मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
शिवरायांचे पुण्यस्मरण

शिवाजी महाराज पोवाडा - शिवरायांचे पुण्यस्मरण

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

पन्नास वर्षे अखंड झुंजुनि राज्य हिंदवी स्थापियलें ।

महाराष्ट्राला समर्थ केलें धन्य धन्य शिवबा झाले ॥जी॥

पन्नासवर्षे जीवन जगले कार्य परी अद्‌भुत केलें ।

चैत्र शुद्ध पौर्णिमेस त्यांचें जीवन संपुनियां गेलें ॥जी॥

चंदनी रचुनी चितेला । राजदेह वरति ठेविला ।

अग्निला देह तो दिला । अन् ज्वाला धडधडा भिडल्या पहा गगनाला ॥जी॥

चाल

वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला ।

झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥

राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥

शौर्य ही सोडेना त्याला । जनसेवा सोडेना त्याला ।

चैत्राच्या शुद्ध पुनवेला । भर दुपारच्या वेळेला ।

सूर्यानं राजाचा आत्मा ओढुनी नेला ॥जी॥

पार्थिव देह हरपला । पण कीर्तिनं अमर तो केला ।

रायगड रडूं लागला । झाडं झुडपं कोमेजुन गेलीं आकांत झाला ॥जी॥

खूबलढा बुरुज तो तेव्हां रडूं लागला ॥जी॥

हिरकणी बुरुज गहिवरला । टकमक बुरुज पोरका झाला ।

धर्माचा आधार गेला ॥

चाल

शिवछत्रपती निघुनी गेले तीनशें वर्षं झालीं त्याला ।

काळ झराझर निघुनी गेला यशोगंध परि दरवळला ॥जी॥

महाराष्ट्राचा कानाकोपरा शिवकार्यानें व्यापियला ।

असा राजा कधिं नाहीं झाला पुढें कधी नच होणारा ॥जी॥

युक्तिबुद्धिनें पराक्रमानें परकी सत्ता लोळविली ।

अज्ञ मावळे फुंकर मारुन सेना त्यांचि खडी केली ॥जी॥

पांच शाह्यांना पुरुनी उरले फितुरहि नाहींसे केले ।

राजाच्या त्या पराक्रमाने सर्व मावळे भारविले ॥जी॥

पन्नास वर्षे कणाकणानें अर्पण केलीं देशाला ।

मातींतुन स्वातंत्र्य निर्मिलें असा पराक्रम हा केला ॥जी॥

प्रचंड शत्रू चालून आले तरी वीर नच डगमगला ।

त्या वैर्‍यांना दूर पळविले तोड नसे या कार्याला ॥जी॥

संकटें आणि मृत्यूशी सामना केला ॥ कधिं उसंत नाहीं त्याला ।

मावळ्यांचे सैन्य बनविलें लढा देण्याला ॥जी॥

जिवाभावाचा मित्र जमविला । स्वातंत्र्याचा छंद घेतला ।

आणि महाराष्ट्र स्वतंत्र केला ॥

चाल

असा छत्रपति कधिं ना झाला पुढें कधीं नच होणारा ।

शिवरायांचें नांव सदोदित देवो स्फूर्ती आम्हाला ॥जी॥

खडकांतुन स्वातंत्र्य फुलविलें स्वाभिमान जागा केला ।

वंदन करितो शिवप्रभूला पांडुरंग हा या वेळा ॥जी॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP