मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संत तुकाराम गाथा|
अभंग संग्रह १२०१ ते १३००

तुकाराम गाथा - अभंग संग्रह १२०१ ते १३००

तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य.

Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life.


१२०१

नामाची आवडी तो चि जाणा देव । न धरीं संदेह कांहीं मनीं ॥१॥

ऐसें मी हें नाहीं बोलत नेणतां । आनुनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥

नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलों नये ॥२॥

तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥३॥

१२०२

सुखें होतो कोठें घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥

काय करूं बहु गुंतलों आतां । नये सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥

होतें गांठी तें सरलें येतां । आणीक माथां रीण जालें ॥२॥

सोंकरिलियाविण गमाविलें पिक । रांडापोरें भिके लावियेलीं ॥३॥

बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरें कांहीं केल्या ॥४॥

तुका म्हणे कांहीं न धरावी आस । जावें हें सर्वस्व टाकोनियां ॥५॥

१२०३

न मनावें तैसें गुरूचें वचन । जेणें नारायण अंतरे तें ।

आड आला म्हुन फोडियेला डोळा । बिळनें आंधळा शुक्र केला ॥१॥

करी देव तरी काय नव्हे एक । कां तुम्ही पृथक सिणा वांयां ॥ध्रु.॥

उलंघुनि भ्रताराची आज्ञा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या ।

अवघे चि त्यांचें देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥२॥

पितियासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला ।

बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं कैवाड सांडियेला ॥३॥

गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती ।

तयां दिलें ते कोणासी नाहीं । अवघा अंतर्बाहीं तो चि जाला ॥४॥

देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें ।

तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिलें ॥५॥

१२०४

अरे गिळिले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें ।

दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥१॥

येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवा ॥ध्रु.॥

केलें ते क्रियमाण । जालें तें संचित म्हण । प्रारब्ध जाण । उरवरित उरले तें ॥२॥

चित्त खोटें चालीवरि । रोग भोगाचे अंतरीं । रसने अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥३॥

१२०५

अग्न तापलिया काया चि होमे । तापत्रयें संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें ।

न चुके संसारिस्थति । राहाटघटिका जैसी फिरतां चि राहिली । भरली जाती एके रितीं ।

साधीं हा प्रपंच पंचाय अग्न । तेणें पावसील निजशांती रे ॥१॥

नारायणनाम नारायणनाम । नित्य करीं काम जिव्हामुखें ।

जन्मजराव्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुःखें ॥ध्रु.॥

शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं । तप तीर्थ दान व्रत आचरण ।

यज्ञ नाना मन बुद्धी । भोगाभोग तेथें न चुकती प्रकार जन्मजरादुःखव्याधि ।

साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं ॥२॥

घोकितां अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष होय वज्रलेपो भविष्यति ।

दूषणाचें मूळ भूषण तुका म्हणे । सांडीं मिथ्या खंती । रिघोनि संतां शरण सर्वभावें । राहें भलतिया स्थिती ॥३॥

१२०६

नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥

म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थचाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥

कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥२॥

न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामें आटलें ॥३॥

१२०७

नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥१॥

देहाचा निग्रही त्याचें तो सांभाळी । मग नये किळ अंगावरी ॥ध्रु.॥

आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥२॥

तुका म्हणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडी ॥३॥

१२०८

सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागत चि बळ ॥१॥

ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥

करावी च चिंता । नाहीं लागती तत्वता ॥२॥

तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥

१२०९

साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥

पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ध्रु.॥

अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥२॥

चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भंगपाळ ॥३॥

सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥४॥

सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥५॥

१२१०

मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥

कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥

काढा काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावूं बळें वेड आम्हां ॥२॥

जीव शिव कां ठेवियेलीं नांवें । सत्य तुम्हां ठावें असोनियां ॥३॥

सेवेच्या अभिळासें न धरा चि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥४॥

आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥५॥

तुका म्हणे काय छायेचा अभिलाष । हंस पावे नाश तारागणीं ॥६॥

१२११

पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥

तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥

जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभा ॥२॥

इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥३॥

१२१२

पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥

देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥

अवघियांचा विसर जाला । हा राहिला उदेग ॥२॥

तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें ॥३॥

१२१३

जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥१॥

खादलें पचे तरि च तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥

तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें जीवनासी ॥२॥

तुका म्हणे मज तारीं गा विठ्ठला । नेणतां चि भला दास तुझा ॥३॥

१२१४

याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥

केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥

जें कांहीं करितों तें माझे स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥२॥

जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥३॥

तुका म्हणे यासी नांवाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी बळें ॥४॥

१२१५

बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥

तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥

ॠषि मुनि सद्धि साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥

नाहीं नास तें सुख दिलें तयांस । जाले जे उदास सर्वभावें ॥३॥

तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥४॥

१२१६

माया मोहोजाळीं होतों सांपडलों । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥

काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु.॥

नाचे उडे माया करी कवतुक । नासिवंत सुखें साच केलीं ॥२॥

रडे फुंदे दुःखें कुटितील माथा । एकासी रडतां तें ही मरे ॥३॥

तुका म्हणे मज वाटतें नवल । मी माझे बोल ऐकोनियां ॥४॥

१२१७

देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥

आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥

म्हणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥२॥

जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥३॥

तुका म्हणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥४॥

१२१८

आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥

नामें चि सिद्धी नामें चि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवतां ॥ध्रु.॥

चालिला पंथ तो पावईल ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥२॥

तुका म्हणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥३॥

१२१९

निरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥

म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥

देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥

तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥३॥

१२२०

तुजशीं संबंध चि खोटा । परता परता रे थोंटा ॥१॥

देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥

जेथें मुदल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥२॥

तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥३॥

१२२१

या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों रिणकरी ॥१॥

सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥

सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥२॥

एकें एक बुझाविसी । तुका म्हणे ठक होसी ॥३॥

१२२२

आम्ही जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥१॥

फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥

बहुता दिसाचें लिगाड । आलें होत होत जड ॥२॥

तुका म्हणे आतां । नेघें सर्वस्व ही देतां ॥३॥

१२२३

रिण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥१॥

हें कां नेणां पांडुरंगा । तुम्ही सांगतसां जगा ॥ध्रु.॥

माझा संबंध तो किती । चुकवा लोकाची फजिती ॥२॥

तुका म्हणे या चि साठीं । मज न घेतां नये तुटी ॥३॥

१२२४

नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥१॥

जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥

नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥२॥

तुका म्हणे धरूनि हात । नाहीं नेले दिवानांत ॥३॥

१२२५

तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥१॥

म्हणोनि तुझ्या दारा । न येत ठकती दातारा ॥ध्रु.॥

तुझी ठावी नांदनूक । अवघा बुडविला लोक ॥२॥

तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हें चि दाखविसी ॥३॥

१२२६

बोलतों निकुरें । नव्हेत सलगीचीं उत्तरें ॥१॥

माझे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥

अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥२॥

तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥३॥

१२२७

बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥

आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥

गीत गावों नाचों छंदें वावों टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥२॥

अनंत ब्रम्हांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावें उभा ॥३॥

लडिका हा केला संवसारसिंधु । मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥४॥

तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निश्चिंत त्याच्या बळें ॥५॥

१२२८

न लगे मायेसी बाळें निरवावें । आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ॥१॥

मज कां लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे मायां ॥ध्रु.॥

गोड धड त्यासी ठेवी न मगतां । समाधान खातां नेदी मना ॥२॥

खेळतां गुंतलें उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळें ॥३॥

त्याच्या दुःखेंपणें आपण खापरीं । लाही तळीं वरी होय जैसी ॥४॥

तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥५॥

१२२९

ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धी । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥

जयासी नावडे हरिनामकीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचें ॥ध्रु.॥

सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥२॥

तुका म्हणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ट होय ॥३॥

१२३०

ब्राम्हण तो याती अंतेज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥

रामकृष्णें नाम उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥

शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥२॥

तुका म्हणे गेल्या शडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्रम्हं चि तो ॥३॥

एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥१॥

पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ध्रु.॥

परस्त्री मद्यपान । पेंडखान माजविलें ॥२॥

तुका म्हणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥३॥

१२३२

एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥१॥

पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ध्रु.॥

कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥२॥

असत्य जे वाणी । तेथें पापाची च खाणी ॥३॥

सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥४॥

तुका म्हणे दोन्ही । जवळी च लाभहानी ॥५॥

१२३३

जळातें संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥१॥

माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु.॥

नेदी कर्म घडों । कोठें आडराणें पडों ॥२॥

तुका म्हणे मळ । राहों नेदी ताप जाळ ॥३॥

१२३४

संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥

वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरि दंड तेणें ॥ध्रु.॥

समय नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥

तुका म्हणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥३॥

१२३५

घेसी तरी घेई संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥

सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥

करिसील तो करीं संतांचा सांगत । आणीक ते मात नको मना ॥२॥

बैससी तरी बैस संतां च मधीं । आणीक ते बुद्धी नको मना ॥३॥

जासी तरि जाई संतांचिया गांवां । होईंल विसावा तेथें मना ॥४॥

तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेइ ॥५॥

१२३६

संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥

तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥

संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥

संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥

संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटीं घेती देती ॥४॥

तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥५॥

१२३७

संतांचें सुख जालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥

तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥

निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥

तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥

अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥

तुका म्हणे ते बिळया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥५॥

१२३८

जो मानी तो देईल काई । न मनी तो नेईल काई ॥१॥

आम्हां विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ध्रु.॥

आध्येन तें जना काई । जल्पें वांयांविण ठायीं ॥२॥

वंदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥

१२३९

भावबळें कैसा जालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥

तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥

पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आळंगुनि मिठी देइन पांयीं ॥२॥

चरणीं दृष्टी उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढें दोन्ही ॥३॥

तुका म्हणे उत्कंठित वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥४॥

१२४०

कृपाळु म्हणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥१॥

आणीक उपाय नेणें मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥

नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥२॥

कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥३॥

तुका म्हणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल या भूक डोळियांची ॥४॥

१२४१

सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनेंसहित देवा ॥१॥

आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥

माझिये वारचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण एक ॥३॥

तुझे आम्ही दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥३॥

तुका म्हणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देई ॥४॥

१२४२.

कईं मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥

केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होइल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥

म्हणऊनि मुख अवलोकितों पाय । हे चि मज आहे थोरी आशा ॥२॥

माझिया मनाचा हा चि विश्वास । न करीं सायास साधनांचे ॥३॥

तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलों मी ऐसा साच भाव ॥४॥

१२४३

दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साटीं । विठ्ठला ॥१॥

भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आम्हालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥

होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियांचे अवतार ॥२॥

केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥३॥

१२४४

गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥

सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाटीं आपुलिया ॥ध्रु.॥

चित्त पावलें आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥२॥

हें जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तें चि अरूपा ॥३॥

१२४५

आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥१॥

हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥

हरिने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥२॥

तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोंवताला ॥३॥

१२४६

हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥

आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥

पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥

तुका म्हणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं धणीवरि ॥३॥

॥ भुपाळ्या ॥ अभंग ॥ ८ ॥

१२४७

बोलोनि दाऊं कां तुम्ही नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥

पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥

त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥२॥

तुका म्हणे माते बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥

१२४८

ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कां हे कळवळ तुज उमटे चि ना ॥१॥

आवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आस चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥

काय जन्मा येवूनियां केली म्यां जोडी । ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥२॥

तुका म्हणे खरा न पवे चि विभाग । धिकारितें जग हें चि लाहों हिशोबें ॥३॥

१२४९

कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शक्ति जालीसी दिसे ॥१॥

लाज येते मना तुझा म्हणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥ध्रु.॥

लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें । कळों येतें खरें दुजें एकावरूनि ॥२॥

तुका म्हणे माझी कोणें वदविली वाणी । प्रसादावांचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥

१२५०

जळो माझें कर्म वायां केली कटकट । जालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥

आता पुढें धीर काय देऊं या मना । ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥

गुणवंत केलों दोष जाणायासाठीं । माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥२॥

तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥३॥

१२५१

कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥

कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु.॥

प्रभातेसि वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥

येथें अवघे वांयां गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे जाल्या वेचाचा ॥३॥

१२५२

जळोत तीं येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥

आतां मज साहे येथें करावें देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥

भोगें रोगा जोडोनियां दिलें आणीकां । अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनि ॥२॥

तुका म्हणे असो तुझें तुझे मस्तकीं । नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तनें ॥३॥

१२५३

न संगतां तुम्हां कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहार चि न लगे ॥१॥

परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों देत नाहीं ॥ध्रु.॥

काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तईपासूनिया समर्थ ॥२॥

तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ॥३॥

१२५४

तुजसवें आम्हीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥

सासुरवासा भीतों जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहीविशीं लज्जा राखें आमुची ॥ध्रु.॥

न कळतां संग जाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरि ॥२॥

तुका म्हणे असतां जैसें तैसें बरवें । वचन या भावें वेचुनियां विनटलों ॥३॥

॥८॥

१२५५

रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचे नी ॥१॥

त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर । न कळे तो साचार ब्रम्हादिकां ॥ध्रु.॥

तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥२॥

मायबापें पिंड पाळीला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥३॥

संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥४॥

तुका म्हणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥५॥

१२५६

हरि हरि तुम्हीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥

आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥

भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावा पतित वेळोवेळां ॥२॥

तुका म्हणे ही तंव कृपेचा सागर । नामासाटीं पार पाववील ॥३॥

१२५७

ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥

चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु.॥

त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥२॥

तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु अयुषा ॥३॥

१२५८

गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥१॥

नाठेळाची भक्ति कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ध्रु.॥

सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥२॥

तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धंदधंद सिंदळीचे ॥३॥

१२५९

कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥१॥

आतां जागें रे भाईं जागें रे । चोर निजल्या नाडूनि भागे रे ॥ध्रु.॥

आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोकां रे ॥२॥

तुका म्हणे एकांच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥३॥

१२६०

मुदल जतन जालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥

घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥

घाला पडे थोडें च वाटे । काम मैंदाचें च पेटे ॥२॥

तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥३॥

१२६१

मज अंगाच्या अनुभवें । काईं वाईंट बरें ठावें ॥१॥

जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥

वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥

तुका म्हणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥३॥

१२६२

पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥१॥

भावा ऐसी क्रिया राखे । खोट्या खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥

न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥२॥

तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥३॥

१२६३

मोल देऊनियां सांटवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥

हरिदासां मुखें हरिकथाकीर्तन । तेथें पुण्यें पुण्य विशेषता ॥ध्रु.॥

हरितील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥२॥

तुका म्हणे पाहा ऐसें जालें जन । सेवाक्तिहीन रसीं गोडी ॥३॥

१२६४

बहुक्षीदक्षीण । आलों सोसुनियां वन ॥१॥

विठोबा विसांवया विसांवया । पडों देई पायां ॥ध्रु.॥

बहुतां काकुलती । आलों सोसिली फजिती ॥२॥

केली तुजसाटीं । तुका म्हणे येवढी आटी ॥३॥

१२६५

कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥१॥

उभाउभीं पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु.॥

नको सोडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥२॥

तुका म्हणे इच्छा । तैसा करीन सरिसा ॥३॥

१२६६

तुमची तों भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान ॥१॥

आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥

तुम्हां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥२॥

तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाची च होती ॥३॥

१२६७

आहे तें चि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें ॥१॥

न बोलावीं तों च वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥

एका ऐसें एका द्यावयाचा मोळा । कां तुम्हां गोपाळा नाहीं ऐसा ॥२॥

तुका म्हणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तों ॥३॥

१२६८

आम्हीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥१॥

आहे तैसा असो आतां । चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥

बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥२॥

तुका म्हणे आम्हांपाशीं । धीराऐसी जतन ॥३॥

१२६९

आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥१॥

करूनि ठेलों जीवेंसाटीं । होय भेटी तोंवरि ॥ध्रु.॥

लागलों तों न फिरें पाठी । पडिल्या गांठी वांचूनि ॥२॥

तुका म्हणे अवकाशें । तुमच्या ऐसें होवया ॥३॥

१२७०

बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥

बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥

बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥२॥

तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां॥३॥

॥१२॥

१२७१

कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥१॥

आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ध्रु.॥

उद्वेग ते वांयांविण । कैंचा सीण चिंतनें ॥२॥

तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्में पायांच्या ॥३॥

१२७२

संसार तो कोण देखे । आम्हां सखे हरिजन ॥१॥

काळ ब्रम्हानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥

स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥२॥

तुका म्हणे ब्रम्हरसें । होय सरिसें भोजन ॥३॥

१२७३

पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उसीर कां आझूनि लावियेला ॥१॥

येई गा विठ्ठला येईगा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥ध्रु.॥

काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥२॥

तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥३॥

१२७४

आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥१॥

म्हणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु.॥

पाहातां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढें ॥२॥

तुका म्हणे कोणी न संगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥

१२७५

जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥१॥

म्हणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥

इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोईं अहंकार ॥२॥

तुका म्हणे देवा वासनेच्या आटें । केलीं तळपटें बहुतांचीं ॥३॥

१२७६

धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥

घ्यावें भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ध्रु.॥

धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥२॥

तुका म्हणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥३॥

१२७७

लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥

ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥

ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥

तुका म्हणे जाण । व्हावें लाहनाहुनि लाहन ॥३॥

१२७८

निंचपण बरवें देवा । न चले कोणाचा ही दावा ॥१॥

महा पुरें झाडें जाती । तेथें लव्हाळे राहाती ॥ध्रु.॥

येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरि ॥२॥

तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥३॥

१२७९

उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥

ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥

तुका म्हणे एक नारायण घ्याईं । वरकडा वाहीं शोक असे ॥३॥

१२८०

आवडीच्या मतें करिती भजन । भोग नारायणें म्हणती केला ॥१॥

अवघा देव म्हणे वेगळें तें काय । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥

लाजे कमंडल धरितां भोपळा । आणीक थीगळा प्रावरणा ॥२॥

शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥३॥

तुका म्हणें यांस देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥४॥

१२८१

म्हणतां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनास महाराज म्हणसी हीना ॥१॥

काय ऐसें पोट न भरे तें गेलें । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥

तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥३॥

१२८२

रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥

लोडें वालिस्तें पलंग सुपति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥

पुसाल तरि आम्हां वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥२॥

तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥३॥

१२८३

घरोघरीं अवघें जालें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥

निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥

आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥

काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥३॥

तुका म्हणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥४॥

१२८४

अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि ॥१॥

अवघा चि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥

अवघीं च तीथॉ व्रतें केले याग । अवघें चि सांग जालें कर्म ॥२॥

अवघें चि फळ आलें आम्हां हातां । अवघें चि अनंता समर्पिलें ॥३॥

तुका म्हणे आतां बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥४॥

१२८५

महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥

पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥

विरुळा पावे विरुळा पावे । अवघड गोवे सेवटाचे ॥२॥

उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥

झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥

पावेल तो पैल थडी । म्हणों गडी आपुला ॥५॥

तुका म्हणे उभार्‍यानें । कोण खरें मानितसे ॥६॥

१२८६

अवघ्या उपचारा । एक मनें चि दातारा ॥१॥

घ्यावी घ्यावी हे चि सेवा । माझी दुर्बळाची देवा ॥ध्रु.॥

अवघियाचा ठाव । पायांवरि जीवभाव ॥२॥

चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥३॥

१२८७

आली सलगी पायांपाशीं । होइल तैसी करीन ॥१॥

आणीक आम्हीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥

अवघ्या निरोपणा भाव । हा चि ठाव उरलासे ॥२॥

तुका म्हणे पाळीं लळे। कृपाळुवे विठ्ठले ॥३॥

१२८८

देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥

येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोहा नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥

गृह आणि वित्त स्वदेशा विटावें । इतरा भेटावें श्वापदझाडां ॥२॥

तुका म्हणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥३॥

१२८९

देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं किळवर ओंवाळूनि ॥१ ॥

नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥

करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥

तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥

१२९०

देह नव्हे मी हें सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥

म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥

पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥

तुका म्हणे जीवासाटीं । देव पोटीं पडेल ॥३॥

१२९१

पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥

अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥

क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥

तुका म्हणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥३॥

१२९२

पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥

आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥

नागवला अल्प लोभाचिये साटीं । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥

तुका म्हणे हात झाडिले परत्रीं । श्रम तो चि श्रोत्रीं वेठी केली ॥३॥

१२९३

अंतरींचें ध्यान । मुख्य या नांवें पूजन ॥१॥

उपाधि तें अवघें पाप । गोड निरसतां संकल्प ॥ध्रु.॥

आज्ञा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥२॥

तुका म्हणे वृत्ति । अविट हे सहज स्थिति ॥३॥

१२९४

मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥

घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥

सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥२॥

तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥

१२९५

बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥१॥

जालें आम्हांसी जीवन । धणीवरि हें सेवन ॥ध्रु.॥

सोपें आणि गोड । किती अमृता ही वाड ॥२॥

तुका म्हणे अच्युता । आमचा कल्पतरु दाता ॥३॥

१२९६

त्रुशाकाळें उदकें भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥

ऐसियाचा हो कां संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥

मिष्टान्नाचा योग भुके । म्हणतां चुके पुरेसें ॥२॥

तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥

१२९७

कुचराचे श्रवण । गुणदोषांवरि मन ॥१॥

असोनियां नसे कथे । मूर्ख अभाग्य तें तेथें ॥ध्रु.॥

निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥२॥

पापाचे सांगाती । तोंडीं ओढाळांचे माती ॥३॥

हिताचिया नांवें । वोस पडिले देहभावें ॥४॥

फजीत करूनि सांडीं । तुका करी बोडाबोडी ॥५॥

१२९८

जग तरि आम्हां देव । परि हे निंदितों स्वभाव ॥१॥

येतो हिताचा कळवळा । पडती हातीं म्हुन काळा ॥ध्रु.॥

नाहीं कोणी सखा । आम्हां निपराध पारिखा ॥२॥

उपक्रमें वदे । तुका वर्मासी तें भेदे ॥३॥

१२९९

सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥

समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रम्हरस ॥ध्रु.॥

पुढती घडे चढतें सेवन आगळें । भक्तिभाग्यबळें निर्भरता ॥२॥

उपजों चि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरिदासांच्या ॥३॥

तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥

१३००

गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥१॥

अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥

काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥२॥

तुका म्हणे अगीविण । बीजें वेगळीं तों भिन्न ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP