मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संत तुकाराम गाथा|
अभंग संग्रह ९०१ ते १०००

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ९०१ ते १०००

तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य.

Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.


९०१

जीवन हे मुक्त नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥१॥

बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥२॥

तुका म्हणे जेणें आपलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥३॥

९०२

द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥

करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥

तुका म्हणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥

९०३

द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥

निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥

आजिच्या प्रसंगें हा चि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥

प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥३॥

तुका म्हणे घेई राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥४॥

९०४

रडे अळंकार दैन्याचिये कांती । उतमा विपित्तसंग घडे ॥१॥

एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥२॥

तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥

९०५

दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥

कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥

भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥

तुका म्हणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥३॥

९०६

सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥

मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥

अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥२॥

घरास आगि लावुनि जागा । न पळे तो गा वांचे ना ॥३॥

तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥४॥

९०७

ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥

म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥

संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥२॥

तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥३॥

९०८

सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥१॥

संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥

देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥२॥

उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥

तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥२॥

९०९

आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥१॥

भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥

गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥२॥

तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥३॥

तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हे चि धणी ॥४॥

९१०

आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥

आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥

आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥२॥

माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥३॥

तुका म्हणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥४॥

९११

धाई अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥१॥

विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥

वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥२॥

अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥३॥

साधनाची सिद्धि । मोन करा र बुद्धि ॥४॥

तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रम्हवृंदें ॥५॥

९१२

कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥

कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥

भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥

तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥३॥

९१३

संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥

विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥

करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥२॥

काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥३॥

तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तो चि जाणे ॥४॥

९१४

चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥

साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोट्या बाळां धाकुटियां ॥२॥

तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥३॥

९१५

तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलें चि देसी पद दासा ॥१॥

शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥

भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभक्तांची परी नावडेती ॥३॥

न वजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥

तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥५॥

९१६

तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥

वोळगती जया अष्टमासिद्धि । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥

कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥३॥

लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥४॥

तुका म्हणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥

९१७

कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥१॥

शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥

कलियुगीं बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥३॥

मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥

तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥५॥

९१८

काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥

जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥

तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥३॥

तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥

९१९

काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥१॥

सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥

अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥२॥

तुका म्हणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥३॥

९२०

काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥

होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥

नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥

तुका म्हणे माझें । काय होईंल तुम्हां ओझें ॥३॥

९२१

एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥

आम्ही देवा शक्तिहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥

पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥२॥

तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥

९२२

पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥

संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥

ज्येष्ठांचीं कां आम्हां जोडी । परवडी न लभों ॥२॥

तुका म्हणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥३॥

९२३

कैवल्याच्या तुम्हां घरीं । रासी हरी उदंड ॥१॥

मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥

सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥

तुका म्हणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥३॥

९२४

आपलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥

हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥

बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥२॥

तुका म्हणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥३॥

९२५

न मनावी चिंता तुम्हीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥१॥

पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥

बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥२॥

तुका म्हणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥३॥

९२६

यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥१॥

आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥

मंगळ तें तुम्ही जाणां । नारायणा काय तें ॥२॥

तुका म्हणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥३॥

९२७

भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥१॥

चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥

माझ्या खुणा मनापाशीं । तें या रसीं बुडालें ॥२॥

तुका म्हणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥३॥

९२८

पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥१॥

जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥

श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥२॥

महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥३॥

तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥

९२९

हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥

बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥

जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥२॥

तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥

तुका म्हणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥४॥

९३०

आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥१॥

प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥

भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥२॥

आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हां करीं खेळावया ॥३॥

तुका म्हणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥४॥

९३१

जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥

पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥

भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥

तुका म्हणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥

९३२

आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥

जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥

जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥

तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥३॥

९३३

जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥

विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥

वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥

तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥३॥

९३४

एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥१॥

होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥

एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥२॥

आला नांवा रूपा । तुका म्हणे जाला सोपा ॥३॥

९३५

भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥१॥

विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥

अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥२॥

तुका म्हणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥३॥

९३६

पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥

सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥

तुका म्हणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥३॥

९३७

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥

अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥

तो चि शरणागतां हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥

विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि । लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥

विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख । गोडावलें मुख तुका म्हणे ॥४॥

९३८

विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥

लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥

एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥२॥

बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥३॥

९३९

वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥

धन्यधन्य हरिचे दास । तयां सुलभ गर्भवास । ब्रम्हादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥

कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस । वाट कर जोडोनियां ॥२॥

रिद्धिसिद्धि पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्तां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥

असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥

सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका म्हणे दरुषणें ॥५॥

९४०

सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥१॥

पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥

क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥२॥

तुका म्हणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावईल ॥३॥

९४१

फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥१॥

आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥

भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥२॥

तुका म्हणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥३॥

९४२

उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड ॥१॥

बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥

तुका म्हणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येईल कळों ॥३॥

९४३

आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥१॥

होई बा जागा होई वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥

जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥२॥

तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥

९४४

माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥१॥

फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥

नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥२॥

तुका म्हणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥३॥

९४५

चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥१॥

मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥

शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥२॥

भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥३॥

तुका म्हणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होईल त्यांचा ॥४॥

९४६

नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥१॥

कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥

खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥२॥

ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका म्हणे ॥३॥

९४७

वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥

या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥

सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥२॥

तुका म्हणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥३॥

९४८

चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥१॥

अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥

करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥२॥

तुका म्हणे मोह परते चि ना मागें । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥३॥

९४९

निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥१॥

तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥

आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥२॥

तुका म्हणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥३॥

९५०

तुज च पासाव जालोंसों निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥

पाहावा जी ठायीं करूनि विचार । नुन्य कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥

ठेविलिये ठायीं आज्ञेचें पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥२॥

तुका म्हणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥३॥

९५१

प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुम्हीं ॥१॥

म्हणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥

न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥२॥

तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खविळलें ॥३॥

९५२

लटिका ऐसा म्हणतां देव । संदेहसा वाटतसे ॥१॥

ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥

शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥

तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥३॥

९५३

जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥१॥

उदास तूं नारायणा । मी ही म्हणा तुम्ही च ॥ध्रु.॥

ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥२॥

एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥३॥

९५४

बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥१॥

आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥

तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥२॥

तुका म्हणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥३॥

९५५

आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥१॥

मढ्यापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥

न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥२॥

तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥३॥

९५६

मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥१॥

लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥

हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥२॥

तुका म्हणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥३॥

९५७

पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥१॥

घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥

न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥२॥

अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥३॥

९५८

अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥

तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥

पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥२॥

तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥३॥

९५९

संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥

आतां नको मज खोट्यानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥

गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥२॥

तुका म्हणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥३॥

९६०

वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥

आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥

वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥२॥

तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥३॥

९६१

उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साट होती ॥१॥

काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥

नानाछंदें आम्हां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥२॥

तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥३॥

९६२

आम्ही बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥

जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥

तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥२॥

तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥३॥

९६३

तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥१॥

कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥

सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥२॥

तुका म्हणे तुम्ही सभाग्य जी देवा । माझा तुम्हां केवा काय आला ॥३॥

९६४

तुम्हां होईल देवा पडिला विसर । आम्हीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥

पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥

आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥२॥

तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥३॥

९६५

जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥१॥

ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥

गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तईं । अवकळा केलिया ॥२॥

तुका म्हणे ठावे । तुम्ही असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥३॥

९६६

आम्ही शक्तिहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥

माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥

नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥

नाहीं येत बळा । आतां तुम्हासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पायां लागतों ॥३॥

९६७

काय कृपेविण घालावें सांकडें । निश्चिंती निवाडें कोण्या एका ॥१॥

आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥

धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥२॥

तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुरी ॥३॥

९६८

नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥१॥

अशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान निश्चिंतीचें ॥ध्रु.॥

दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥२॥

तुका म्हणे तुम्हां लाज येत नाहीं । आम्हां चिंताडोहीं बुडवितां ॥३॥

९६९

जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥

दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥

क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥२॥

तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥३॥

९७०

म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥

कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥

कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥२॥

तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥३॥

९७१

काय आतां आम्हीं पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त म्हुण ॥१॥

ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥

काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥२॥

तुका म्हणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥३॥

९७२

वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥

बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥

द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥२॥

तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥३॥

९७३

सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥१॥

वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥

आवडीच्या करा ऐसें । अंतर्वासें जाणतसां ॥२॥

तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥३॥

९७४

निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥१॥

बैसलिया भाव पांयीं । बरा तई नाचेन ॥ध्रु.॥

स्वामी कळे सावधान । तरि मन उल्हासे ॥२॥

तुका म्हणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥३॥

९७५

जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥

नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥

पारुशला संवसार । मोडली बैसण्याची थार ॥२॥

आतां म्हणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥३॥

९७६

आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥

तुम्हांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥

सेवेच्या अभिळासें । मन बहु जालें पिसें ॥२॥

अरे भक्तापराधीना । तुका म्हणे नारायणा ॥३॥

९७७

तुमचा तुम्हीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥

कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥

कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥२॥

तुका म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥३॥

९७८

माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥१॥

मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥

आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥२॥

तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥३॥

९७९

आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥१॥

अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥

तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥२॥

तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैची ॥३॥

९८०

काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥

युक्त आहार वेहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥

परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥

देह समर्पिजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥३॥

९८१

मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥

मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥

भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥२॥

मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥

अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥

तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥

९८२

गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥१॥

तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥

उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥२॥

तुका म्हणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥३॥

९८३

विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥

गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुद्धि करुनी ठेवा ॥ध्रु.॥

विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥२॥

तुका म्हणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥३॥

९८४

कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इच्छितिया ॥१॥

उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥

तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥

९८५

जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥

सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥

मैंद मुखींचा कोंवळा । भाव अंतरीं निराळा ॥२॥

जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥३॥

बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥४॥

तुका म्हणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥

९८६

वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥१॥

कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥

सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥२॥

याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥३॥

तुका म्हणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥४॥

९८७

अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥

गिळुनि सांडिलें कळिवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥

सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥२॥

तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ॥३॥

९८८

धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥१॥

जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥

जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥२॥

तुका म्हणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥३॥

९८९

हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥

येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥

सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥

जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥३॥

९९०

फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥

स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ‍ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥

निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥

योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥३॥

तुका म्हणे मना पाहें विचारून । होई रे कठिण वज्राऐसें ॥४॥

९९१

जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडे हे विधि । निषेधीं चि चांगली ॥१॥

तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥

जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोक्ता निराळा । तेणें गोडी निवडिली ॥२॥

हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥३॥

उष्णें छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥४॥

तुका म्हणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥५॥

९९२

मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥१॥

जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥

भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥२॥

तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥३॥

९९३

नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होईल त्या साहे पांडुरंग ॥१॥

पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥

नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥२॥

तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥३॥

९९४

कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥

साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥

न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥२॥

तुका म्हणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभाळिता ॥३॥

९९५

चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता फुंज अंगीं ॥१॥

आतां पुढें वांयां जावें हें तें काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥

गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुद्धि ॥२॥

तुका हमणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥३॥

९९६

धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥

येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥

लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥२॥

मधुरा वाणी ओटीं । तुका म्हणे वाव पोटीं ॥३॥

९९७

कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥

राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥

तरटापुढें बरें नाचे । सुतकाचें मुसळ ॥२॥

तुका म्हणे काठी सार । करी फार शाहाणें ॥३॥

९९८

कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥१॥

जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥

आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥२॥

तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥३॥

९९९

मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥१॥

लIमी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥

नमन नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥२॥

तुका म्हणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥३॥

१०००

शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥

विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥

पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥

तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP