मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
सिंहगड

शिवाजी महाराजांचा पोवाडा - सिंहगड

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

चौक १

गातो असा सिंहगडाचा पोवाडा । उदयभानु बडा ।

बाटगा नोडा । ठेचला ऐका नवलाई ॥

स्थापिली हिंदु पातशाही ॥ धन्य मातोश्री जिजाबाई ॥ध्रु०॥

जगामध्ये कितीक झाल्या । होतील आहेत आता ।

त्यात श्रेष्ठता । पावली एक जिजाबाई ॥

एकटया शिवरायाची नाहीं । हिंदु धर्माची झाली आई ॥

दिल्लीपती आला जोरदार । झाला शिरजोर ।

घेऊन तलवार । उठला हिंदु धर्मावरती ॥

बाटविले कैक नाहीं गणती । नाव ऐकता हिंदु पळती ॥

जिकडे तिकडे उडाला हाहाःकार । रजपुत भिऊन सारं ।

मराठेही वीर । मिळाले थोडे बादशहाप्रती ॥

बाकी आपसात चुरस करती । स्थापण्या राज्य कठीण किती ॥

चाल

ती वेळ आणीबाणीची । हिंदूच्या मर्दुकीची ॥

पुत्रांच्या मातृभक्तीची । मातांच्या मातृत्वाची ॥

मारण्याची किंवा मरण्याची । कर्त्यांची कर्तृत्वाची ॥

चाल

त्या जिजाबाई माउलीनं केला सुविचार सोडलं विजापूर ॥

स्वातंत्र्यांकुर म्हणी इथं नाहीं फोफावणार ॥

घेऊन गेली पुण्याला संग बाल शिववीर ॥

शिक्षण दिलं धर्माचं राजकारणाचं केला हुश्शार ॥

सोळाव्या वर्षी सुरवात गनिमी लढणार ॥

किती किल्ले बळकावले नाहीं कुठें हार ॥

चाल : मिळवणी

संगे रणधीर वीर तानाजी । फासलकर बाजी ।

कंक येसाजी । जिवाचे कलिजे भाई भाई ॥

मानिती जिजाईस आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१॥

चौक २

आला चालून सिद्दी जोहार । मोठा सरदार ।

बढाईखोर । विडा उचलून पाच पानी ॥

बोले हम बडा खानदानी । पिला दूँ मराठेकु पानी ॥

मराठयांशी पडली त्याची गांठा । लढती अफाट ।

दाविती न पाठ । स्वाराला स्वार जाऊन भिडती ॥

मराठे वीर अचुक लढती । उपजली सिद्दीमनी भीती ॥

बोल बोलता जिरली घमेंडी । पळतां भुई थोडी ।

बचावुनी दाढी । सिद्दी जोहार पळत सुटला ॥

बोले ये सैतान है अल्ला । तोबा तोबा अल्ला भिसमिल्ला ॥

चाल

दुसरा बडा भाई-शाहिस्तेखान । पळवीला बोटे छाटून ॥

दगाबाज तो अफझलखान । मारीला वाघनखानं ॥

एक एकटे हरविले तीन । बादशहा झाला बेभान ॥

चाल

मग मोअज्जिम जयसिंग दोघे वीर धाडले ॥

मोठे सैन्य तोफखाना संगे घोडे दौडले ॥

मजल दर मजल करित सारे दक्षिणेंत पातले ॥

दर्यावानी तुफान सेना बघुन मराठे हादरले ॥

दोन हल्ले मराठयांनीं शिताफीनें चढविले ॥

परि पुढं टिकाव अवघड शिवबा उमजले ॥

चाल : मिळवणी

बलाबल जाणून टाकितो डाव । आमचा शिवराव ।

किल्ले म्हणी घ्याव । आम्च्यापासून परत कांहीं ॥

मुलगा त्यो कोणाचा हाई । त्याची मातोश्री जिजाबाई ॥२॥

चौक ३

(शिवाजीनें वेळ प्रसंग ओळखून मोगलांशी तह केला व २६ किल्ल्यांपैकीं १८ किल्ले मोगलांना दिले. त्यांत कोंडाणाही दिला.)

मोअज्जिम जयसिंगाला । आनंद लई झाला ।

दोन बोटं उरला । स्वर्ग; त्याला चढली विजयधुंदी ॥

मराठेशाहीची नाकेबंदी । कोंडाणा घेऊन केला संधी ॥

आपल्या सैन्याचा तळ हालविला । खंद्या वीराला ।

उदयभानूला । कोंडाण्यावर नेमून परत फिरले ॥

ताब्यांत त्याच्या दिले सारे किल्ले । म्हणती काय मराठे आतां मेले ॥

नाकेबंदीचा किल्ला गेला । कोंडाणा आपुला ।

जीव हळहळला । शिवबा मनीं चिंतातुर झाले ॥

मराठे वीर सारे जमले । बारांनीं बारा बेत केले ॥

चाल

गडामधीं गड-गेला कोंडाणा । मराठेशाहीची होईल दैना ॥

रात्रंदिन झोप नाही कोणा । लागली हुरहुर सर्वांना ॥

कांहीं केल्या बेत जमेना । उपाय सुचविती नाना ॥

चाल

चलबिचल अशी ही पाहून जिजाबाई बोले ॥

मुर्दाड भार भूमिला कशाला रे जगले ॥

स्वातंत्र्य पारखे जिवंत असुनी मेले ॥

शिवराय डिवचता सिंह जसे खडबडले ॥

पाहुनि सोन्याची संधी ही माता काय बोले ॥

भवानीनं रात्रीं मला स्वप्नामधिं सांगितले ॥

चाल : मिळवणी

सकाळच्या रामप्रहराला । तुझ्या नजरेला ।

पडेल जो किल्ला । सोडाव जीव त्याचे पायीं ॥

कोंडाणा आज पाहिला म्हणी आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥३॥

चौक ४

शिवराय राजकारणी । माता त्याहुनी ।

समशेर भवानी । दावुनी पाया पडुनि आईला म्हणती ॥

हरवील हिला अशी कुणाची छाती । माता काय बोले ऐका पुढती ॥

दावता कमरेच्या नुसत्या तलवारी । ऐट वरिवरी ।

विराटाच्या घरी । मुलगा (उत्तर) काय थोडकं रे बडबडला ? ॥

अखेर काय त्यानं दिवा लावला । सांग का रे कोंडाणा घालविला ॥

वेद उपनिषद सार सांगुनी । कृष्ण देवांनी । अर्जुना रणीं ।

लढविलं सांग कशासाठीं ॥ फुकट जन्मलास माझ्या पोटीं ।

हिर्‍याच्या खाणींत गारगोटी ॥

चाल

एकीकडं आईच्या इच्छेची आड । विहीर बघा लढाईची दुसरीकडं ॥

शिवबा राजाला पडलं मोठ कोडं । दोन्ही बाजू आहेत कशा बिनतोड ॥

अखेर दिलं वचन आईला लै गोड । शत्रूचा पुरा करतो बीमोड ॥

चाल

ऐकुन आनंदाश्रू आईच्या नयनीं बघा थबथबले ॥

फिरविताच पाठीवर हात शिवबा गहिवरले ॥

इतक्यांत रायाच्या लग्नाला बोलवाया आले ॥

शेलारमामा तान्हाजी दोघे भेटले ॥

आम्ही चाललों आमच्या लग्नाला शिवबा त्यांना बोले ॥

वरघोडा निघायचा आज कोंडाण्यावर बोहलें ॥

चाल : मिळवणी

ऐकतां शब्द हे कानीं । शेलारमामांनीं ।

स्वार सांडणी । धाडीला लगीन थांबबाई ॥

धन्य त्या मर्दांची आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥४॥

चौक ५

तिकडं बघा तान्हाजीच्या गावाला । (उमराठे गावाला) ।

सोयरा जो आला । त्याचे दिमतीला । कामकरी हेटकरी लई ॥

माहीतगार आणखी मराठे भाई । देऊन सोयर्‍यांच्या केल्या सोई ॥

दोन्ही बाजूंच्या मांडवांचा थाट । सहस्त्र साठ । दिव्यांचा लखलखाट ।

पाहुनी डोळे दिपून जाती ॥ सूर्य काय आलाय पृथ्वीवरती ।

पाहण्या मराठेशाहीची धर्ती ॥ पाहावया रायाचा मुखचंद्र ।

लाळ घोटी इंद्र । सूर्य आणि चंद्र । शाहीर म्हणे इथं झाली यूती ॥

होतांच जनसागराला भरती । नवल नाहीं निसर्गाची रीती ॥

चाल

इतक्यामधी आला स्वार सांडणी । लखोटा वाचला रायांनीं ॥

लगीन थांबवा याच क्षणीं । लढाईला निघावं सर्वांनी ॥

चाल

रुकार पाहिला दिला वरुमाईंनीं निरामाईंनी ॥

हुकूम सर्वाला सोडला रायांनी सूर्यरायांनीं ॥

राजा बघा बोले तसे दळ हाले बोलतां क्षणीं ॥

आपापले सैन्य घेऊन निघाले देशमुख वतनी ॥

पुढें चालले पहिले मानकरी हत्तीवर बीनी ॥

मोहिते चव्हाण महाडीक जाधव थाटांनीं ॥

चाल : मिळवणी

इकडे तान्हाजी म्हणे शिवराया । गड जिंकाया ।

सांडीन मी काया । रायाला समजा माझ्या ठायीं ॥

गहिवरुन आशीर्वाद देई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥५॥

चौक ६

(तानाजीराव म्हणतात-----"शिवबा राजे, र्‍हाऊ द्या माझ्या पोराचं लगीन; आधीं लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं !" तान्हाजीच्या तोंडचे हे शब्द ऐकून जिजाईचं हृदय भरुन आलं.)

तोंडावाटे शब्द उमटेना । स्तब्धता मना ।

मनीच्या खुणा । मनाला कळल्या एकमेका ॥

जिव्हाळ्याचा शेवट असाच मुका । मुक्यानं चालतो पुढं ऐका ॥

पंचारती घेऊनी आई । आली लवलाही । कमती तिथं कायी ।

टिळक लावी ठळक कुंकुमाचा ॥ पाठीराखा म्हणी तू आर्यभूचा ।

महाराष्ट्राच्या सौभाग्याचा ॥ ओवाळणी देई मज तान्हा ।

गड कोंडाणा । मनची कामना । पुरविता वीर नाहीं दूजा ॥

तुझ्यावीण कोण करील काजा । आला संदेश निघाल्या फौजा ॥

चाल

आतां तान्हाजी ठेवितो डोई । जिजाबाई मातेच्या पायीं ॥

कडकडुनि भेट मग घेई । शिवबाची तान्हा लवलाही ॥

शाहीर अशा या समयीं । शिव जीव एकता पाही ॥

चाल

तो सुभेदार तान्हाजी तडक निघाला ॥

शेलार मामा म्हातारा त्याचे मागें गेला ॥

निघतांच जिजा माऊली वदे तान्हाजीला ॥

बघ वळुन मागं डोळे भरुन पाहु दे तुला ॥

तान्हाजीनं मागं बघतांच प्रकार काय झाला ॥

स्तब्धता चराचराला कंठ दाटला ॥

चाल : मिळवणी

सारे पशू पक्षी आणि वृक्ष । तान्हाजीकडं लक्ष ।

सूर्यही साक्ष । थांबला वायू झुळूक नाहीं ॥

आईची स्थिती सांगूं काई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥६॥

चौक ७

सिंहगडच्या पायथ्यापाशीं । थोडया लोकानिशीं ।

गेला त्याच दिशी । मराठा खरा समर गाजी ॥

गडाचा भेद काढूं म्हणे आजी । युक्ति सांगतां मामा राजी ॥

नाईक चौक्यांचा रायाजी कोळी । वळवूं याच वेळीं ।

होऊन गोंधळी । नाद त्याला भारी पोवाडयांचा ॥

त्याला ऐकवूं दोष त्याचा । टाकूं डाव राजकारणाचा ॥

तान्हाजीनं घेतलं तुणतुणं । शेलार मामानं ।

मोठया ऐटीनं । मारिली थाप डफावरती ॥

ऐकता सारे लोक जमती । शाहीर कोण आलाय पाहूया म्हणती ॥

चाल

आला नाईक रायाजी कोळी । चौकीवर जमली सारी मंडळी ॥

लवुन मुजरा करी आमचा गोंधळी । मुजर्‍याला खूष सारी मंडळी ॥

चाल

त्यो मामा म्हातारा थाप डफावर मारी ॥

गोंधळी म्हणे सर्वांना ऐका करझारी ॥

हवालदार म्हणतां जसा खूष शिपाई भारी ॥

तशी खूष मंडळी सारी म्हणतां कारभारी ॥

जरी सिंह विसरला स्वतः जात लढणारी ॥

त्याचं त्याला देईल पटवून ऐना शाहीरी ॥

चाल : मिळवणी

(मामा) गोंधळी म्हणे ऐका एक घडी ।

करील मजा थोडी । आमचा हा गडी ।

नात्यानं भाचा माझा हाई ॥

ऐका आतां गोंधळ म्होरं गाई ।

धन्य मातोश्री जिजाबाई ॥७॥

चौक ८ : गोंधळ

उदे ग अंबाबाई उदे ॥ उदे ग अंबाबाई उदे ॥

कोल्हापुरच्या अंबाबाई गोंधळा यावं ॥ तुळजापुरच्या भवानी गोंधळा यावं ॥

राजगडच्या जगदंबे गोंधळा यावं ॥ प्रतापगडच्या भवानी गोंधळा यावं ॥

शिवनेरीच्या शिवाई गोंधळा यावं ॥ जेजुरीच्या खंडोबा गोंधळा यावं ॥

पंढरीच्या विठोबा गोंधळा यावं ॥ औंधाच्या यमाई गोंधळा यावं ॥

गाणगापूरच्या दत्तात्रेया गोंधळा यावं ॥ बार्शीच्या भगवंता गोंधळा यावं ॥

वाडीच्या नरसोबा गोंधळा यावं ॥ उदे ग अंबे उदे उदे उदे ॥

चाल : मिळवणी

गोंधळी नमी जगदंबेला । मूळ मायेला ।

जगन्मातेला । ऐका आईचं सुयश गाई ॥

रणांगणीं वीरां यशदायी । युद्ध हा तिचा खेळ पाही ॥

येऊं देऊं नका मनामधी शंका । सुयश मिळे एका ।

दुजा तो फुका । रणीं लढतांना मरुन जाई ॥

जिंकिता एक भोगी मही । दुजा धारातीर्थी मुक्त होई ॥

सारखेंच सुयश देई दोघांला । एकमेकाला । नांव ठेवायाला ।

तीळभर जागा ठेवीत नाहीं ॥ म्हणून जो तिचा भक्त हाई ।

मारतो वा मारतो त्याच ठायीं ॥

चाल

न्याय हा लागू स्वातंत्र्याला । धर्मवीर आणि राष्ट्रवीराला ॥

गुलाम जरी शूर वीर निपजला । मारतां मरता लाभ नाहीं त्याला ॥

मरतां, महीभोग दुसर्‍याला । मरतां बघा जातो रौरवाला ॥

चाल

परतंत्र इहपर सौख्य नाहीं गुलामाला ॥

मनाला पटुन रायाजी कोळी गोरामोरा झाला ॥

या गुलामीचा नायनाट कराया अवतरला ॥

म्हणती कैलास सोडूनी सांभ शिवाजी झाला ॥

गोंधळी म्हणे आम्ही हिंडतो चारी मुलखाला ॥

आसेतु हिमाचल असा वीर नाहीं पाहिला ॥

चाल : मिळवणी

ऐकतां शत्रुची स्तुती । रागाला येती ।

मंडळी किती । मुख्य रायाजी बोलत नाहीं ॥

मनाची साक्ष जनाला काई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥८॥

चौक ९

रायाजी कोळी म्हणे गोंधळ्याला । अधीर बहु झाला ।

जीव आपुला । शिवाजीच्या दर्शनाचे साठीं ॥

आजवर पडली होती तुटी । जिवाला जशि अविद्या गुरफाटी ॥

गोंधळी म्हणे राया कोळ्याला । वेळ काय त्याला ।

सिंह पाहायाला । सांपडे पारधीच्या पाठीं ॥

वनच्या राजाच्या वनांत गांठी । पडायच्या नाहींत गावांत भेटी ॥

रायाजी कोळी म्हणे निक्क्याचा पण (कमलदेवीच्या निक्क्याचा पण)

बळजबरीनं । ठरलाय आज म्हणून । गडावर पहारे झिंगताती ॥

(रजपूत आणि पठाण दोन्ही जाती) । कुसुंबा पिऊन तर्र हायती ।

चौक्या सार्‍या आमुच्याच हातीं ॥

चाल

वेळ ही पारधीची असली । कळवील कोण या काळीं शिवबा सिंहाला ॥

अजुनिया भ्रष्ट नाहीं केली । मध्यरातची वेळ नक्की ठरली कळव तू त्याला ॥

द्रौपदी जशी सोडविली । शिवबानं व्हावं वनमाली याच वेळेला ॥

चाल

मदत सारी करुं मनोभावानं शपथ वाहातों ॥

या मावळत्या सूर्याची साक्ष आम्ही ठेवितो ॥

लगेच गोंधळी वेश टाकूनी तान्हा गर्जतो ॥

नरडीचा घोट म्हणी उदयभान्याच्या घेतों ॥

देवाची करणी, नारळांत पाणी । पाहून कोळी नेमितो ॥

तान्हाजी गळ्यांतील कंठा कोळ्याला देतो ॥

चाल : मिळवणी

भेद किल्ल्याचा मिळविला सारा । देऊन इशारा ।

तान्हा माघारा । परतला मामा संग हाई ॥

आजच्या तरुणांत जोम नाहीं । धन्य मातोश्री जिजाबाई ॥९॥

चौक १०

मामा काय बोले आपल्या भाच्याला । अपशकुन झाला ।

पहिल्या फितुरीला । मावळत्या रविची शपथ वाही ॥

चर्र झालं मन त्याच ठाईं । लेका (तान्ह्या) धडगत दिसत नाहीं ॥

चैन खालीं पडणार नाहीं पायथ्याला । तुला सोडून मला ।

आतां एकल्याला । होणारं कधी चुकत नाहीं ॥

म्हणून तुझ्या संग येणार मीही । नाही हो म्हणू नको कांहीं ॥

ऐकून तान्हाजीला आनंद लै झाला । म्हणी जाऊं चला ।

पश्चिम बाजूला । गडावर तिकडं पहारा नाहीं ॥

उंच कडा खोल दरी हाई । सुयश आपणाला त्याच ठायीं ॥

चाल

रात्र अंधारी भयाण भारी । तीही ना किर्र शब्द करी ॥

आणखी किती सांगूं खोल दरी । पोचेना रविकर तेथवरी ॥

अशा त्या ठायीं गेली स्वारी । निवडक मावळे बरोबरी ॥

चाल

टेहेळकरी तुम्ही सांगा सूर्याजीला गेलो आम्ही पुढती ॥

आतुन उघडतों कल्याण दरवाजा घुसा मग वरती ॥

मोहिते चव्हाण महाडीक जाधव आपले सेनापती ॥

यांच्यासह तुम्ही सावध रहावं कल्याण दारावरती ॥

आता शेंदूर थापून मस्तकीं घोरपद पुजिती ॥

चढायासाठीं कठीण तो कडा नाव यशवंती ॥

चाल : मिळवणी

बांधुनी दोरखंड तिच्या कमरेला । तान्हाजीनं तिला ।

प्रणिपात केला । वेळ आतां लावूं नको ग बाई ॥

चढ यशवंती सुयशदाई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१०॥

चौक ११

यशवंती सरसर चढली । अर्ध्यावर गेली ।

भविष्य समजली । परतली खालतं येण्यासाठीं ॥

मामाच्या धस्स झालं पोटीं । रक्षिता म्हणे जगजेठी ॥

मामा काय बोलला यशवंतीला । झालं काय तुला ।

आजच्या येळला । मागं अशी कधी फिरलीस नाहीं ॥

यशा अपयशाची पर्वा नाहीं । वीराची वीर भावना ही ॥

बर्‍या बोलानं वर तू ग जाई । नाहींतर पायीं ।

ठेचीन तुझी डोई । मागं म्होरं आतां पाहणार नाहीं ॥

गेली वर तिचा पाड काई । बिचारी रडत धायी धायी ॥

चाल

भारती त्यावेळी अशी ही मुकी । जनावरे पाळीत होती नेकी ॥

चराचरी राष्ट्रकार्यी एकी । तत्त्वज्ञान पटलं होतं लोकीं ॥

देह जरी पडला मृत्युमुखीं । आत्मा अविनाशी राहतो बाकी ॥

खरोखर दादा ॥ दादा रंऽऽजीरंदाजीरंऽऽजी ॥

चाल

जाणून तो सुभेदार तान्हाजी पहिला वर चढला ॥

शेलारमामा म्हातारा त्याच्या मागं गेला ॥

एका मागून एक असा दोनशे वीर वर चढला ॥

पोचले कडयाच्या वरतं वेळ नाहीं त्याला ॥

अर्धे तुम्ही उघडा छापा घालूनी कल्याण दरवाजाला ॥

तोवर आम्ही हिकडं सोडवितों कमलदेवीला ॥

चाल : मिळवणी

सारे गाफील रजपूत पठाण । अर्धे अधिक जाण ।

टाकले छाटून । बघा बोलबोलतां वेळ नाहीं ॥

रणीं जगदंबा साह्य होई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥११॥

चौक १२

हलकल्लोळ एकचि झाला । कोठून कसा आला ।

कुणाचा घाला । सपन कीं खरें कळत नाहीं ॥

सैरावैरा पळती दिशा दाही । भोंबावले हत्यार गावत नाहीं ॥

थोडया वेळेमधी सावध झाले । लगेच उलटले ।

सरसावून भाले । घे घे हाणमार करती ॥

परस्पर दांतओठ खाती । मारुं वा मरुं तुटून पडती ॥

वार्ता ही ऐकतां क्षणीं । जसा जाळींतुनी । निघे चवताळुनी ।

वाघ-तसा भानू बाहेर पडला ॥ घेऊन तलवार ढाल आला ।

तोच तान्हाजी येऊन भिडला ॥

चाल

नजरेला नजर दोघांची भिडली । वीराची वीराला खूण पटली ॥

नंग्या तलवारी चमक झडली । काळोखांत आकाशीं जशी बिजली ॥

आतां तोडीला तोड सुरु झाली । दोघांनी शर्थ बहु केली ॥

चाल

बारा रेडयांची शक्ती एकटया उदयभानूला ॥

तान्हाजी कांहीं कमी न्हवता ऐका भाग पुढला ॥

दहा हजार जोर बैठका काढी येळेला ॥

त्याला पाच पाचुंदे रोट लागत न्याहारीला ॥

द्वापारीं भीम-जरासंध जसा लढविला ॥

भगवान पाठीराखा तसा मामा बाजूला ॥

चाल : मिळवणी

डावासी डाव टाकती । सांगूं तरी किती ।

खुंटली मती । कवीला पुढं स्फूर्ति देई ॥

अहा तूं धन्य माझे आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१२॥

चौक १३

वरती तान्हाजीच्या तमंचा वाराला । कंबर त्यानं केला ।

बहिरा उलट दिला । भानूच्या शिरवारानं ढाल फुटली ॥

(तान्हाजीच्या हातची ढाल फुटली ) । गुंडाळुन शेला ढाल केली ।

धन्य त्याची माय त्याला व्याली ॥

एकमेकांना वार लागती । सांगूं तरी किती ।

तेल तोवर ज्योती । रक्तानं न्हाले वीर दोन्ही ॥

लाली त्याची चढली आकाशी पाही । तान्हा मावळला उगीच नाहीं ॥

चाल

भानूही थकला त्राण नाहीं । माराया परी लाथ धांव घेई ॥

म्हातारा मामा आडवा होई । कमरेचा वार चुकवी पाही ॥

केला चवताळुन वार जनोई । भानूला उभा चिरला वेळ नाही ॥

तो खरोखर दादा ॥ दादा रंऽ जीरं दाजी रंजी ॥

चाल

पडतांच तान्हाजी जोर शत्रूनं केला ॥

जरी मर्द मावळे परी धीर त्यांचा खचला ॥

आवरुन शोक मागानं चंग बांधीला ॥

लाजले तरुण वीरश्री चढली सर्वांला ।

इतक्यांत कल्याण दरवाजानं सूर्याजी आला ॥

शाबास लढून शर्थीनं किल्ला सर केला ॥

चाल : मिळवणी

ओवाळावे दिवे जीवाचे लक्ष कोडी । त्यांच्यावरुन कुडी ।

कुरवंडुनि सांडी । शाहिर म्हणे जिवाची दूर बलाई ॥

नांवासाठीं यांत काय नाहीं । धन्य मातोश्री जिजाबाई ॥१३॥

चौक १४

किल्ला जिंकिला बातमी ही खास । कळाया शिवबास ।

आग गंजीस । लावली ज्वाळा गगनभेदी॥

मामा सूर्याजीला न्हवती शुद्धी । हरपलं भान आणि बुद्धी ॥

तिकडं धीर कुठाय माय लेकाला (जिजा शिवबाला । प्रताप गडाला )।

आधींच निघाला । अर्ध्या वाटेला । गडावर दिसली विजयी ज्वाळा ॥

रात्रभर न्हवता डोळ्याला डोळा । सूर्य उदयाची होती वेळा ॥

मारली टाच कृष्णा घोडीला । वेळ काय तिला ।

किल्ला गाठायाला । येतांच तिथं लागली पहिली चौकी ॥

लगेच घोडीवरनं उडी टाकी । सारे शोकाकुल अवलोकी ॥

चाल

शिवबा जरी धीर वीर मुत्सद्दी । तरी गोंधळला खालतं आधीं ॥

उठेना पाऊल त्याचं जलदी । चित्तीं खवळला दुःख-उदधी ॥

वरतं देखावा एकच गर्दी । तान्हा पहुडला सर्वांमधीं ॥

चाल

येतांच शिवबा कडकडून मामा भेटला ॥

शिवबास दुःख अनिवार कंठ दाटला ॥

म्हणी गड आला परी सिंह माझा हरपला ॥

आतां काय जाऊनी सांगूं माझ्या आईला ॥

बरं झालं देवा आई नाहीं अशा या वेळेला ॥

आकांत किती केला असता ठाऊक एक तुला ॥

चाल : मिळवणी

सदाशिव शाहीर सांगे सर्वाला । मातृभक्ताला ।

अनुभव आपुला । सुशिक्षण धीर वीर दायी ॥

जगीं देवता एक आई । धन्य मातोश्री जिजाबाई ॥

अखेर सांगणें एक राहिलें । ताल-सूरवाले ।

पाठीराखे भले । लाभले म्हणून रंग हाई ॥

श्रोते तुम्ही हंस-क्षीर न्यायी । सदाशिव शाहीर धन्य होई ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP