२००१
रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥
आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥ध्रु.॥
रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥
तुका म्हणे केलें कळिकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥
२००२
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥
ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥
आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥२॥
तुका म्हणे मुगुटमणी हे भक्ति । आणीक विश्रांति अरतिया ॥३॥
२००३
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥
करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरि ॥ध्रु.॥
वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥२॥
तुका म्हणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥३॥
२००४
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥
चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥
उच्छष्टि हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥
तुका म्हणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥३॥
॥४॥
२००५
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥
कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥
ओठ हात तुझा जागा । येर सिणसी वाउगा ॥२॥
तुका म्हणे श्रम । एक विसरतां राम ॥३॥
२००६
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥१॥
होसी फजीती वरपडा । लक्ष चौर्यासीचे वेढां ॥ध्रु.॥
नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥२॥
एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥३॥
जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥४॥
तुका म्हणे हित पाहें । जोंवरि हें हातीं आहे ॥५॥
२००७
लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥
घेई हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ध्रु.॥
घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥२॥
हित सावकासें । म्हणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका म्हणे नेणसी ॥३॥
॥३॥
२००८
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥१॥
मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥
होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥
तुका म्हणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥३॥
२००९
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥१॥
जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥
जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥२॥
तुका म्हणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥३॥
२०१०
आम्ही बोलों तें तुज कळे । एक दोहीं ठायीं खेळे ॥१॥
काय परिहाराचें काम । जाणें अंतरींचें राम ॥ध्रु.॥
कळोनियां काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥२॥
कारण सवें एका । अवघें आहे म्हणे तुका ॥३॥
२०११
उमटे तें ठायीं । तुझे निरोपावें पायीं ॥१॥
आम्हीं करावें चिंतन । तुझें नामसंकीर्तन ॥ध्रु.॥
भोजन भोजनाच्या काळीं । मागों करूनियां आळी ॥२॥
तुका म्हणे माथां । भार तुझ्या पंढरिनाथा ॥३॥
२०१२
केला पण सांडी । ऐसियासी म्हणती लंडी ॥१॥
आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥
आपला निवाड । आपणें चि करितां गोड ॥२॥
तुम्हीं आम्हीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥३॥
आसे धुरे उणें । मागें सरे तुका म्हणे ॥४॥
२०१३
न व्हावें तें जालें । तुम्हां आम्हांसी लागलें ॥१॥
आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥
पाटोळ्यासवेंसाटी । दिली रगट्याची गांठी ॥२॥
तुका म्हणे हरी । आणूनियां करिन सरी ॥३॥
२०१४
पतितमिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥
आतां बळिया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥
पावणांचा ठसा । दावीं मज तुझा कैसा ॥२॥
वाव तुका म्हणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥३॥
२०१५
करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तों झोंडाईंचे चाळे । काय पोटीं तें न कळे ॥ध्रु.॥
आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
तुका म्हणे किती । बुडविलीं आळवितीं ॥३॥
२०१६
नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥१॥
आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥
पांचांमधीं जावें । थोड्यासाटीं फजित व्हावें ॥२॥
तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आम्ही कांहीं ॥३॥
टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥
तुका म्हणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥५॥
॥९॥
२०१७
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥
पाणचोर्याचें दार । वरिल दाटावें तें थोर ॥२॥
वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥
एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥
तुका म्हणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥५॥
२०१८
करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी ॥१॥
म्हणवूं हरिचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें कळिकाळ ॥ध्रु.॥
आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥
तुका म्हणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥
॥२॥
२०१९
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥
अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईंट ॥ध्रु.॥
काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥२॥
तुका म्हणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥३॥
२०२०
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥
आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥
आलें अंगासी तें बळिवंत गाढें । काय वेड्यापुढें धर्मनीत ॥२॥
तुका म्हणे कळों येईंल तो भाव । अंगावरिल घाव उमटतां ॥३॥
॥२॥
२०२१
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
अमृतें सागर भरवे ती गंगा । म्हणवेल उगा राहें काळा ॥२॥
भूत भविष्य कळों येईंल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धिसिद्धी ॥३॥
स्थान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रम्हांडासी ॥४॥
तुका म्हणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥५॥
॥१॥
२०२२
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरि ॥१॥
इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥
विसरले मुक्ति भक्तिअभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥२॥
तुका म्हणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥३॥
२०२३
भक्तां समागमें सर्वभावें हरि । सर्व काम करी न संगतां ॥१॥
सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा ॥ध्रु.॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥
तुका म्हणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥३॥
२०२४
प्रेमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥
सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥
सकळ इंद्रियें जालीं ब्रम्हरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥२॥
तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥३॥
॥३॥
२०२५
कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥
काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥
नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥२॥
कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥३॥
तुका म्हणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥४॥
॥१॥
२०२६
काळ जवळि च उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥१॥
कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं ॥ध्रु.॥
काळ जवळिच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥२॥
काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥३॥
काळ भोंवताला भोंवे । राम येऊं नेदी जिव्हे ॥४॥
तुका म्हणे काळा । कर्म मळितें तें जाळा ॥५॥
॥१॥
२०२७
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥
धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥
मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥२॥
तुका म्हणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥
२०२८
साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें ॥१॥
तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥
बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥
तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥
॥२॥
२०२९
तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्मैपणे ।
नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें ।
भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें ।
विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥
आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्वहीन ।
दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥
आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप ।
मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप ।
ज्योति ना अंधार अवघा एकंकार । तेथें काय पुण्यपाप ।
विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥२॥
बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया ।
सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया ।
मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां ।
तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका म्हणे देवराया ॥३॥
॥१॥
२०३०
कथा पुराण ऐकतां । झोंप नाथिलि तत्वता । खाटेवरि पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥१॥
ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । जाले जाणते जो चित्ती । कांहीं नेघे आपुला ॥ध्रु.॥
उदक लावितां न धरे । चिंता करी केव्हां सरे । जाऊं नका धीरें । म्हणे करितां ढवाळ्या ॥२॥
जवळी गोंचिड क्षीरा । जैसी कमळणी ददुऩरा । तुका म्हणे दुरा । देशत्यागें तयासी ॥३॥
२०३१
संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे ।
भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥
आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां ।
शुकनळिकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकळिया ॥ध्रु॥
पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला ।
जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥२॥
दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न म्हणें चाडा ।
धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥३॥
॥२॥
२०३२
कथे उभा अंग राखे जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥
येथें तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥
कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥
तुका म्हणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥३॥
२०३३
नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥
तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥
नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥
तुका म्हणे तया करावें तें काईं । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥३॥
२०३४
जवळी नाहीं चित्ति । काय मांडियेलें प्रेत ॥१॥
कैसा पाहे चद्रिद्राष्टि । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥
कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥२॥
त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका म्हणे ॥३॥
२०३५
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धि । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥
काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥
तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥२॥
तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगळिया घरा येती ॥३॥
॥४॥
२०३६
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं ढवळारें
एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माड ।
अवघियां बाजार एक चि जाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥
गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥
एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं ।
फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे ।
सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥२॥
एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती । ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें ।
तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं
तुका म्हणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥३॥
॥१॥
२०३७
नाहीं आम्हां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥१॥
पाहें तेथें पांडुरंग रखुमाईं । सत्यभामा राही जननिया ॥ध्रु.॥
लज्जा भय कांही आम्हां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥२॥
तुका म्हणे आम्ही सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥३॥
२०३८
गर्भा असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥
कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥
सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥२॥
गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥३॥
पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥४॥
तुका म्हणे निश्चळ राहें । होईंल तें सहज पाहें ॥५॥
२०३९
न म्हणे कवणां सद्धि साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥१॥
ऐसें माझे बुद्धि काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥
गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥२॥
देई चरणसेवा भूतांचें भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥३॥
आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥४॥
तुका म्हणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देई प्रेम देवा ॥५॥
२०४०
अग्निमाजी गेलें । अग्नि होऊन तें च ठेलें ॥१॥
काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ध्रु.॥
लोह लागेपरिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ॥२॥
सरिता वोहळा ओघा । गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥३॥
चंदनाच्या वासें । तरु चंदन जालेस्पर्शे ॥४॥
तुका जडला संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं ॥५॥
॥४॥
२०४१
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥१॥
रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥
प्रेमामृतपान । होईंल चरणरजें स्नान ॥२॥
तुका म्हणे सुखें । तया हरतील दुःखें ॥३॥
२०४२
करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥
माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥ध्रु.॥
ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥२॥
तुका म्हणे गोड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
॥२॥
२०४३
वेद जया गाती । आम्हां तयाची संगति ॥१॥
नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥
ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥२॥
तुका म्हणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥३॥
२०४४
तूं श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥
दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥
माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥३॥
२०४५
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥
म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥
आम्ही घ्यावें नाम । तुम्हां समाधान काम ॥२॥
तुका म्हणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥३॥
२०४६
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥
करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥
अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥
तुका म्हणे आईं । हातीं धरूनि संग देईं ॥३॥
२०४७
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥
तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥
नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥२॥
तुका म्हणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥३॥
२०४८
मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥१॥
व्याला वाडविलें म्हुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥
माझें पोट धालें । तुझे अंगीं उमटलें ॥२॥
तुका म्हणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥३॥
२०४९
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥
हें चि माझेंभांडवल ।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥
भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥२॥
तुका म्हणे डोईं । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥३॥
२०५०
आम्ही घ्यावें तुझें नाम । तुम्ही आम्हां द्यावें प्रेम ॥१॥
ऐसें निवडिलें मुळीं । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु.॥
माझी डोईं पायांवरी । तुम्ही न धरावी दुरी ॥२॥
तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥
२०५१
वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥१॥
न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥
जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥
तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा ॥३॥
२०५२
पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥१॥
ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥
जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥
तुका म्हणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥
२०५३
आम्हां वैष्णवांचा । नेम काया मनें वाचा ॥१॥
धीर धरूं जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु.॥
उचित समय । लाजनिवारावें भय ॥२॥
तुका म्हणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥३॥
२०५४
उलंघिली लाज । तेणें साधियेलें काज ॥१॥
सुखें नाचे पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु.॥
नामाची सांगडी । सुखें बांधली आवडी ॥२॥
तुका म्हणे लोकां । उरली वाचा मारीं हाका ॥३॥
२०५५
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥
आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥
किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥२॥
माझें मज नारायणा । देतां कां रे नये मना ॥३॥
भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥४॥
तुका म्हणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥५॥
२०५६
जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥१॥
नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥
करूनियां नीती । दिल्याप्रमाणें चालती ॥२॥
हातीं दंड काठी । भा जिवाचिये साटीं ॥३॥
बळ बुद्धी युक्ति । तुज दिल्या सर्व शक्ति ॥४॥
तुका म्हणे खरा । आतां घेईंन मुशारा ॥५॥
२०५७
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥
करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥
चित्त चित्ती ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥
तुका म्हणे देवा । पावे अंतरींची सेवा ॥३॥
॥१५॥
२०५८
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण । तयावांचूनि काय तें ॥१॥
कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥
काम क्रोध माझा देहीं । भेदाभेद गेले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां ॥२॥
हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हां न कळे ॥३॥
२०५९
आम्ही भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥
तरी म्यां काय गा करावें । कोण्या रीती तुज पावें । न संगतां ठावें । तुम्हांविण न पडे ॥ध्रु.॥
दोनी फाकलिया वाटा । गोवी केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड रानें भरती ॥२॥
तुका म्हणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आतां येणें वेळे । चरण जीवें न सोडीं ॥३॥
२०६०
वेरझारीं जाला सीण । बहु केलें क्षीदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥
आतां काय भीड भार । धरूनियां लोकचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥
आलें बहुतांच्या मना । कां रे न होसी शाहाणा । मुळींच्या वचना । आम्ही जागों आपुल्या ॥२॥
तुका म्हणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥३॥
॥३॥
२०६१
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥
तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥
द्यावें तें उत्तर । येतो प्रतित्याचा फेर ॥२॥
तुका म्हणे मनीं । आपुल्या च लाभहानि ॥३॥
२०६२
रंगलें या रंगें पालट न घरी । खेवलें अंतरीं पालटेना ॥१॥
सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥
पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मला आडवरी ॥२॥
तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥३॥
२०६३
जगा काळ खाय । आम्ही माथां दिले पाय ॥१॥
नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥
हरिच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥२॥
तुका म्हणे हळु । जाला कढत शीतळु ॥३॥
॥३॥
२०६४
ब्रम्हरस घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥
पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥
भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥२॥
तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥
२०६५
अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥१॥
सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥
निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥२॥
तुका म्हणे भावसार । करूनि फार मिश्रित ॥३॥
२०६६
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥
नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥
तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥
२०६७
करितां कोणाचें ही काज । नाहीं लाज देवासी ॥१॥
बरे करावें हें काम । धरिलें नाम दीनबंधुस ॥ध्रु.॥
करुनि अराणूक पाहे । भलत्या साह्य व्हावया ॥२॥
बोले तैसी करणी करी । तुका म्हणे एक हरि ॥३॥
॥४॥
२०६८
उभें चंद्रभागे तीरीं । कट धरोनियां करीं ।
पाउलें गोजिरीं । विटेवरी शोभलीं ॥१॥
त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचा मनें हेवा ।
संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥
रूप डोळियां आवडे । कीर्ति श्रवणीं पवाडे ।
मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥२॥
तुका म्हणे नाम । ज्याचें नासी क्रोध काम ।
हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥३॥
२०६९
आम्हां हें चि भांडवल । म्हणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥
सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥
बाखराचें वाण । सांडूं हें जेवूं जेवण ॥२॥
न लगे वारंवार । तुका म्हणे वेरझार ॥३॥
२०७०
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥१॥
आलें भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ध्रु.॥
दृढ माझें मन । येथें राखावें बांधोन ॥२॥
तुका म्हणे वाटे । नको फुटों देऊं फांटे ॥३॥
॥३॥
२०७१
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥
करी अक्षरांची आटी । एके कवडी च साटीं ॥ध्रु.॥
निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥२॥
तुका म्हणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥३॥
२०७२
मागणें तें मागों देवा । करूं भक्ति त्याची सेवा ॥१॥
काय उणे तयापाशीं । रिद्धिसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥
कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥२॥
तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥३॥
२०७३
चित्ती नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥१॥
असे भक्तांचिये घरीं । काम न संगतां करी ॥ध्रु.॥
अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥२॥
तुका म्हणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥३॥
२०७४
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥
नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥
वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥२॥
तुका म्हणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कुर्हाडी ॥३॥
॥४॥
२०७५
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥
वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥
पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥२॥
तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥
२०७६
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥
डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥
बहुथोड्या आड । निवारितां लाभें जाड ॥२॥
तुका म्हणे खरें । नेलें हातींचे अंधारें ॥३॥
२०७७
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥
वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥
अराणूक नाहीं कधीं । जाली तरि भेदबुद्धि ॥२॥
अंतरली नाव । तुका म्हणे नाहीं ठाव ॥३॥
॥३॥
२०७८
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥
लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥
शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥
तुका म्हणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥३॥
२०७९
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥
पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥
वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥
तुका म्हणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥३॥
२०८०
बुद्धिमंद शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥
जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंकी जन ॥ध्रु.॥
खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥२॥
तुका म्हणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥३॥
॥३॥
२०८१
पूर्वजांसी नकाऩ । जाणें तें आइका ॥१॥
निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥
मात्रागमना ऐसी । जोडी पातकांची रासी ॥२॥
तुका म्हणे वाट । कुंभपाकाची ते नीट ॥
२०८२
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥
देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥
कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥
लेंकरें वत्ति पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥
आपुली शुद्धि जया नाहीं । आणिकांची ते जाणे काईं ॥४॥
तुका म्हणे ऐसे जन । नर्का जातां राखे कोण ॥५॥
२०८३
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे ॥१॥
जें जयासी रुचे तें करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥ध्रु.॥
ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥२॥
बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥३॥
तुका म्हणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥४॥
२०८४
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥
काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥
नाहीं इंद्रियां दमन । काय मांडिला दुकान ॥३॥
सारविलें निकें । वरि माजी अवघें फिकें ॥४॥
तुका म्हणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥५॥
२०८५
लय लक्षूनियां जालों म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥
जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चिंतीनें ॥ध्रु.॥
तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥२॥
कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥३॥
तुका म्हणे जरी होईंल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥४॥
॥५॥
२०८६
पुरली धांव कडिये घेई । पुढें पायीं न चलवीं ॥१॥
कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥
अवघी निवारावी भूक । अवघ्या दुःख जन्माचें ॥२॥
तुका म्हणे बोलवेना । लावीं स्तनां विश्वरें ॥३॥
२०८७
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥१॥
आतां तूं चि बाह्यात्कारीं । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥
नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥२॥
तुका म्हणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
२०८८
जेथें माझी दृष्टि जाय । तेथें पाय भावीन ॥१॥
असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥
अवघा च अवघे देसी । सुख घेवविसी संपन्न ॥२॥
तुका म्हणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥३॥
॥३॥
२०८९
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥१॥
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥ध्रु.॥
कोण्या काळें सुखा । ऐशा कोण पावता ॥२॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें ॥४॥
२०९०
अवघे चुकविले सायास । तप रासी जीवा नास ॥१॥
जीव देऊनियां बळी । अवघीं तारिलीं दुर्बळीं । केला भूमंडळीं । माजी थोर पवाडा ॥ध्रु.॥
कांहीं न मगे याची गती । लुटवितो जगा हातीं ॥२॥
तुका म्हणे भक्तराजा । कोण वर्णी पार तुझा ॥३॥
२०९१
प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥१॥
न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥
अवघा त्याचा होत । जीव भावाही सहित ॥२॥
वदे उपचाराची वाणी । कांहीं माग म्हणऊनि ॥३॥
उदासीनाच्या लागें । तुका म्हणे धांवे मागें ॥४॥
२०९२
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥१॥
हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥
होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥२॥
तुका म्हणे भक्तिभाव । हा चि देवाचा ही देव ॥३॥
२०९३
जाणे अंतरिंचा भाव । तो चि करितो उपाव ॥१॥
न लगें सांगावें मांगावें ॥
जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें । फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥
बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥२॥
तुका म्हणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥३॥
२०९४
आम्ही नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें ॥१॥
देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥
आम्हां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥२॥
तुका म्हणे संतीं । वर्म दिलें आम्हां हातीं ॥३॥
२०९५
जालों निर्भर मानसीं । म्हणऊनि कळलासी ॥१॥
तुझे म्हणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥
चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥
तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥३॥
तुका म्हणे तेणें सुखें । विसरलों जन्मदुःख ॥४॥
॥७॥
२०९६
नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥१॥
काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥
तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥२॥
एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें ॥३॥
तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥४॥
काय करूं एका । मुखें सांग म्हणे तुका ॥५॥
२०९७
विठ्ठल माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥
घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥
क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥२॥
तुका म्हणे कृपावंत । ठेवीं आम्हांपाशीं चत्ति ॥३॥
२०९८
भक्तिसुखें जे मातले । ते कळिकाळा शूर जाले ॥१॥
हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥
महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥२॥
सहस्रनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥३॥
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥४॥
का म्हणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी ॥५॥
॥३॥
२०९९
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥२॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥३॥
तुका म्हणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥४॥
२१००
कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहुत येणें ॥१॥
नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥
देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥२॥
त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥
तुका म्हणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम ध्यावें ॥४॥