षण तूच आता करी-विनवी देवाला जीर हे जी-जी (११)
कडयावरुन खाली ती उतरी-उतरताना पाय तिचा घसरी
तरी धिरान तोल सावरी-झाडाझुडुपांचा ती आसरा करी
गेली तळाला जीर हे जी-जी (१२)
चाल १ ली
हिराबाई गेली तेव्हा घरी--बाळ मांडीवरी
शेजारीण घेवून बसली बाळाला-हिराने उचलुन घेतला त्याला
पोटाशी धरुन कुरवाळीला --आईला पाहून बाळ हासला जी-जी (१३)
हीच गोष्ट कळाली गडावरी--लोक नवल करी---
छत्रपती शिवाजी महाराजांन्ला-हकीगत सांगी लोक त्यान्ला
हिराने गड सर केला जीर हे जी-जी (१४)
छत्रपती हिरा सामोरी--उभी दरबारी
महाराजानी बक्षीस दिले तिजला-त्याच कडयावरी बुरुज बांधला
हिराचे नाव दिले बुरजाला-हिरकणीचा बुरुज म्हणती त्याला
हिराचा पोवाडा संपवीला जीर हे जी-जी (१५)
खेतर शाहीर कविता करी-करुनी शाहिरी---
श्रद्धांजली वाहतो हिराबाईला-सीमा नाही तीच्या धाडसाला
मानाचा मुजरा छत्रपतीला-नमस्कार करतो मंडळीला जी (१६)