मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
वाल्मीकि चरित

सप्ताह अनुष्ठान - वाल्मीकि चरित

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


दृष्टांतासी घ्यावे वाल्मीकि चरित । दिसेल उद्धृ त नामयश ॥१॥
पहिला वाटमार्‍या जाळपोळ करी । जीवाते संहारी द्रव्यासाठी ॥२॥
द्रव्य हा ईश्वर द्रव्य हाच मोक्ष । हाच श्रुति पक्ष मानी वाल्या ॥३॥
कांहीही करोनी धन मेळवावे । कांही न पहावे तारतम्य ॥४॥
पापपुण्य क्षिती मुळी न बाळगावी । धने सांठवावी प्रयत्नाने ॥५॥
हाच रोग त्यासी जडला दुर्धर । नयन विकार थोर झाला ॥६॥
देह मन बुद्धि रोगत्रस्त झाली । अंतरी जडली थोर व्याधि ॥७॥
ऐसा नासला तो रोगाने पामर । पाप अनिवार करीतसे ॥८॥
किती जीव हिंसा तयास घडली । मिती नाही भली म्हणताती ॥९॥
ऐसा रोग रुप होवो निवर्तत । अपथ्य सेवीत धन लोभ ॥१०॥
धनाचीच तृष्णा धनाचीच क्षुधा । त्यासी होत बाधा धनाचीच ॥११॥
कांही केल्या तृप्ती पावेना अंतर । करिन संहार अधिकचि ॥१२॥
विनायक म्हणे रोगरुप झाला । परि न कळे त्याला भ्रांति पडे ॥१३॥
==
वाल्मीकिचरित

तयालागी वैद्य भेटला अतुल । परम दयाळ कारुणिक ॥१॥
नारद महर्षि तयामागे जाती । सांपडती हातीं वालियाच्या ॥२॥
मारायासी जातां नारद बोलती । कां तूं आम्हांप्रति मारितोसी ॥३॥
येरु म्हणे धन हेच माझे काज । म्हणोनि महाराज मारितो मी ॥४॥
आजवरी केल्या अनंत मी हिंसा । परि धन पिपासा गेली नाही ॥५॥
नारद म्हणती कोणासाठी धन । सांग सांठवून ठेवितोसी ॥६॥
येरु म्हणे भार्यापुत्रांसाठी धन । करणे संपादन माझा धर्म ॥७॥
नारद विचारिती पाप जे घडले । तुजलागी भले या दुमार्गे ॥८॥
त्याचा वांटेकरी आहे काय कोणी । शोधोनी हे जाणी सूज्ञ नरा ॥९॥
येरु म्हणे सर्व भार्यापुत्रांसाठी । खटपट मोठी माझी सदा ॥१०॥
वाटेकरी तेव्हां होतील सर्वही । धनभोग पाही घडे त्यांसी ॥११॥
नारद म्हणती चुकसी वालियारे । शोध तूं करीरे विचक्षणा ॥१२॥
जेव्हा त्या कळले पापालागी धनी । नाहीतची कोणी उमगला ॥१३॥
सकळी सांगितले ज्याचा तोच धनी । कर्तव्य पोषणी आमुच्या तूझे ॥१४॥
नाममंत्रकानी नारद मुखांतुनी । राहिला शिरोनी संभाषणी ॥१५॥
तेणे दृष्टी त्याची क्षणे निवळली । भ्रांति सर्व गेली हरोनियां ॥१६॥
मग नारदासी शरण जाहला । म्हणे उपायाला करा कांही ॥१७॥
विनायक म्हणे पावतां सद्बोधा । त्याची रोगबाधा हरुं लागे ॥१८॥
==
वाल्मीकिचरित
मग नारदांनी मंत्र पढविला । त्याचीया जिव्हेला उमटेना ॥१॥
रोगाचे लक्षण परम जहर । इंद्रिया विकार थोर असे ॥२॥
जिव्हेलागी नाममंत्र तो येईना । बहु दु:ख मना त्याच्या झाले ॥३॥
उलटी अक्षरे ऋषि पढविती । त्यासि बैसवीती जपालागी ॥४॥
परतोनी मी जो येईन तोवरी । बैस तूं निर्धारी मंत्रजपी ॥५॥
विनायक म्हणे स्वभाव पालटला । वाल्या स्थिर झाला मंत्रबळे ॥६॥
==
वाल्मिकिचरित

जपत राहिला देहा विसरला । न क्षुधा तृषेला गणी कांही ॥१॥
मन बुद्धि सर्व एकचि बनली । तदाकार झाली वृत्ति त्याची ॥२॥
वारुळ वाढले तयाचे शरीरी । नाही भानावरी वाल्मीकी तो ॥३॥
भूमिमय झाला जैसा की स्थावर । मंत्राचा प्रकार ऐसा असे ॥४॥
गेला रोग भोग शोधन जहाले । दिव्यत्व पावले तयालागी ॥५॥
तंव तेथे आले महर्षि नारद । पाहूनी वरद झाले त्यासी ॥६॥
तेव्हां पासोनियां वाल्याकोळियाचा । सिद्ध पुरुषसाचा झाला जाणा ॥७॥
वाल्मीकि महर्षि पदाते पावला । धन्य तो जाहला तिही लोकी ॥८॥
तेणे रामायण जैसे रचीयेले । रामे तैसे केले आचरण ॥९॥
विनायक म्हणे उत्कर्ष नामाचा । ऐसा आहे साचा बोध घ्यावा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP