मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
शिवदर्शन

शिवाजी महाराज पोवाडा - शिवदर्शन

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

(चाल : अलंकार)

अलंकार दिव्य पृथ्वीचा, विश्व मोलाचा,

कीर्ति किरणांचा । संगती सूर्य चंद्रमाचा,

छत्रपति वंद्य हिन्दभूचा । प्राण शिवराया मराठयांचा ॥

इतिहास काळाला गती, देई उगवतीं, ज्याची संस्कृती ।

प्रथमतः लोक स्वराज्याची, अतुल अवनी युगपुरुषाची ।

सांगतों जन्मकथा त्याची ॥ ती धन्य वीर माऊली,

वनीं प्रसवली, ’हिन्द भू मौली’, पतिवर असतां रणघाई,

रणीं गर्भाचा भार साही । स्वराज्यमाता जिजाबाई ॥

(चाल : दौड )

त्या शूर जनक जननीचा त्रिलोकी डंका ॥

ज्यांनीं दिला शिवाजी राजा आम्हांला बांका ॥

हा त्रिवार मुजरा करुन हिन्दी लोकां ॥

गातो ’आत्माराम’ इतिहास पवाडा ऐका ॥

बहामनी राज्य मोडले, त्याचं पांच तुकडं जाहलं, नांव त्यांचं एक एक भलं ।

कुतूबशाही ? गोबळकोंडयाची ! बारीदशाही ? बिदर शहराची ! इमादशाही ?

वर्‍हाडी मुलखाची ! आदिलशाही ? विजापूराची ! आणि पांचवी ?

आणि पांचवी निजामशाही ती अहमदनगराची ॥

जिथं चांदबीबी झुंजली महाराष्ट्राची ॥

चाल : अलंकार

हें राज्य अहमदनगर, सुलतान गादीवर, कवळं होतं पोर ।

इसवी सोळाशें सव्वीस साला । कारभारी मलिकंबर मेला ।

शहाजी भोंसला त्राता उरला ॥

(चाल : दौड)

इतक्यांत गिळाया निजामशाही मुलखाला ॥

उलटून आला दिल्लीचा मोंगली हल्ला ॥

जो शहाजीनं एकदां होता चोपला ॥

डिवचला साप वळचणींत होता टपलेला ॥

डाव जुना होता शत्रूचा, मुत्सद्दी भेट नीतिचा ।

संकटी घाला घालण्याचा । शूरवीर शहाजी राजाचा ।

सासरा सख्या नात्याचा । जागीरदार सिंदखेडचा ।

माजी नोकर निजामशाहीचा । त्याचं नांव लखुजी जाधव बाप जिजाईचा ॥

ज्याचं धन, त्याच्यावर मनं ! अशा द्यानतीचा ॥ मोंगलांनीं कारस्थान केलं ।

जाधवाला त्यांनीं फितवलं । ’चोवीस हजार’ मनसुबा केला बहाल ॥

मोठया सरंजामदारीचे डबोलं दिलं ॥ पाहून म्हातारं चुटकन्‌ लाल चावलं ॥

दक्खनचे मीठ विसरलं, जाधव आक्खं घसरलं । शत्रूनं कासरं लावून सासरं बांधलं ॥

सासर्‍यानं जांवई सोडून बंड उचललं ॥ जावयानं सासर्‍यासंगं दंड थोपटलं ॥

चाल : स्फूर्ति

सासरा लखुजी जाधव मिळे मोंगलां ।

जांवई शहाजीराजा त्राता निजामाला ।

दारच्या शत्रुंनीं घरांत दावा लाविला ।

राखाया बाळ निजामाला, शहाजी भोंसला,

पणा लागला, ऐका कवनाला ॥

चाल : वीरश्री

महाराष्ट्राची मुस्लीमगादी वांचविण्यासाठीं ।

हिन्दु-मुस्लीम ऐक्य साधलें ध्येय हें मराठी ॥

शहाजीनं विचार मग केला । घेतलं बाळा निजामाला ।

आणि त्याच्या विधवा मातेला ।

चाल : दौड

घेऊन फौज दरबार त्यानं सोडला ॥

वीर-पत्‍नी बाई जिजाई होती संगतीला ॥

पुढं पति मागं दुश्मन बाप लागला ॥

काय करावं अशा समयाला ?

सुपारीवर आडकित्ता आला !

चाल : वीरश्री

दुजी रुक्मिणी विदर्भाची ती महाराष्ट्रमानी ॥

भ्रष्ट पिता विसरुन पतीसह निघे स्वाभिमानी ॥

चाल : दौड

दर मजल करीत हा सेनासिंधु चालला ॥

चाललं लाव लष्कर बांधूनी ढाला ॥

ठाणें जिल्ह्यांत थेट माहुलीचा किल्ला गांठला ॥

चाल : अलंकार

ठाणें जिल्ह्यात शहापूरवरला, कडेकोट भला, माहुली किल्ला ।

कसारा घाटाच्या डोंगराला । काळा पाषाण आहे मढला ।

निळ्या गगनाला उभा भिडला ॥ शूरवीर शहाजी राजानं,

मांडलं सैन्य, दाणावैरण । दारुगोळा समदा वरती भरला ।

शत्रुचीं मुंडकीं उडविण्याला । ठेवला चौफेर खडा भाला ॥

चाल : रणघाई

आलं, आलं ! आलं मोंगल सैन्य माघारीं आलं धडधडा ॥रं मर्दा॥

घेरलं ! घेरलं रान चौफेरी ! चौफेरी घेरलं गडा ॥

रणशिंग ! रणशिंग वाजे रणभेरी !

रणभेरी तोफा धडाधडा ॥ खणखणती ! खणखणती ढालतलवारी !

तलवारी पट्टा फडफडा ॥

खिंकाळे ! खिंकाळे घोडा लष्करी ! लष्करी दणाणे कडा ॥

लावी सुरुंग शत्रु खालीं । तटावरची आग ये भालीं ।

साथ

त्याचा जिताच भाजून हुरडा झाला खालीं ॥

शत्रुची तटाला शिडी । शिडीसहित ढकलावा गडी ॥

साथ

त्याची उभ्या कडयाच्या दरींत तिरडी गेली ॥

जो शत्रु पायाला भिडला । उकळता पाणी वर पडला ॥

साथ

पाण्याची धार मुडद्याच्या हाडांना चढली ॥

जो शत्रु तटावर चढला । आरपार कंठांतून भाला ॥

साथ

त्याच्या मुंडकं आणि देहाची फाळणी झाली ।

चाल : विजया

आगीचे लोळ किती यावं । थबकावून धूळ विझवावं ॥हे दाजी र॥

किल्ल्याला उलटं फेकावं । रानसिंग शत्रु जाळावं ॥

शत्रुच्या वेढया बाहेर । अंधारांत आमचं हेर ॥

जाळीतनं चंद्र निघणार । शीर छाठून गारोगार ॥

दोन्हींकडून खाऊनी मार । झालं मोंगल जर्जर फार ॥

खालीं वणवा वरती धूर । आंत रणाचा हाहाःकार ॥

चाल : स्फूर्ति

घनघोर चाले संग्राम किल्ल्याच्या भंवतीं ।

तोफांनीं हादरे ठाणें जिल्ह्याची धरती ।

नरमांस खावया गगनीं गिधाडें फिरती ।

सहा महिने चालला लढा, उठेना वेढा, किल्लाहि खडा, झुंजवी छाती ॥

पाहून शहाजीचा जोर, सासरा चोर, मोंगल सरदार, लखुजी जाधव गार झाला ।

लढाई करण्याचा जोम सरला । कपटाचा खेळ सुरु झाला ॥

चाल : हळहळ

जाधवानं डाव फिरविला ॥जी॥

भेटे निजामाच्या आईला ॥जी॥

लाघवी बोल बोलला ॥जी॥

"बाईसाहेब ! कां सोसतां यातना जीवाला ?

करा तह मिळा मोंगलां । तुम्ही अहमदनगरला चला,

देतों राज्य तुमचं तुम्हांला । मी रहातों तुमच्या दिमतीला ।

माझा शब्द लाखाच्या मोला । हा स्वार्थि शहाजी भोंसला ॥जी॥

तो गिळील तुमच्या मुलखाला ॥जी॥

त्याचा काळा डाव साधण्याला ॥जी॥

तुमच्या आमच्यांत तंटा लावला ॥जी॥

फंसूं नका ! फंसूं नका, अशा प्रसंगाला ! सावधान !

देतों इशार्‍याला !" अशी ऐकून बात, काय सांगूं मर्दा मात,

भोळी बायांची जात । पाघळून देई हात लखुजीला ॥ जी॥

परक्यांचा शब्द ऐकला, टोचून बोले घरच्याला । तिचा शब्द विषारी आला,

झोंबला शहाजी राजाला । झाली फितूर शत्रूला बाई, धन्याची आई,

बघा धन्यापायीं । शहाजी, दुष्मनाशीं लढला । धनीच तो शत्रुस वश झाला ।

इमानाची दुनिया नाहीं बोला ॥ माहूली डोंगरी किल्ला ।

घनदाट रान भंवताला । रणरंग भंग जाहला ।

किल्ल्याभंवतीं लढाई, तटावर हातघाई, आंत होती जिजाबाई ।

सात महिनं गेलं होतं तिला ॥जी॥

गरोदर जिजाबाईला । जरि सातवा महिना चालला ।

तरी दगड, माती, चिंचा खा नव्हता असा डोहाळा ॥जी॥

ऐका हो, डोहाळं कसं जिजाबाईला ॥

चाल : दामिनी

बुरजावर झुंजे भरतार, तिरकमठं चालवी नार ॥

चिलखतं तंग अंगाला, कुठं बत्ति देई तोफेला ॥

धुमधडाम धूर गगनाला, त्या धुरांत चमके चपला ॥

आईची माया घायाळा, दे स्फूर्ति लढणार्‍याला ॥

चाल : वीरश्री

मूर्तिमंत ती समर वीरश्री चेतविते किल्ला ।

मुक्ति रणाचे शौर्य डोहाळे तिथें जिजाईला ॥

मातृगुणांची कूस घडविते उदरीं बाळाला ।

स्वराज्यकर्ता रणमर्दिनीच्या कुशींत गुण शिकला ॥

चाल : चिंता

फितुरीनं केला घात, राजावर शत्रुचा दांत ॥

आलं मरण उद्यांच्या आंत । कशी टळत आजची रात ॥

झालीं दोघं चिंताक्रांत । सटकायचा केला बेत ॥

चाल : समता

सटकायचा बेत जरी केला शहाजी राजानं ।

तरी इतिहासकार होतं वीरांचं ध्यान ।

थांबतां इथं किल्ल्यांत निकामी मरण ।

पण फरार होतां म्हणतील बेईमान ॥

बेईमान ॥ सांकडं सोडवायला, राजानं मार्ग काढला,

आपुल्या सख्या भावाला ॥ शरभोजी भोंसला याला,

हा प्रसंग समजाविला । भावानं हात पुढं केला,

लक्ष्मण बोले रामाला । तुम्ही खुशाल लागा वाटेला,

ही स्वामिनिष्ठेची तुला, भारोभार पुरी करण्याला ।

वाहीन प्राण आपुला ।

चाल : दौड

बोलतां दोन्ही भावांचा गहिंवरे गळा ॥

शरभोजी राही किल्ल्यांत स्वामिनिष्ठेला ॥

आगींत एक; फोफाटा नेई दुसर्‍याला ॥

माउली जिजाबाईला, एक बाळ पहिला चिमुकला,

होता चार वर्षांचा झाला । नांव होतं संभाजी त्याला !

तोही छावा संगं घेतला, निवडक वीर जोडीला ।

तलवार, भालं हातांत ! पाठीला ढाला ॥

एक त्यांत वायुवेगाचा वारु निवडीला ॥

जाहली जिजाई स्वार घोडा नाचला ॥

अन् समद्या वीरांनीं लगाम तंग ओढला ॥

फुरफुरलं घोडं ! दरवाजा जरा करकरला ॥

चाल : अलंकार

रणधीर शहाजी राजानं, केलं उड्डाण, रात्र भिणभिणं ।

वेढा फोडून घोडा सुटला । टापांच्या विजेत मार्ग दिसला ।

आडवा फिरला तो उभा चिरला ॥ भरधांव वारुवर स्वार ।

जिजाबाई शूर, कटीं तलवार । रिकिबींत पाय लगाम हातीं ।

हिन्दस्वराज्याचा ठेवा पोटीं । घेऊन दौडली सांबशक्ति ॥

घोडयांनीं तुडविती अंगा, शत्रु झाला जागा, जो तो करी त्रागा ।

’पकडो रे दौडो शहाजी भागा ।’ लेक-जांवई गेल्या मागा ।

सासरा लागला पाठलागा ॥

चाल : दौड

धडधडा शहाजी राजा पुढें चालला ॥

विजापूरच्या आदिलशहाची साथ घेण्याला ॥

माहुली विजापूर पल्ला । तीनशें मैल तो भला ।

दिसरात नाहीं पाहिलं ! मार्ग तुडविला ॥

महाराष्ट्र-धरणीचा रोमरोम शहराला ॥

तरुकडी कपारीनं आड पहारा दिला ॥

तितक्यांत आडवाटेनं पल्ला काटला ॥

पण घरचा बगळा पांढरा उडतो गगनाला ॥

त्याला हेरुन मोंगल सेनेनं माग काढिला ॥

चाल : वीरश्री

पुढं चालला महाराष्ट्राचा शहाजी रणधीर ।

मागं लागली मोंगलसेना प्रचंड दळभार ॥

पतीसवें ती फेकीत घोडा जिजाई गर्भवती ।

दौडत होती फर्लांग मारीत सह्याद्रीवरती ॥

घौडदौड शिकविली बाळाला आईनें उदरीं ।

अश्वपाळणा झोकित होती शौर्याची दोरी ॥

चाल : स्फूर्ति

लागला पाठीला क्रूर शत्रु सेनानी । पुढें उभे दरी डोंगर उतरणी ।

त्या ओलांडीत दौडली राष्ट्रनंदिनी । रखरखीत उन्हाच्या झळा,

नाहीं सवड पाणी पिण्याला । किती दगड धोंडा तुडवीला ।

दौडली मैल शंभर, दुखावे उदर, थांबले वीर, खुल्या मैदानीं ॥

चाल : गजगामिनी

बाईचा अश्व थांबला कांस कंठाला, श्वास कोंडला, आली अंधारी ॥

डबडबला घाम अंगाला, जोम संपला, लगामहि सुटला, राजा सांवरी ॥

पाठीस शत्रुचें दळ, उडवितें धूळ, भरलें आभाळ, पाही माघारी ॥

पोटास गर्भाची कळ । चालवेना एक पाऊल । झाली जिजाबाई व्याकुळ ।

जर भिडला शत्रु येऊन, अटळ त्यातून, पतीचें मरण, आठवे नारी ॥

काळजाचें पाणी झालें । डोळ्यांचे इंगळ बनले । धगधगते अश्रु गळले ।

चाल : वीरश्री

क्रोध अनावर वीरांगनेची थरथरते काया ।

तप्ताश्रूंत दाखवीते पतीला गर्भाची माया ॥

ती महाराष्ट्र रागिणी, हा कठिण समय देखुनी ।

बोलली वीराला रमणी ।

चाल : स्वयंसिद्धा

तुम्ही चला पुढें प्रिय नाथा । सोडून पंथिं मज आतां ॥

सौभाग्य वांचवा माझें । वांचवा महाराष्ट्राचें ॥

ग्रासाया येती काळ । चुकवा हो चुकवा वेळ ॥

चाल : मौलिक

ते जिजाबाईचे बोल । मोलाचे, मोलाचे ॥

संकटांत सेनानीच्या । तोलाचे, तोलाचे ॥

राखती तिथें अवधान । राजाचें, राजाचें ॥

चाल : अलंकार

राजाला सुचला विचार । जवळ एक शहर,होतं जुन्नर ।

तिथं एक होता मित्र दिलदार । नांव श्रीनिवासराव सरदार ।

स्वतंत्र होता मुलूख परिवार ॥ मित्राला हवाला दिला ।

जवळ आहे भला । शिवनेरी किल्ला । उंच कडणीच्या डोंगराला ।

किल्ल्यांत ठेवलं जिजाईला । धन्य तो मित्र तैनातीला ॥

चाल : समता

सोबती ठेविला बाळकृष्ण हणमंत ।

सोनाजीपंत नी शामराव नीलकंठ ।

रघुनाथराव बल्लाळ मर्द गुणवंत ।

सैनिक पांच पंधरा धीराला देत ॥

गर्भार अस्तुरी ठेवुन शिवनेरींत ।

गांठणें विजापूर केला पुढचा बेत ॥

परि वियोग दुःखें व्याकुळ बनले चित्त ।

अन प्राण उभे राहिले चार डोळ्यांत, चार डोळ्यांत ॥

चाल : वीरांगना

त्या मरणाच्या मार्गांत । जिवनाचे निरोप झाले ॥

संभाजी सवे घेऊन । राजश्री स्वार निघाले ॥

दाटला कंठ बाईचा । अश्रूंतून शब्द उमटले ॥

’सांभाळून जाहो नाथा । भेटूं किं न भेटूं आतां ।

तारील भवानी माता ॥’ ते दोन जिवांचे बोल ।

तिसर्‍या हृदयाला पटले ॥ धरणींत बीज अंकुरतां ।

अभ्रानें सूर्या गिळलें ॥ लतिकेला फळ जों धरलें ।

वृक्षावर वादळ आलें ॥ तें स्वराज्य गर्भी असतां ।

पारतंत्र्य भंवतीं फिरलें ॥ तोडाया त्याचा पेंच ।

सोसून दुःखाची आंच । घोडयास मारिली टांच ।

तोडून बेडी मोहाची । कर्तव्य फरारी झालें ॥

चाल : अलंकार

गेले सोडून शहाजीराजे, तडफ ऐसाजे, विजापूर मौजे ।

राजाची नव्हती पाठ फिरली । तोंच मागं मोंगल फौज आली ।

जुन्नर गांवाची जिद्द कळली ॥

चाल : छक्कड

सासर्‍याच्या हातावर तुरी, दिल्या शिवनेरी, ठेवुन अस्तुरी, फरार जांवई ।

हे कळलं सासरोबाला । लखू जाधवाला । चेहरा उतरला, देतो जांभई ॥

रग जिरली पाठलागाची । वैरी बापाची, आतां लेकीची आठवण झाली ।

भेटाया जिजाबाईला । किल्ल्यावर गेला । पाहून पोरीला । आंसवं आलीं ॥

त्या उंच डोंगरी गडांत, तटाच्या फडांत जिजाई होती ।

किल्ल्यांत नव्हे म्यानांत रक्त समशेर कोंबली होती ॥

पाहून तिथें लेकीला, उमाळा आला, पुढें जाण्याला, पाय लटपटती ।

जरि पोटीं मायेची ओढ, काळं थोबाडं, थांबलं घुबडं, देखतां ज्योती ॥

ती खंबीरतेची गंभीर मुद्रा खोंचक भेदक दृष्ठी ।

जणुं व्याधासाठीं जखमी वाघीण जाळींत टपली होती ॥

थरथरे बापाची काया । उफाळे माया, हांक माराया, फुटेना कंठ ।

ती स्वाभिमानी नंदिनी, पिता पाहुनी, संतोषे मनीं, झाली आरक्त ॥

ती पतिविरहाची विव्हल संध्या सु-रक्तलोचन दिसली ।

अन् गर्भित रविची अरुण गुलाली मिश्रित विलसे गालीं ॥

बापाला हुंदका आला, अनावर झाला, बोले लेकीला, शब्द अडखळले ।

बोलतां कंप कंठांत, कंप ओठांत । अश्रु नयनांत । मायेचे भरले ॥

(लखुजी जाधव---) जीजाऊ ! बाळ गुणवंती । धन्य तूं सती, फिरली माझी मती,

कष्ट तुज पडले । युद्धाचा कैफ विषारी, जाहलों वैरी, क्रोध आवरीं, क्षमा कर बाळे ॥

मी पिता निर्दयी क्रूर । विसरुनी पोर, शत्रूचें घर, स्वहस्तें भरलें ।

तूं पतिपितयांचें कूळ । केलें उज्ज्वल, मीच चांडाळ क्षमा कर बाळे ॥

तूं गर्भवती अति कोमलं माझ्या वनांतली कर्दळी गे ।

परी मीच तुला गांजिलें हाय ! परचक्राच्या वादळी ॥ क्षमा कर बाळे ॥

तूं सिंहीण महाराष्ट्राची व्याकुळ उदरीं प्रसूति कळ गे ।

मी तुझ्याभोंवती सह्यवनाला झालों वडवानळ ॥

क्षमा कर बाळे ॥ गे तुझ्या अर्धवचनांत ठेविल्या अनंत सजणी दासी गे ।

पण मीच आज डोंगरीं गडावर केलें तुज वनवासी ॥क्षमा०॥

तूं चंद्र-कलेंतील सुहास्य शालीन चंद्रमुखी कामिनी गे ।

परि आ गमे संतप्त मेघलक्तरांत सौदामिनी ॥क्षमा०॥

तूं मखमाली गादी गिर्द्यांची लाडीक राजस युवती गे ।

परि गगनाखालीं इथें मोकळ्या भेसूर दगडी भिंती ॥क्षमा०॥

चल नेतो तुला माहेरीं, ऊठ लवकरीं, लाडक्या पोरी, नको रागाऊं ।

बापानें केला अपराध, घेईं पदरात, बोल एक शब्द, बाळ जीजाऊ ॥

या शिवनेरी किल्ल्यांत, घोर रानांत, भरल्या महिन्यांत, नको तूं राहूं ।

माहेरीं आईची माया, रोप निपजाया, निंबाची छाया, बाळ जीजाऊ ॥

(पडद्या आडून शाहीर गात आहे---)

चाल : कोंकवती

अजुनी नव्हता शब्द निघाला जिजाबाईच्या वदनीं । हो॥

तप्त गालावर वितळत होतें काळीज गंगा-जमुनी ।हो॥

असह्य आतां दोन लोचनां अलोट माया पाणी ।हो॥

थरथरल्या अधरांची झांपण खुलली उसळे वाणी ।हो॥

घेतली दोन्हीं तळ हातांवर तलवार । टाकलीं पाऊलें पित्यासमोर चार ।

ठाकली उभी नजरेस भिडवुनी नजर । सद्गदित निघाले तीव्र शब्द झणकार ॥

(जिजाबाई म्हणते----)

चाल : मानिनी

जें सौभाग्यावर उठले । तें माहेर माझें तुटलें ॥

तुम्हीं चंद्र सूर्य अरि बनले । देशावर नभ कोसळलें ॥

तुम्हीं रण परकारण धरलें । रामावर भार्गव उठले ॥

हे तात ! मागणे उरलें । द्या मरण पतीच्या पहिलें ॥

घ्या खङग हातीं हे उभी पुढें मी लेक । महाराष्ट्र-ब्रिदाच्या अभिमानाची नेक ।

ही गर्दन झुकली वार करा बस एक । कीं सासर माहेर फिटलें ।

धड ठेवा शीर न्या अपुले ॥ जें सौभाग्य०॥

जा तरि, ना गळसरीवरची ॥ चुकवून तलवार पित्याची ॥

उरली सहचारीण पतीची । पण मेली कन्या तुमची ॥

वनवासी वनराजाची । मी वनराणी वनीं राजी ॥

मी राष्ट्रोद्धारक मराठमोळं कलत्र । स्वातंत्र्य आमुचें अमोल मंगलसूत्र ।

मत्प्राणपति नि सत्‍पुत्र सकल गणगोत्र । देशाला अर्पण केलें ।

तुम्हीं देशद्रोही बनले ॥ जें सौभाग्या०॥

गड माझा श्रीशिवनेर । हें मायेचें माहेर ॥

अंगण महाराष्ट्र समोर । वृंदावन गिरि कांतार ॥

हें कृष्णशिलासन सदर । पुष्पलता भरतील पदर ॥

चांदण्या झुंबरें रातकिडे स्वरकिन्नर । ही आई शिवाई देवी करील सुयेर ।

या कडणी शमवतील प्रसवकळांचे सूर । हें स्वराज्य मन्मनीं भरलें ।

डोहाळे यांतच पुरलें ॥ जें सौभाग्या०॥

या फुलत्या वनवेलीचा । आईला निरोप सांगा ॥

तुटलें मूळ माहेराचें । नको शिंपूं अश्रू गंगा ॥

दे वर अमृतवाणीचा । या रणरंगांतील भांगा ।

या पुढें न वदणें ! तात ! वंदितें चरणें । बोललें वेंचणें कीं गृहकंदन करणें ।

पण तुटल्या वेलीस तिच्या तरुवर मरणें। द्या सौख्य हेच शेवटलें ।

जा उतरा गड जो चढले ॥जे०॥

(जिजाऊ एका बाजूनें व खिन्न पावलानें लखूजी दुसर्‍या बाजूनें जातात---पुढें शाहिराचा पोवाडा सुरु---)

चाल : कोंकवंती

नच शब्द टाकिला पुन्हां पित्यानें ! टाकित जड पाउलें ।

उतरले, लखुजी गड उतरले ॥ नच वळून पाहिलें पुन्हां बिजलीनें !

गगन किती फाटलें । तेज तें शिवनेरींत बिंबलें ।

ती दगड कडी गडवाट वांकडी तिनें हुंदके दिले ।

उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर कठोरता कर्तव्य देवता शोकाकुल तळमळे ।

तेंज तें शिवनेरींत बिंबलें ॥ त्या शिवनेरीच्या कढणीवरुनी पारतंत्र्य घसरलें ।

उतरले, लखुजी गड उतरले ॥ वर ’पूर्णमास’ वेदना सोसुनी स्वातंत्र्य जन्मलें ।

तेंज तें ब्रह्मांडी फांकलें ॥

साथ : टाहोचा आवाज

टाहो फोडतां शिवनेर, गगनामाजीं घुमला सूर ।

विश्वांत झाला चमत्कार । सांगतो ’आत्मा’ शाहीर ।

ऐका सारे नारीनर । गगन निळें हें गार ।

ग्रह तारे खालींवर । मध्यभागीं सूर्य स्थिर ।

धरणीपति परमेश्वर । धरणी आमुची गोलाकार ।

भंवर्‍यावाणी गर्र गर्र गर्र । गिरक्या मारीत चक्राकार ।

पति सभोती फिरते नार । एका गिरकींत आठ प्रहर ।

आठ प्रहरांचा एक वार । तीनशें साठ गिरकींत पार ।

प्रदक्षिणेचा एक घेर । खेळ मेनका-विश्वामित्र, चालला असे अधांतर ।

अनादि अंत निरंतर । एका गिरकींत चमत्कार । पाही स्थिर प्रभाकर ।

गिरकी होती पाठ म्होरं । दिसत होता छानदार; कपोलाचा अरुण मोहोर ।

तोंच घडला प्रकार । शके १५४९ शुभंकर, प्रभव नाम संवत्सर, वैशाख शु.१ वासर ।

उत्तररात्र गुरुवार, अश्विन नामें नक्षत्र ६ एप्रिल दिनक्षर, १६२७ सुंदर ।

असतां सालमजकूर, दिव्यध्वज फडकणार, घेऊन पृथ्वीनें खांद्यावर ।

गिरकी मारली पूर्णाकार, पति सन्मुख ती आली नार । ध्वज पाहतां झोकदार ।

नेत्रीं दीपला प्रभाकर । सूर्य विचारी धरणीला, पति अपुल्या भार्येला,

सांग प्रिये सांग मला । दीपववीता माझा डोळा, तळपणारा अंतराळा,

झांक देवा ब्रह्मांडाला । दिव्य झेंडा ऐसा भला, काल नव्हता देखियेला,

आज कैसा गे आणिला ॥ कशी गमे स्त्री जातीला ?

एका गिरकीत एक कला । सांग प्रिये सांग मला ॥

मुक्त छंद

धरणी सांगे सूर्याला । ऐका नाथा सांगता हे ।

मंगळसूत्र तुमचें मला निसर्गानें दिलें आहे ॥ध्रु०॥

भूगोलाची हिरवी साडी । श्यामलांगी ल्यालें आहे ।

रामकृष्ण पैगंबर, येशू बुद्ध यांनीं वर, अबदागीर धरलें आहे ॥धरणी०॥

स्त्री जातीचा जीव सारा । दागिन्यांत अडला आहे ।

इतिहास सोनारानें एकेक नग घडला आहे ॥धरणी०॥

कोलंबस कमरपट्टा । तंग अंगी जडला आहे ।

अलेक्झांडर--सिकंदर वज्रचुडा मढला आहे ॥धरणी०॥

अकबर आणि चंद्रगुप्त । चंद्राहार चढला आहे ।

नेपोलियन सोनाराच्या । अलमारींत पडल आहे ॥

धरणी० ॥ जगभर थाट आहे । राजपाट अर्थ आहे ।

परि जेथें समता नाहीं । तेथें सारें व्यर्थ आहे ॥धरणी ०॥

वारुळाचा साप सम्राट मोठा असून खोटा आहे ।

स्वराज्याचा छत्रपति छोटा असून मोठा आहे ॥धरणी ०॥

सम्राटांच्या शृंगारांना गुलामींत विटलें आहे ।

स्वराज्याचा झेंडा आज हातीं घेऊन उठलें आहे ॥धरणी ०॥

तुम्हीं म्हणाल, "वसुंधरे, तुझें सारे खोटें आहे" ।

डोकावून पहा नाथा, शिवनेरींत बेटें आहे ॥धरणी०॥

जिजाईच्या कुशीमाजीं शहाजीचा बंडा आहे ।

भारताचा शिवाजी या वसुधेचा झेंडा आहे ॥धरणी ०॥

आजपासून रायाभंवतीं झेंडयावांचून फिरणार नाहीं ।

शास्त्रज्ञांना झेंडा माझा कवि वाचून कळणार नाहीं ॥धरणी० ॥

काय म्हणतां प्रिये थांब ! इश्श ! मला वेल नाहीं ।

शिवनेरीला टाहो फुटला साधासुधा खेळ नाहीं ॥धरणी० ॥

(टाहोचा आवाज--पुढें पोवाडा)

फुटला टाहो शिवनेरीला हिंद-स्वराज्याचा ।

पश्चिमेसही प्रकाश पडला प्रदीप्त पूर्वेचा ॥

शिवनेरीच्या माळ्यावरुनी शेत राखणीचा ।

सुटला धोंडा भिरभिरता त्या सह्य गोफणीचा ॥

धन्य माउली जिजाई ॥ दुनियेला साम्राज्य लांडगे असतां भंवतालीं ।

मराठी जाळींत जिजाई सिंहीण स्वराज्यास व्याली ॥

युगपुरुषाच्या जगजननीचे फिटतील का पांग ।

हिन्द देवीनें हिमाद्रि वरुनी दिली जरी बांग ॥

फुटतां टाहो शिवनेरींत, ऐकतां सख्याचा साद,

संवंगडी आलं दुनियेंत । तानाजी उठवी उमराठं,

खाई पासलकर कोलांट, डोकावला हिरोजी फर्जंद ।

नेताजी बाजी दणकट, जिव्या महाल्या वळवी मूठ,

दिला फिरंगोजीनं नेट । आलं बहिर्जीचं सोंगाट ।

कुठं येसाजीचा गोंगाट । कुठं रामजन्म पावत !

कुठं झाला अंजनी सुत ! कुणी भालदार पुढं येत ।

कुणी हडपी माघं धांवत । एकदांच फुलवूं महाराष्ट्र ।

होता सगळ्या आयांचा बेत । वटवृक्षावाणी महाराष्ट्र ।

फांदोफांदीं पाळणा फुटं । केली रानमातीची तीट ।

पंचगंगांना चिरगूट । सूर्यासंगें किरणें यावीं धरणी दिपवीत ।

शिवबासंगें तसे जन्मले महाराष्ट्र दूत ॥

चाल : अलंकार

शिवनेरीं बाळ जन्मलें । विजापुरीं कळलें ।

राजे तोषले । कंठा अर्पिला जासूदाला ।

हात जोडिले भवानीला । सोहळा चाले शिवनेरीला ॥

आवतनं केलं मुलखाला, मांडला जन्म सोहाळा,

नरनारी जमला मावळा । आनंदी आनंद झाला,

पूजिलें शिवाई मातेला, वंदिलें सूर्य देवाला ।

प्रार्थिलें हिन्द देशाला, उद कापराच्या गंधाला ।

सह्याद्रि लुब्ध जाहला, साजणी सुवासिनीला ।

वायणं वाटलीं सर्वांल । बाळतिणीसंगें बाळराज भूषविला ।

सजवितां पाळणा जिजाईंनीं गाईला । शाहीर ’आत्माराम’ तोच गातो आजला ।

ऐका हो आयाबायांनों, मराठमोळ्यांनो, भारतीयांनो झोंका घातला ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP