२३०१
उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदें नारायणा साच तुझीं ॥१॥
वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥
दैत्यां काळ भक्तां मेघश्याममूर्ति । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥२॥
काम इच्छा तयां तैसा होसी राणीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥३॥
होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका म्हणे यासी वेद ग्वाही ॥४॥
२३०२
ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुम्हांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥
उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावें चित्तीं ॥ध्रु.॥
धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥२॥
पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥३॥
लाभ तयासी जाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥४॥
सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥५॥
साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥६॥
मान पावे तो आगळा मुख्य इंद्रियें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे ॥७॥
जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥८॥
भला तो चि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥९॥
आचारी अन्न काढी रे गाईं अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥१०॥
स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें जालें रे आणी अहंभाव ॥११॥
धन्य जन्मा ते चि आले रे एक हरिचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥१२॥
जोहोरि तो चि एक जाणा रे जाणे सद्धिलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥१३॥
बिळयाढा तो चि जाणा रे भक्ति दृढ शरीरीं । गांढव्या तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥१४॥
खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे म्हणे होईंल कैसें ॥१५॥
उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिडाई ॥१६॥
चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥१७॥
गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौर्याशी जन्म ॥१८॥
तुका म्हणे मना घरी रे संतसंगतिसोईं । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥१९॥
॥ येकाखडी ॥ १॥
२३०३
करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥
स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥
खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥२॥
गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥३॥
घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥४॥
नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥५॥
चरणीं ठेवा चित्ती । म्हणवा देवाचे अंकित ॥६॥
छंद नानापरी । कळा न पविजे हरी ॥७॥
जगाचा जनिता । भक्तिमुक्तींचा ही दाता ॥८॥
झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥९॥
यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥१०॥
टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥११॥
ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१२॥
डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१३॥
ढळों नये जरी । लाभ घरिचिया घरीं ॥१४॥
नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१५॥
तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥१६॥
थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१७॥
दया तिचें नांव । अहंकार जाय जंव ॥१८॥
धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥१९॥
नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२०॥
परउपकारा । वेचा शक्ति निंदा वारा ॥२१॥
फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२२॥
बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२३॥
भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२४॥
माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२५॥
यश कीर्ति मान । तरी जोडे नारायण ॥२६॥
रवि लोपे तेजें । जरी हारपे हें दुजें ॥२७॥
लकार लाविला । असतां नसतां चि उगला ॥२८॥
वासने चि धाडी । बंद खोड्या नाड्या बेडी ॥२९॥
सरतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३०॥
खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३१॥
सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३२॥
हातीं हित आहे । परि न करिसी पाहें ॥३३॥
अळंकार लेणें । ल्या रे तुळसीमुद्राभूषणें ॥३४॥
ख्याति केली विष्णुदासीं । तुका म्हणे पाहा कैसी ॥३५॥
२३०४
देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥१॥
नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणआपणापें पाहीं ॥ध्रु.॥
पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥
वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥
तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥
॥ लोहागांवीं कीर्तनांत मेलें मूल जीत झालें ते समयीं स्वामींनीं अभंग केले ते ॥
२३०५
अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥
मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥
थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडें ॥२॥
तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥३॥
२३०६
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥
आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥
यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥
तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥
अलंकापुरीं ब्राम्हण धरणें बसून बेताळीस दिवस उपवासी होता त्यास द्दष्टांत कीं देहूस तुकोबापाशी जाणें. ब्राम्हण स्वामीपें आला त्याबद्दल अभंग ॥ ३१ ॥
२३०७
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥ध्रु.॥
न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥
आळिकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥
तुका म्हणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देई धीर मना ॥४॥
२३०८
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईंच्या वरा पांडुरंगा ॥१॥
अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ध्रु.॥
अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्वसत्ता धरितया ॥२॥
अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्ती द्यावें ॥३॥
तुका म्हणे नाहीं अधिकार तैसी । सरती पायांपाशीं केली मागें ॥४॥
२३०९
नव्हें दास खरा । परि जाला हा डांगोरा ॥१॥
यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ध्रु.॥
नाहीं पुण्यगाठीं । जे हें वेचूं कोणासाठीं ॥२॥
तुका म्हणे कां उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥
२३१०
तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥
ऐसे आम्ही जाणों दास । म्हणोनि जालों उदास ॥ध्रु.॥
तुम्ही दिला धीर। तेणें मन झालें स्थिर ॥२॥
तुका म्हणे आड । केलों मी हें तुझें कोड ॥३॥
२३११
काय मी जाणता । तुम्हांहुनि अनंता ॥१॥
जो हा करूं अतिशय । कां तुम्हां दया नये ॥ध्रु.॥
काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी वदे तुम्हांहुनि ॥३॥
२३१२
काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥१॥
ऐकोनियां लिखित । म्हुण जाणवली हे मात ॥ध्रु.॥
तरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥२॥
तुका म्हणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥३॥
२३१३
ठेवूनियां डोईं । पायीं जालों उतराईं ॥१॥
कारण तें तुम्हीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥
प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥२॥
तुका म्हणे भार । तुम्ही जाणां थोडा फार ॥३॥
उपदेश अभंग ॥ ११ ॥
२३१४
नको कांहीं पडों ग्रंथाचे भरीं । शीघ व्रत करीं हें चि एक ॥१॥
देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥ध्रु.॥
साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकीं न चुकती ॥२॥
उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥
रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरि ॥४॥
तुका म्हणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥
२३१५
नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥
उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥२॥
आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥३॥
स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥४॥
तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥५॥
२३१६
तजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥
आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥
नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥२॥
तुका म्हणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥
२३१७
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥
आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी॥३॥
२३१८
ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥
म्हणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥
सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥
तुका म्हणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥३॥
२३१९
पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥
नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥
पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥२॥
तप तिर्थाटण तेव्हां कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि हरिच्या नामीं ॥३॥
यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥४॥
तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥५॥
२३२०
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥
त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥
आहे हा आधार । नाम त्याचें विश्वंभर ॥२॥
नाही रिता ठाव । तुका म्हणे पसरीं भाव ॥३॥
२३२१
संकोचोनि काय जालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें ॥१॥
करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥
घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥२॥
झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥३॥
२३२२
माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥
केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥ध्रु.॥
घेऊनि विभाग जावें लवलाहा । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥
तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥३॥
२३२३
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥१॥
मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे । इतर तुळणें काय पुरे ॥२॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोलीं । म्हणोनि ठेविली पायीं डोईं ॥३॥
२३२४
बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्धी ॥ध्रु.॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥२॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥३॥
२३२५
काय तुम्ही जाणां । करूं अव्हेर नारायणा ॥१॥
तरी या लटिक्याची गोही । निवडली दुसरे ठायीं ॥ध्रु.॥
कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥२॥
आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥३॥
आणीक कोणी मिती । त्यांच्या चिंतनें विश्रांति ॥४॥
तुका म्हणे बीज पोटीं । फळ तैसें चि सेवटीं ॥५॥
२३२६
अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥
काय त्याचे वेल जाईंल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥
मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचें धोंडा उभा ठाके ॥२॥
तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं अन्ना न मिळे जैसा ॥३॥
२३२७.
तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले ते ॥१॥
राज्यमदा आड सुखाची संपत्ति । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ध्रु.॥
इंद्रियें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥२॥
तुका म्हणे हरिभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥३॥
२३२८
हरिकथेवांचून इच्छिती स्वहित । हरिजन चित्ती न घला तेथें ॥१॥
जाईंल भंगोन आपुला विश्वास । होईंल या नास कारणांचा ॥ध्रु.॥
ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥२॥
तुका म्हणे काय जालेसि जाणते । देवा ही परते थोर तुम्ही ॥३॥
२३२९
सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥
घेईंल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्ती सांदी जनां ॥ध्रु.॥
खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥२॥
तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥३॥
२३३०
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥
करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥
जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्तीचिया ॥३॥
२३३१
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥
सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥
तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥
२३३२
हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥
त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥
सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥
तुका म्हणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥३॥
२३३३
प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥
उर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥
शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥
२३३४
आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥
ऐसें करींपांडुरंगा । प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥
सर्व काळ नये । वाचेविट आड भये ॥२॥
तुका वैष्णवांसंगती । हें चि भजन पंगती ॥३॥
२३३५
उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥
आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारावी आस ॥ध्रु.॥
भक्तीच्या उत्कषॉ । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥२॥
तुका म्हणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥३॥
२३३६
करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥
कोणाकारणें हें जालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥
तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥३॥
२३३७
तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥
आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥
देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥
तुका म्हणे सेवा समर्पूनि पायीं । जालों उतराईं ठावें असो ॥३॥
॥३१॥
२३३८
मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥१॥
ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥
आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥२॥
तुका म्हणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥३॥
२३३९
माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥
गोष्टी न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥
स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥
तुका म्हणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥३॥
२३४०
लवविलें तया सवे लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥१॥
भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥
अर्चन वंदन नवविधा भक्ति । दया क्षमा शांति ठायीं ॥२॥
तये गांवीं नाहीं दुःखाची वसती । अवघा चि भूतीं नारायण ॥३॥
अवघें चि जालें सोंवळें ब्रम्हांड । विटाळाचें तोंड न देखती ॥४॥
तुका म्हणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ति ॥५॥
२३४१
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥
नाम विठोबाचें घेईंन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका म्हणे ॥३॥
२३४२
संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥
जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
२३४३
कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥१॥
मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥
पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥२॥
मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥३॥
मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तें चि मुखीं ॥४॥
आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
२३४४
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥
बरें सेवन उपकारा । द्यावें द्यावें या उत्तरा ॥ध्रु.॥
सरळ आणि मृद । कथा पाहावी तें उर्ध ॥२॥
गात जात तुका । हा चि उपदेश आइका ॥३॥
२३४५
कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीने गोविंदा हें चि एक आवडे ॥१॥
टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥ध्रु.॥
नये अळसें मोडूं अंग कथे कानवडें हुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥२॥
तोंडी विडा माने ताठा थोरपणे धाली गेंठा । चित्ती नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥४॥
कथे इच्छी मान दावूनियां थोरपण रजा । संकोच न लुगडी सांवरी तो चांडाळा ॥५॥
आपण बैसे बाजेवरी सामान हरिच्या दासां धरी । तरि तो सुळावरि वाहिजे निश्चयेसीं ॥६॥
येतां नकरी नमस्कार कर जोडोनियां नम्र । न म्हणवितां थोर आणिकां खेटी तो चांडाळ ॥७॥
तुका विनवी जना कथे नाणावें अवगुणा । करा नारायणा ॠणी समर्पक भावें ॥८॥
२३४६
कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥१॥
ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥
मंत्र स्वल्प जना उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा क्षणें जळती महा दोष ॥२॥
भावें करितां कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाहीं म्हणे तुका ॥३॥
२३४७
कथा त्रिवेणीसंगम देव भक्त आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥१॥
जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा ॥ध्रु.॥
तीर्थी तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां॥२॥
अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका म्हणे ब्रम्हा नेणे वर्णू या सुखा ॥३॥
२३४८
सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥
आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥
टाळी वाहूनियां विठ्ठल म्हणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥२॥
तुका म्हणे देवा नुपेक्षावें आम्हां । न्यावें निजधामा आपुलिया ॥३॥
२३४९
जळती कीर्तनें । दोष पळतील विघ्नें ॥१॥
हें चि बिळवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥
किळ पापाची हे मूर्ति । नामखड्ग घेऊं हातीं ॥२॥
तुका म्हणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥३॥
२३५०
यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥
चक्र गदा घेउनी हरि उभा असे त्यांचे द्वारीं । लIमी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥
ते बिळयाशिरोमणी हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥
२३५१
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळे ॥१॥
काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥
येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥२॥
तुका म्हणें पाहिलें मागें । एवढ्या वेगें अंतरला ॥३॥
२३५२
आपुल्या आम्ही पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें ॥१॥
मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥
बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥२॥
तुका म्हणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥३॥
२३५३
धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥
चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥
दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥
तुका म्हणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥
२३५४
उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया ॥१॥
वेटाळिला भोंवता हरी । मयोरफेरीं नाचती ॥ध्रु.॥
मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥
तुका म्हणे नारायणीं । निराजनी मीनलिया ॥३॥
२३५५
विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥
म्हणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥
दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ॥२॥
तुका म्हणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥३॥
२३५६
आलिंगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥१॥
न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ध्रु.॥
वचनासी वचन मिळे । रिघती डोळे डोळियांत ॥२॥
तुका म्हणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥३॥
२३५७
कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥१॥
अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥
अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥
तुका म्हणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥३॥
२३५८
येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥
ती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥
अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥२॥
तुका म्हणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥३॥
॥८॥
२३५९
चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥
नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥
सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा ॥२॥
तुका म्हणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला ॥३॥
२३६०
करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एकां एक ॥१॥
गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥
प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥२॥
तुका म्हणे बहुजन्मांचे खंडण । होइल हा सीण निवारोनि ॥३॥
॥२॥
२३६१
नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥१॥
क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥
आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥२॥
तुका म्हणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥३॥
स्वामीचें अभंगींचें नांव काढून सालोमालो आपलें नांव घालीत त्यावर अभंग ॥ ८ ॥
२३६२
सालोमालो हरिचे दास । म्हणउन केला अवघा नास ॥१॥
अवघें बचमंगळ केलें । म्हणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥
मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥२॥
तुका म्हणे कवी । जगामधीं रूढ दावी ॥३॥
२३६३
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥
त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे बर्या वोजा ॥ध्रु.॥
अभिलाषाच्या सुखें । अंतीं होती काळीं मुखें ॥२॥
तुका म्हणे चोरा । होय भूषण मातेरा ॥३॥
२३६४
कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥
ऐशा अभाग्याच्या बुद्धि । सत्य लोपी नाहीं शुद्धि ॥ध्रु.॥
नाक कापुनि लावी सोनें । कोण अळंकार तेणें ॥२॥
तुका म्हणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥३॥
२३६५
कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें ॥
काय घोंगालि पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ध्रु.॥
सुइणीपुढें चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥
तुका म्हणे ज्ञान । दिमाकाची भनभन ॥३॥
२३६६
विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥
हा तो निवाड्याचा ठाव । खर्या खोट्या निवडी भाव ॥ध्रु.॥
गर्हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥२॥
लावूं जाणे विल्हे। तुका साच आणिक कल्हे ॥३॥
२३६७
विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये ॥१॥
देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥
वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रम्हस्थिति ॥२॥
तुका म्हणे असतां देहीं । तेथें नाही जेमेतीं ॥३॥
२३६८
नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥१॥
गुणअवगुण निवाडा । म्हैस म्हैस रेडा रेडा ॥ध्रु.॥
जनीं जनार्दन । साक्ष त्यासी लोटांगण ॥२॥
तुका म्हणे खडे । निवडू दळणीं घडघडे ॥३॥
॥८॥
२३६९
जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें ॥१॥
जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥
सकळां पाडीये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥२॥
तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥
२३७०
मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥
याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥
उदक अन्न काये म्हणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥
व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥
तुका म्हणे जया आपुलें स्वहित । करणें तो चि प्रीत धरी कथे ॥४॥
२३७१
जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें ॥१॥
वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥ध्रु.॥
पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥२॥
तुका म्हणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥३॥
२३७२
नाम दुसी त्याचें नको दरषण । विष तें वचन वाटे मज ॥१॥
अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें ॥ध्रु.॥
काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥२॥
काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥३॥
तुका म्हणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥४॥
२३७३
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥
उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥
बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥२॥
तुका म्हणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥
२३७४
नव्हे जोखाईं जोखाईं । मायराणी मेसाबाईं ॥१॥
बिळया माझा पंढरिराव । जो या देवांचा ही देव ॥ध्रु.॥
रंडी चंडी शक्ति । मद्यमांस भिक्षती ॥२॥
बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाटीं देव ॥३॥
गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥४॥
मुंज्या म्हैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥५॥
वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें ॥६॥
तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईंचा पती ॥७॥
२३७५
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥
मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥
नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥२॥
तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥
२३७६
मायें मोकलिलें कोठें जावें बळें । आपुलिया बळें न वंचे तें ॥१॥
रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥
भांडवल आम्हां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥२॥
तुका म्हणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥३॥
२३७७
नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥१॥
गाईंगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलीका ॥ध्रु.॥
तें हें ध्यान दिगांबर । कटीं कर मिरवती ॥२॥
नेणपणे उगें चि उभें । भक्तिलोभें राहिलें ॥३॥
नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥४॥
सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥
मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्या काळें ॥६॥
रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥
भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर ॥८॥
तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥
तुका म्हणे वैकुंठवासी । भक्तांपासीं राहिला ॥१०॥
२३७८
विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥
तयासी बोलतां होईंल विटाळ । नेव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥
विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥
तुका म्हणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥
२३७९
तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम ॥१॥
कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें । रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥
फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नांवें । तो चि होइजेल स्वभावें ॥३॥
२३८०
पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥
मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥
जें निंदिलें शास्त्रें । वंद्य जालें नाममात्रें ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥३॥
२३८१
नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥१॥
दों अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥
नाहीं वर्णाधमयाती । नामीं अवघीं चि सरतीं ॥२॥
तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥३॥
२३८२
नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आईंकिला ॥१॥
सांगा विनवितों तुम्हांसी । संत महंत सद्धि ॠषी ॥ध्रु.॥
नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥
सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥३॥
२३८३
फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥
नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥
उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥
तुका म्हणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥३॥
॥१५॥
२३८४
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥
राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥२॥
बाहातरी खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥
२३८५
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहें देवा ॥१॥
निरसनें माझा होईंल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥
राहिलों चिकटूण कांहीं चि न कळे । कोणा नेणों काळे उदय भाग्य ॥२॥
तुका म्हणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसें कीव देवराया ॥३॥
॥१॥
२३८६
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥
मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंके ॥ध्रु.॥
भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥२॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥३॥
२३८७
भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥
म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥
आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥२॥
तुका म्हणे भार घातलिया वरी । होईंल कैवारी नारायण ॥३॥
२३८८
निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक ॥१॥
तरी च अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥
सोइरें पिशुन समान चि घटे । चित्ती पर ओढे उपकारी ॥२॥
तुका म्हणे चित्ती जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥३॥
२३८९
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥
रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥
मानदंभांसाटीं । पडे देवासवें तुटी ॥२॥
तुका म्हणे मेवा । कैचा वेठीच्या नदवां ॥३॥
२३९०
तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥
मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥
किळवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥२॥
तुका म्हणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ॥३॥
२३९१
पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥
आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥
नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥
तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥३॥
२३९२
काविळयासी नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळसें ॥१॥
तैसें कुधनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥
कडु भोंपळ्याचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥२॥
तुका म्हणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥३॥
२३९३
लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥१॥
जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥
मग न लगे पारखी । अवघीं सकट सारखीं ॥२॥
तुका म्हणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥३॥
२३९४.
नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंती ॥१॥
जाय वेगीं पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥ध्रु.॥
वचनाचा न करीं गोवा । रिघें देवासीं शरण ॥२॥
तुका म्हणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥
२३९५
बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥
परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥
चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचन ॥२॥
तुका म्हणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध॥३॥
२३९६
म्हणऊनि काकुळती । येतों पुढतों पुढती । तुम्हां असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥
फेडूं आलेती दरद्रि । तरी न लगे उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥
कोठें न घली धांव । याजसाठीं तजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥
कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुम्हां जागवी ॥३॥
२३९७
बहु नांवें ठेविलीं स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥
बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमट्याचा ॥ध्रु.॥
बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥
बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां॥३॥
२३९८
येहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं ॥१॥
कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥
सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥२॥
तुका म्हणे वेंच लाविला संचिता । होइल घेतां लोभ कोणां ॥३॥
२३९९
रोजकीर्दी जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥
नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥
चोरासाटीं रदबदल आटा हाश । जळो जिणे दाश बहुताचें ॥२॥
सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाड्यापाशी गुंपों नेणे ॥३॥
२४००
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला॥१॥
आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥
हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥२॥
तुका म्हणे नाहीं पापपुण्य खतीं । झाड्याची हुजती हातां आली ॥३॥