सप्ताह अनुष्ठान - प्रभुवात्सल्यवर्णन व क्षमायाचना
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
परि तूं दयेचा पुतळा गमसी । निष्ठूर न बनसी कांही केल्या ॥१॥
कृतघ्न जरी आम्ही, मनी न आणिसी । सर्वाते करिसी कृपा आम्हां ॥२॥
आमुचा कळवळा तुजला स्नेहाळा । उपमा प्रेमळा तुज नाही ॥३॥
पाठीमागे उभा राहोनी सदया । करीतोसी छाया कृपेची तूं ॥४॥
अद्भुत हे आहे तुझे कृत्य देवा । दृष्टांत माधवा अन्य नाही ॥५॥
तुझे तुला ऐसेच गमत । दत्त भगवंत कृपावंत ॥६॥
तुझ्याठायी सर्व केले समरस । देवा मी भक्तिस धरोनियां ॥७॥
माझे हे ह्र्दय तुज मिळविले । संपन्न बनले तुझ्याठायी ॥८॥
क्षमा करी आतां मज क्षमावंता । चुकलो मी ताता बहुत की ॥९॥
नको आणूं मनी माझे अपराध । शमवाया क्रोध दयावंता ॥१०॥
प्रसन्न होवोनी कृपेने तूं पाहे । पाठीमागे राहे माझ्या ऊभा ॥११॥
जन्मोजन्मीची हे मैत्री देवा असे । कधी न तुटतसे तुझ्या कृपे ॥१२॥
विनायक म्हणे मज सुखमय । माझा गुरुराय करीतसे ॥१३॥
==
धांवा
बुधवार ता. १५-१०-१९३०
तुझिया पदांचा केला मी आश्रय । जाणोनि उपाय एवढाच ॥१॥
फ़ुकट गेले माझे अन्यत्रीचे श्रम । नाही माझा काम सिद्ध झाला ॥२॥
एकचि साधन दिसत चक्षुंपुढे । पायी नत गाढें होणे तुझ्या ॥३॥
विनायक म्हणे येवढीच सोय । दत्ता तुझे पाय सेवितसे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2020
TOP