चाल १ : झुरती
शिवाजीची ऐकून कीर्ती । मोगल मनी झुरती ।
विचार मनी करती । शह कसा द्यावा शिवाजीला ॥
चिंता लागली औरंगजेबाला । म्हणून खासा दरबार भरविला ॥जी जी॥
औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान । द्यावा धाडून ।
विचार ठरवून । मदतिला जसवंतसिंह दिला ।
राजा रजपूत मारवाडाला । दोघे आले धरण्या शिवाजीला ॥जी जी॥
१६६० या साली । दोन्ही सैन्ये आली ।
गाठ तवा पडली । पुण्याच्या टोका उत्तरेला ।
चाकणचा महशूर होता किल्ला । किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ॥जी॥
दोन महिने निकराने लढला । परी नाही पडला ।
अखेर कसा आडला । गनिमानी सुरुंग लावून किल्ल्यास ।
पाडली एक भिंत हो त्या समयास । पडतां खिंडार आनंद खानास ॥जी जी॥
चाल २
त्यावेळी जोराची लढाई सुरुवात झाली ॥जी जी॥
निकराने लढती मावळे धरती हादरली ॥जी जी॥
फिरंगोजीने लढण्याची शिकस्त तवा केली ॥
होते सैन्य मोगलाचे अफाट त्यावेळी ॥
त्यामुळे फिरंगोजीला हार खावी लागली ॥
घेतला चाकणचा किल्ला गनिम आनंदली ॥
चाल दांगटी
पुढे ऐका प्रकार काय झाला । खान किल्ल्यामध्ये राहिला ।
फिरंगोजीला निरोप धाडिला । यावे आमची नोकरी तुम्ही करण्याला ।
नाही रुचले शूर मर्दाला । रोख ठोक जबाब त्यानं दिला ।
राजा शिवाजी हाच आम्हाला धनी आहे आमच्या राज्याला ।
त्याच्यासाठीं जीव देण्याला । दंड ठोकून उभा नरसाळा ।
परक्याची चाकरी करण्याला त्यांच्यासाठी जन्म नाही झाला ।
पुन्हा घेईन चाकण किल्ल्याला । तेव्हा शांती माझ्या चित्ताला ।
असा निरोप त्यान धाडिला शाहीस्तेखानाला ॥दा दा॥
फाडून टाकलं भगव्या झेंडयाला । आपल निशाण लावलं शडयाला ।
शाहिस्तखान मनी तोषला । आणि बोलला आपल्या लोकाला ॥
अता करा खूप मौजेला । काही कमी नाही तुम्हाला ।जी जी॥
फिरंगोजी त्याहो समयाला । दिसेना झाला । कुठे तो गेला ।
शोधा म्हणे त्याला शाहिस्तेखान । गनिमांनी पालथे घातले तवा रान ।
नाही सापडला फिरंगोजी जाण ॥
चौक २ : चाल १
थोडे दिवस राहून किल्यात । आराम तिथे घेत ।
होता चैनित । कुठली पर चैन जिवाला त्यांस ।
रात्रंदिन शिवाजी दिसे स्वप्नात । पुण्याला आला तेव्हां वेगांत ॥जी जी॥
लाल महाल होता शिवाजीचा । पाहुनी साचा ।
बेत मनिचा । करुन राहिला लाल महालांत ।
बंदोबस्त ठेवला रस्तोरस्त्यांत । फिरकू देऊ नका परका गावांत ॥जी जी॥
शिवराज होते सिंहगडी । बातमी लागली ।
घेऊन हेरगडी । आले धावत सांगण्या शिवबास ।
खान उतारला लाल महालांत । अडविले रस्ते त्याने सर्रास ॥जी जी॥
शिवाजीने दरबार भरविला । बोले मावळ्याला ।
सरदार एक आला । आम्हाला आता पकडायाला ।
मोड त्याचा आम्ही पहिजे केला । तयार व्हा आल्या प्रसंगाला ॥जी जी॥
हरहर महादेव करुन गर्जना । दुष्ट दुर्जना ।
करुन मर्दना । अंबा ही करील आम्हा सहाय ॥
गनिमाच आम्हा नाही आता भय । करु नका तुम्ही शत्रूची गय ॥जी॥
असे शब्द ऐकता मावळ्यानी । भाले परजोनी ।
उठले त्वेषानी । द्यावी म्हणे आज्ञा आम्हा महाराज ।
शत्रूला ठार करु आम्ही आज । रातदिन हेच आम्हाला काज ॥जी जी॥
चाल ३
निवडक चारशे लोक घेऊन बरोबर ॥जी जी॥
छत्रपती शिवाजी गड उतरे भराभर ॥जी जी॥
आले पुण्याशेजारी रात्र होती घनघोर ॥जी जी॥
टाकली नजर त्यावेळी त्यांनी चौफेर ॥जी जी॥
इतक्यांत आवाज एक आला तो कानावर ॥जी जी॥
लग्नाची वरात तेव्हां निघाली होती जोरदार ॥जी जी॥
चुकवून चौक्या आणि पहारे घुसले ते वीर ॥जी जी॥
मध्यंतरी रात्री आले ते लाल महालावर ॥जी जी॥
चाल ४
गेले पाठी मागच्या बाजूला । शिवाजीने त्याच समयाला ॥
लाल महालांत शिरकाव केला । खान होता गाढ झोपलेला.....
पाहुन तेव्हां शिवाजीला । स्त्रियांनी ओरडा केला ॥
दचकून खान जागा झाला, उठून पळू लागला......
चाल दांगट ५
काय झालं समजेना त्याला । सैरावैरा पळू लागला ।
पर वाट सुधरेना त्याला । खूप वाटा होत्या महालाला ।
त्या नव्हत्या ठाऊक खानाला । वाडयातच पळू लागला ।
जिथे जिथे शिवाजी त्याला । येई आडवा त्याला मारण्याला ।
खान तेव्हां घाबरुन गेला । एका खिडकी जवळ तो आला ।
उडी टाकून पळण्याचा बेत खानानं केला ॥दादा रं जी जी॥
उडी टाकतां खिडकीच्या वाटे । शिवाजी छाटे ।
खानाची बोटे । ओरडला दगा दगा खान ।
इकड मावळ्यांनी धरुन आवसान । चिरले चराचर शत्रू बेइमान ॥२॥
चौक ३ : चाल १
लाल महाल रंगला रक्तानं । गनिम त्वेषानं ।
हातघाई येऊन । निकरानं लढले तेव्हां आनिवार ।
खानाचा मुलगा त्यात झाला ठार । जावयाच्या बसला मानगुटीवर ।
दोघेही झाले त्या मधी ठार ॥जी जी....सैन्य घेऊन आपले बरोबर ।
शिवाजी बहाद्दर । गेले पुण्याबाहेर ।
पर्वती वरुन फुंकिले शिंग । बैलाचे दिवटयानी बांधिले शिंग ।
पेटविता दिसे आरशाचे भिंग ॥जी॥
कात्रज घाटात प्रकार असा केला । प्रत्येक झाडाला ।
पोत बांधला । दिवटयांचा तेव्हां उजेड पाहून ।
घंटांचे नाद तवा ऐकून । धावले सैन्य दिशा रोखून ॥जी जी॥
आले शत्रू कात्रज घाटांत । डोंगराळ भागांत ।
होते तिथ शांत । झाडे आणि गुरे दिसती त्याना खास ।
पाहुनी विचार करती मनास । किधर गया शिवाजी समजेना त्यास ॥जी जी॥
चाल २
सर्व सैन्य येऊन शिवराज परत चालले ॥
सुखरुप येऊनी सिंहगडी पोहोचले ॥जी....
जसवंतसिंगच्या सैन्यावरी छापे त्यानी घातले ॥जी॥
त्यामुळे मोगलाचे नुकसान अतोनात झाले ॥
शाहीस्तेखान सैन्यासह खानदेशी चालले ॥जी जी॥
चाल ३
अशी युक्ति करुन शिवाजीन ।
गारद केले गनिमाचे सैन्य ॥जी जी॥
हे यश नव्हे सामान्य । धन्य छत्रपती ते धन्य ॥
अशी किती देऊ आठवण । शिवरायांचे आठवून गुण ॥
पुढे आले दिल्लीला जाण । त्याचे पुढे ऐका आनुमान ॥
शत्रूंचा फडशा पाडिला । यश आलं शिवाजी राजाला ।
भवानी प्रसन्न शिवबाला, जयी माळ घालण्याला ।
थांबली शिवाजी राजाला । महाराष्ट्रांत स्वराज्य स्थापण्याला ।
शिवराजा पुढे बघा आला । मावळे होते साथ देण्याला ।
देशाच्या महान कार्याला । कितीकांनी । प्राण अर्पिला ।
जरा ठेवा तुम्ही आता ध्यानाला । मानाचा पहिला माझा मुजरा शिवाजी राजाला ॥जी जी॥
कवी मोटे आहे गुणगानी पुण्या ठिकाणी । वचने करुनी ।
तोषवी बालतरुण-वृद्धांस । काव्य नसे त्याचे सोडून इतिहास ।
गुरु लहरी हैदरखान ज्ञान देती त्यास । प्रथम वंदितो त्याच्या चरणास ॥