मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराज पोवाडा - छत्रपती शिवाजी महाराज

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

Mahadev Narayan Nanivadekar was born in Kisrul, Kolhapur district, Maharashtra. He completed his Matriculation in 1921 and went on to join the Pune Engineering College. Influenced by thoughts of national leaders of the time he left the college. To enhance his inborn inclination toward mimicry and his skill in the use of the ‘Dandpatta’ (a double edged sword) he started performing shows. He became famous as a mimic and a `Dantpatta Bahaddar' as far as London. He was also expert in diving. On advice of well wishers he concentrated his talents in powade singing. He learned old forms from numerous folk artists. His Gurus were the famous Shahir Lahiri Haidar, Daji Mang and others. He utilized finer points of Tamasha and was instrumental in giving a place of pride to it and Lavani in Marathi Sahitya Sammelanas and the radio. He has a large number of gramophone discs to his credit and has published numerous powade. His illustrious nephew Shahir Vasantrai Nanivadekar continues the tradition.

via : Powade.com


चौक १

छत्रपती शिवाजी रणशूर । घेऊनि तलवार ।

मोंगल जर्जर । करुनि राखिला हिंदुधर्मास ॥

स्थापियली स्वतंत्रता देशास । झळकला हिरा महाराष्ट्रास ॥जी॥

भोजराजा माहित सकलांस । रजपूत वंश । त्याचा जो अंश ।

वाढला म्हणती भोंसला त्यास ॥ त्याच कुळिं शहाजी आला जन्मास ।

पराक्रमी महान्‌ वचक यवनांस ॥ धन्य वीर शहाजी भोंसला ।

पिता शोभला । शिवाजी राजाला । जिजाबाई माता जन्म देई ॥

शिवनेरी किल्याच्या ठायीं । किल्ला हा पुण्यानजिक हाई ॥

शके १५५१ स । फाल्गुन महिन्यास । वद्य तृतीयेस ।

शिवाजी रुपें शंकर अवतरला ॥ सुटला थरकांप दुश्मानांला ।

घडा पापांचा त्यांचा भरला ॥ जसा बाळ शिवाजी वाढला ।

चंद्र भासला । जिजाऊ मातेला । बहुत शिकविल्या कला तिनं त्यास ॥

सांगुन पूर्वजांचा शौर्य इतिहास । ओनामा वीरश्रीचा पढविला त्यास ॥

बाळ शिवाजी पुसी मातेला । सांग आई मला । सर्व माहितीला ।

यवन हा आला कोठून ॥ इथं कसा बसला राज्य घेऊन ।

आई मला सांग पहिल्यापासून ॥ आला खैबर खिंडींतून ।

सिंध जिंकून । पंजाबांतून । दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ॥

खङगा फिरवुनी वारंवार । रक्ताचे वाहवले पूर ॥

तें मयूर सिंहासन । खुशाल भोगून । देश दख्खन ।

जिंकाया यवन येऊन भिडले ॥ हिंदी वीरांचे मुडदे पडले ।

अखेर यवनांचें निशाण चढलें ॥

चाल

शहाजहान बादशहा होता तवां दिल्ली तख्ताला ॥

निजामशाही राज्य अहमदनगर मुलुखाला ॥

आदिलशाही मुसलमानी राज्य विजापूराला ॥

कुतुबशाही राज्य यवनांचं गोवळकोंडयाला ॥

सार्‍या हिंदुस्थानभर मुसलमान पसरला ॥

सारी सत्ता मोंगलांची थारा न्हवता हिंदूला ॥

मानाच्या जागा मोठाल्या सार्‍या यवनांला ॥

शिपाईगिरी तेवढी हिंदूंच्या राहिली वाटयाला ॥

बाटवुनी करती मुसलमान गरीब रयतेला ॥

कापिती गायी चरचरा हामरस्त्यांला ॥

अबलांना कोणी रे वाली नाहीं राहिला ॥

हिंदुधर्म बुडाला जो तो बोलुं लागला ॥

हे शब्द ऐकूनी शिवाजी बाळ खवळला ॥

रागानं लाल तो झाला । डोळे फाडुन बघूं लागला ।

करकरा चावुनि ओंठाला । बोलला जिजाऊ मातेला ।

बोलुं नको पुन्हां कीं ग हिंदुधर्म लोपला ॥

कशि लढाई करायची आई शिकिव तूं मला ॥

देशाचा करिन उद्धार सांगतों तुला ॥

बारा वर्षं न्हवती झाली शिवाजीच्या उमरीला ॥

असा लहानपणांत लढाईचा ओनामा घेतला ॥

भाला विटा तिरकमटा निशाणबाजी शिकला ॥

ढाल पट्टा फिरंगीचे वार फिरवूं लागला ॥

घोडयावरतं बसुन भरधांव दौडुं लागला ॥

खडान् खडा देशाची माहिती घेऊं लागला ॥

कोणकोणते किल्ले आणि शहरं हायत मुलखाला ॥

चाल : मिळवणी

दादोजी कोंडदेवानं । जिजाऊ मातेनं ।

दिलं शिक्षण । शिकविला भूगोल आणि इतिहास ॥

(भारताचा भूगोल आणि इतिहास ) वर्म समजला शिवाजी खास ।

धरला मनिं स्वातंत्र्याचा ध्यास ॥

चौक २

खेळगडी मित्र जमविले । तान्हाजी भले ।

येसाजी आले । आले बाजी पासलकर दोस्त ॥

स्वराज्याचा ध्यास अहोरात । शपथा घेती रोहिडेश्वरापुढतं ॥

मग आपुल्या जहागीरींत । (पुण्याच्या मुलखांत) करुनी बंदोबस्त ।

लावितो शिस्त । सदगुणी बाळ जिजाईचा ॥

सुपुत्र शहाजी राजाचा । चेला दादोजी कोंडदेवाचा ॥

गेली काळ विजापूरला । बादशाह लाल झाला ।

हुकूम काय केला । बोलावून शहाजी राजाला ॥

ताकिद द्या तुमच्या शिवाजीला । नाहींतर आणा दरबाराला ॥

जिजामाता घेऊन बरोबर । घोडयावर स्वार ।

गांठी विजापूर । शिवाजी बाळ मोठया जल्दीनं ॥

वंदुनिया बापाचे चरण । कां हो म्हणी केलं बोलावणं ॥

बापाचा हात हिसडून । गेला धांवुन । तलवार उगारुन ।

कसाबाचा हात कलम केला ॥ गाईचा प्राण वाचवीला ।

विजापूर वेशीच्या रस्त्याला ॥

चाल : दांगट

आला बादशाहाच्या दरबाराला । नाहीं त्यानं कुर्नीसात केला।

नाहीं त्यानं लवुन मुजरा केला । राग भारी चढला बादशाहाला ।

आज्ञा करी बादशाहा शहाजीला । रीत नाहीं तुमच्या या मुलग्याला ।

दरबाराची शिस्त शिकवा त्याला । बाप मग बोलतो शिवाजीला ।

ऐक बाळा गोष्ट सांगतों तुजला । लवुन कर मुजरा बादशाहाला ।

अन्न देणारे हेच आम्हाला । आईबाप बादशाहाच आपुणांला ।

मान द्यावा अन्न देणार्‍याला ॥ दरबारांत दादा ॥

बापाला शिवाजी बोलला । ऐका समयाला ।

नमीन म्हणी भवानी शंकराला । नमीन एक माता न् पितयाला ।

सद्‌गुरु गोमाता ब्राह्मणांला । नाहीं नमणार मोंगलाला ।

अपमान नाहीं सहन व्हायचा मजला । यायचा नाहीं यापुढं दरबाराला ।

पाय नाहीं ठेवायचा विजापूरला । निरोप बापाचा घेऊन निघाला ।

जिजाबाई घेतली संगतीला । थेट आला पुण्याच्या शहराला ।

करतो प्रार्थना भवानीला ॥ हो भक्तीनं दादा ॥

चाल : मिळवणी

जय भवानी म्हणी सत्वर । प्रसन्न मजवर ।

होऊनि दे वर । सोडीव बंदीवान् हिंदु बांधवांस ॥

देऊनि जीवादान गायीब्राह्मणांस । जगवि सनातन हिंदुधर्मास ॥

चौक ३

शिवाजीचा निर्धार पुरा ठरला । भोसले वंशाला । (रजपूत वंशाला)

आलों मी जन्माला । करिन सार्थक खरा पुरुषार्थ ॥

स्वतःच्या कमाईचा घांस खाण्यांत । नाहीं परक्यांची हांजी करण्यांत ॥

चाल

तोरणा गडावर स्वातंत्र्याचें बांधुन तोरण । फडकविला झेंडा शिवाजीनं ॥

बाई जवळचा मुलुख जावळी घेतला जिंकून । प्रतापगड बांधला नवीन ॥

मावळे शेतकरी वीर जमविले गोष्टी बोलून । तलवारी बक्षीस देऊन ॥

सैन्य उभारलं हां हां म्हणतां शिवाजी राजानं । सर्वदा भवानी प्रसन्न ॥

किल्ला बांधतां पाया खणतां सांपडलें धन । लक्षुमी झाली प्रसन्न ॥

स्वातंत्र्याचें शिंग गर्जलें सह्याद्रीमधुन । बादशाहा झाला बेभान ॥

चाल : मिळवणी

विजापूरच्या आदिलशहाला । संशय असा आला ।

शिवाजी राजाला । असावा बाप शहाजी फूस देणार ॥

शिक्षा शहाजीला बादशाहा देणार । भिंतीमध्यें चिणून ठार करणार ॥

ही बातमी कळली शिवाजीला । उपाय योजला । बाप मुक्त केला ।

दिल्लीपति दोस्त केला समयास ॥ परस्पर धमकी आदिलशाहास ।

शहाजीला सोडणं भाग झालं त्यास ॥ मुत्सद्दी शिवाजी खरोखर ।

कार्य संपल्यावर । बादशहाबरोबर । शत्रु समजुनी जपुनि वागणार ॥

सावधपणे पावलं टाकणार । दोघांशी एकला टक्कर देणार ॥

शिवाजीचा कांटा काढाया । दोन्ही बादशाह्या । करिति कारवाया ।

शिवाजी फसला नाहीं कवणास ॥ गीतेचा मनन केला अभ्यास ।

ठोशाशी ठोसा देणं समयास ॥

चौक ४

पैजेचा विडा उचलून । मोठया तोर्‍यानं । आफझल्लखान ।

निघाला विजापुराहून ॥ शिवाजीला आणतों मी पकडून ।

बरळला खान शेंफारुन ॥ शिवाजी तो उंदिर डोंगराचा ।

मराठी बच्चा । नेम काय त्याचा । कदाचित घेईल अपुला प्राण ॥

सगें वीस हजार सैन्य घेऊन । निघाला मोठया तय्यारीनं ॥

तुळजापुरला धडक मारिली । भवानी भरडली । जाळपोळ केली ।

प्रलय मांडला पंढरपुरला ॥ प्रजा केली हैराण रस्त्याला ।

येऊन धडकला प्रतापगडाला ॥

चाल

खानाला चढली बेफाम धुंदी बरळला ॥

मेला देव हिंदूंचा धर्म त्यांचा संपला ॥

किती मूर्ख हिंदु हे देव म्हणती दगडाला ॥

दाढीवरनं हात फिरवीत डुलाय लागला ॥

दगडांत देव तंवा न्हवता खचित राहिलेला ॥

तो गेला होता कुठं ऐका सांगतों तुम्हांला ॥

संचरुन अंगामध्यें शिवाजीच्या प्रगटला ॥

कर तुकडे तुकडे खानाचे । कापून आण शिर त्याचें ।

भिऊं नको साह्य हाय आमुचें । तुळजापुरची भवानी नी विठोबा बोलूं लागला ॥

चाल : मिळवणी

खान प्रतापगडासी आला । वर्दी शिवाजीला ।

यावं भेटीला । कृष्णाजी पंत वकील धाडून ॥

शिवाजीन बांका वकुत वळखून । बहाणा समेटाचा दिला पटवून ॥

प्रतापगडाच्या पायथ्याखालीं । भेट ठरविली ।

तयारी करविली । शामियाना खास उभारुन ॥

मोत्याच्या झालरी लावून । शृंगारिला तंबू शिवाजीनं ॥

पंताजी गोपीनाथ भला । वकील आपुला । धाडुनी दिला ।

खानाला पुरता फसवायाला ॥ शिवाजी बघा तुम्हांस लै भ्याला ।

द्यावं जीवदान शिवाजीला ॥ भवानीनं स्वप्नीं येऊन ।

केलं वरदान । सावध रे पूर्ण । भेटीमधीं दगा करील रे खान ॥

वर्म त्याचं पुरतें ओळखून । भेटीला जा रे हुषारीनं ॥

चाल

भवानीचं होतां वरदान शिवबा हर्षला ॥

जाळीदार चिलखत सार्‍या आंगभर त्याला ॥

त्यावरनं लांब भरजरी झगा चढविला ॥

पोलादाचं शिरस्त्राण वरुन फेटा बांधला ॥

वाघनखं पोलादी धरली डाव्या पंजाला ॥

लटकावली भवानी तलवार डाव्या कमरेला ॥

चाल

भवानीचं घेतलं दर्शन । जिजा आईला केलं वंदन ।

आशीर्वाद त्यांचा मिळवून । शिवराय चालले निकडीनं ।

जिवा महाला, संभाजी कावजी वीर संगतीला ॥

अफझुल्लखानाच्या समोर येऊन ठाकला ॥

खान घाली झेंप शिवाजीला धरुन मारण्याला ॥

जणुं घालावी झेंप पतंगानं प्रखर ज्योतीला ॥

शरीरानं खान धिप्पाड शिवाजी धाकला ॥

शिवाजीच्या दसपटीचं बळ होतं खानाला ॥

उंदरासारखा टाकीन चिरडून म्हणतो शिवाजीला ॥

धरुन मुंडकं शिवाजीचं काखेंत चिरडूं लागला ॥

शिवाजीच्या बरगडींत कटयार भोसकूं लागला ॥

त्याच्या बाचं बारसं होता शिवाजी वीर जेवलेला ॥

चिलखत मजबूत अंगाला । कटयारीनं दगा नाहीं केला ।

खर्र खर्र आवाज वरच्यावर झाला । शिवाजीनं विचार मनीं केला ।

शुभ शकुन खानानं केला । आतां करुंया म्हणी डावासी डाव आपुला ॥

वाद्यनखं भोंसकून खानाचा कोथळा फाडला ॥ आंतडयाचा गोळा पोटात्‍नं बाहेर काढला ॥

खान अल्ला अल्ला बोलला । तोबा तोबा तोबा बोलला । दगा दगा ओरडूं लागला ।

त्याबरोबर सय्यद बंडा धांवुनिया आला ॥ शिवाजीच्या शिरावर पट्टा त्यानं उगारला ॥

हां हां म्हणता जिवा महाला आडवा त्याला भिडला ॥ पट्टयाचा वरच्यावर वार त्यानं तोडला ॥

खानाला शिवाजीनं पुरता खालीं पाडला ॥

होता जिवा म्हणुनि कीं हो शिवा वाचला आपुला ॥

चाल : मिळवणी

तोफांचे वार उडविले । सैन्य लढविलें ।

दडवुन ठेवलेलें । रानोमाळ पाटच रक्ताचे ॥

विजयी तें सैन्य मराठयांचें । वंदिती पाय शिवाजीचे ॥

प्रतापगडी भवानी म्होरं । खानाचं शिर ।

वाहुन सत्वर । जिजाबाई चरणीं लीन झाला ॥

मातोश्री ओवाळी त्याला । पाणी दोघांच्या नयनांला ॥

आल्या खवळून शाह्या दोन्ही । खङग परजुनी ।

सूड गर्जुनी । शिवाजीचा पूर्ण कराया नाश ॥

शिवाजी पुरुन उरला उभयांस । रम्य तो भाग पुढल्या चौकास ॥

चौक ५ : चाल

एकाहुनि एक शिवरायाचे प्रतापी सरदार ।

स्वातंत्र्याच्या मानकर्‍यांचा करुं या जैकार ॥ध्रु०॥

पन्हाळगडला वेढा घालितो शिद्दी जोहार ।

त्यांतून जातो निसटुन अमुचा शिवबा रणशूर ॥

विशाळगडची खिंड रोखितो बाजी सरदार ।

अगणित शत्रूसंगें एकला टक्कर देणार ॥

चाल

शिवराय गडावर गेले । सुखरुप जाऊन पोंचले ।

तोफांचे बार ऐकले । बाजीने प्राण सोडीले ।

घोडखिंडीमधीं अजून घुमतो बाजी सरदार ॥

स्वातंत्र्याच्या०॥ अफाट सेना शाहिस्त्याने आणली पुण्यावर ।

त्याचीं बोटेंछाटुन त्याला पळवियला दूर ॥

भेटीसाठीं आग्रा शहरी शिवबा जाणार ।

दगा करोनी बादशहा त्याला अटक करणार ॥

चाल

हिंमत धरुनी मोठी । कपटासी बनला कपटी ।

किती वर्णाव्या त्या गोष्टी ।

चाल

पेटार्‍यामधि बसुन निसटला शिवाजी बाहेर ।

बैराग्याच्या वेशें आला रायगडावर ॥

माझ्या शिवबा ये रे झडकरी भेट मला देई ।

आरती आणिते ओंवाळीते म्हणे जिजाबाई ॥

नयनांमधुनी टप् टप् अश्रू ओघळती मोती ।

आरती भरली स्वातंत्र्याची कांठोकांठ पुरती ॥

सत्यपाठीं भवानी माता सदैव असणार ॥ स्वातंत्र्याच्या०॥

पुरंदरावर मुरारबाजी कमाल करणार ।

शिरावांचुनी धड झुंजलें अजब चमत्कार ॥

मध्यरात्रीला कोंडाण्यावर घोरपड लावणार ।

निधडया छातीचा तानाजी तो चढला कडयावर ॥

चाल

येसाजी हाडकुळा दिसला । परी हत्तीसंगें लढला ।

हत्तीनें मोर्चा फिरवीला । येसाजीनें पट्टा धरिला ।

चाल

एक्या वारामधीं सोंड हत्तीची चिरी आरपार ॥ स्वातंत्र्याच्या०॥

पवाडा गातां रंगुनि जातो नानिवडेकर ।

महाराष्ट्राचा तुमचा लाडका महादेव शाहीर ॥

वीर रसाचीं गाणीं मर्दाविण कुणास कळणार ।

चुकी भूलीला क्षमा असावी करतो नमस्कार ॥

चाल

अशापरी यवनांची दिली झुगारुन सत्ता शिवाजीनं ॥

तीस वर्षे अहोरात्र खपून स्वतंत्रता मिळवून ॥

रायगड किल्ला राज्याभिषेकाला योग्य ठिकाण पाहुन ॥

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी उत्तम मुहूर्त काढला शोधून ॥

सिंहासनारुढ झाले छत्रपति शिवाजी धन्य तो दिन ॥

शके १५९६ सालीं हें अपूर्व राज्यारोहण ॥

चाल : मिळवणी

स्वातंत्र्य पूर्ण मिळवून । शिवाजी विनयानं । करी वंदन ।

जिजाऊ मातेच्या चरणांस ॥ अश्रूंच्या धारा त्यांच्या नेत्रांस ।

रायगडीं घडला सत्य इतिहास ॥ स्वातंत्र्यवीर शोभला ।

भारतीं भला । तोड नाहीं ज्याला । रक्षी जो देव देश धर्मास ॥

ब्रीद गोब्राह्मण पालक खास ॥ झळकला हिरा महाराष्ट्रास ॥

परस्त्रीस मानितो माता । भगवद् गीता । धरुनियां हातां ।

शरीरसंपदा देशकार्यास ॥ सज्ज ठोशांस ठोसा देण्यास । झळकला० ॥

शिवाजी तो शिवाजीच खरा । कोहिनूर हिरा । झळकला तु रा ।

मराठी जरिपटका मुलखांस ॥ डंका गर्जला चारी खंडास । झळकला० ॥

दर्यात दुर्ग बांधिले । कोट उभविले । खड्‌ग फिरविलें ।

क्षणामधिं केला रिपूंचा नाश ॥ महादेव गातो त्याच्या कवनास । झळकला० ॥

श्रोत्यांनो पोवाडा ऐकुनी । जाल परतुनी । मर्म घ्या ध्यानीं ।

क्षात्रतेजाचा धरा हव्यास ॥ जन्मुं द्या शिवाजी अजिं समयास ॥ झळकुंद्या०॥

महादेव तुमचा शाहीर । नानिवडेकर । कवन करणार ।

किसरुळ गांवीं जन्मला खास ॥ ठिकाण हें कोल्हापूर जिल्ह्यास । झळकला हिरा महाराष्ट्रास ॥

N/A

via : powade.com
References : N/A
Last Updated : July 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP