माजी सांडी केली कवणिया गुणे । तेव्हां थोरपण कळों आलें ॥१॥
नकळे संचित वोढवलें गूढ । जाणवलों मूढ तुम्हा ऐसें ॥२॥
संतांच्या वचनीं वेदांच्या भाषणें । विश्वासोनी येणे येथें झालें ॥३॥
मागिला मुकलों पुढील चुकलों । मार्गी खोळंबलो भयभीत ॥४॥
तुका म्हणे मज न दिसेचि थार । म्हणोनि विचार करितसें ॥५॥