मालिका १ प्रतिपदा
श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.
॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
अभंग-१
श्रीज्ञानदेव वाक्य -----
रुप पाहतां लोचनिं ॥ सुख झालें हो साजनी ॥१॥
तोहा विठठल बरवा । तोहा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणून विठठल आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगरु ॥ बाप रखुमा देवीवरु ॥४॥ ॥धृ०॥
म्हणे तुम्ही निष्पाप निर्मळ ॥ तुमचे निदर्शने तत्काळ । नासति सकळ कलिमळ । ऐसे निज निर्मळ तुह्मी संत ॥२४०॥
ज्यासी भगवद्भक्तीची अति गोडी । त्यावरी भगवंताची आवडी ॥ त्यांसी भेटी होय रोकडी । जय पुण्याच्या कोडी तृष्टती ॥२३०॥
अभंग-२
राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपटो ॥१॥
कोंडकोंडूनि धरीन जीवें । देहभावे पूजीन ॥२॥
होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरी ॥३॥
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडू द्या ॥४॥
अभंग -३
आवडे हें रुप गोजिते सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥१॥
आतां दृष्टीपुढे ऐसाचि तूं राहे । जो मी तुज पाहे पांडुरंगा ॥२॥
लाचावले मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले ॥३॥
तुका ह्मणे आह्मी मागावी लाडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥४॥
अभंग -४
श्री एकनाथ महाराज वाक्य-----
नरदेहीचा हाचि मुख्यार्थ । संत संग करी परमार्थ ॥१॥
आणिक नाही पहा साधन । मुखीं हरि हरि स्मरण ॥२॥
सोडी द्रव्यदाराआशा । संतसंग पाववी दशा ॥३॥
जरी पोखलें शरीर । तरी तें केव्हांही जाणार ॥४॥
जनार्दनाचा एका ह्मणें । संता पायी ठावं देणें ॥५॥
मार्गी अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञान प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥५६॥
हां गा ऐसे जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे । तिही कवणेपरी जाणिजे मार्गातें या ॥५७॥
अभंग -५
श्री एकनाथ महाराज वाक्य-----
संत दयाळ दयाळ । अंतरी होताती प्रेमळ ॥१॥
शरण आलियासी पाठी । पाहतांती कृपा दृष्टी ॥२॥
देऊनिया रसायण्दा तारिताती भवार्णव जाणा ॥३॥
संतासी शरण जावें । एका जनार्दनी त्यासी गावें ॥४॥ ॥धृ०॥
संत बैसवूनि परवडी, कीर्तन सांडिती निर्वाडी, हर्षे नाचती बाबडी, धरिति बागडी विनासें ॥७१॥ ए०भा०अ० २
अभंग -६
देवाचे ते आप्त जाणावें तें संत । त्यांचे चरणी रत व्हावें सदा ॥१॥
श्रीहरिची भेटी सहजची होय । श्रम लया जाय क्षणमात्रें ॥२॥
पापाचे पर्वत भस्म नामाग्नींत । अभक्ता न कळे हित नाम न घेती ॥३॥
एका जनार्दनी संताचिया कृपें । नाम होय सोपें कृपें त्यांच्या ॥४॥ ॥धृ०॥
निमेषार्थ होतां सत्संग । तेणें संगे होय भवभंग । या लागीं सत्संगाचें भाग्य । साधक सभाग्यें जाणती ॥२५०॥ ए०भा०अ० २
अभंग -७
श्री एकनाथ महाराज वाक्य-----
तापलिया तापत्रयें संतां शरण जावें । जीवें भावें धरावें चरण त्यांचे ॥१॥
करुनि विनवणी वंदूं पायवणीं । घालू लोटांगण मस्तक हें ॥२॥
उपासनामार्ग सांगती तें खूण । देती मंत्र निर्वाण विठठल हरि ॥३॥
एका जनार्दनी संतांसी शरण । रात्र आणि दिन जिंतूं त्यांसी ॥४॥ ॥धृ०॥
ते व्याधीचिया उफाडा । तरि देता सत्कथेचा काढा । श्रवण मुखीच्या भावार्थ दाढा । पाडी फुडा दातखीळीम ॥१५॥
देतां तुळसी मकरंदू नसू । वरता जावो नेदी श्वासू । मस्तक झाडी मनीं वासूं । रोगें बहुवसू व्यापीला ॥१६॥
ऐसा रोग देखोनी गाढा । वैद्य आचार्य धडफूडा । कृपा पाहे जया कडा । तो रोकडा वाचवी ॥१७॥
नीघडा वैद्य तो सुबुध्दी । जीव गेलीया मरोनेदी । जीवें विण वांचवी त्रिशुध्दी । अगाधा सिध्दी तयाची ॥१८॥
जे तपोतेजानिया राशी । की एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थासी । तीर्थरुप ॥६२॥ ज्ञा०अ० ४ था
अभंग -८
श्री एकनाथ महाराज वाक्य-----
देह हा जाणार काळाच्या शेवट । याची धरुनी मिठी गोडी काय ॥१॥
जाणार जाणार जाणार हें विश्व । वाउगाचि सोस करसी काय ॥२॥
प्रपंच कबाड एरंडाचे परी । रसस्वाद तरी कांही नाहीं ॥३॥
नाशिवंतासाठी रडतोसी वाया । जनार्दनी शरण रिघे तूं पाया ॥४॥
एका जनार्दनी भेटी होतां संताची । मग जन्ममरणाची चिंता नाही ॥५८॥ ॥धृ०॥
संत संगती वेगळे जाण । तात्काळ पावावया माझे स्थान । आणिक नाहीगा साधन । सत्य जाण उध्दवा ॥४५॥ ए०भा०अ० १२
अभंग -९
श्री एकनाथ महाराज वाक्य-----
हरि प्राप्तीसी उपाय । धरावे संताचे पाय ॥१॥
तेणे साधती साधनें । तुटती भवाची बंधने ॥२॥
संताविण प्राप्ति नाही । ऐसी वेद देती ग्वाही ॥३॥
एका जनार्दनी संत । पूर्ण करिती मनोरथ ॥४॥
संत्सगेवीण जें साधन, तोचि साधना दृढ बंधनम सत्संगेविण त्याग जाण ते संपूर्ण पाखंड ॥३१॥ ए०भा०अ०२६
अभंग-१०
श्री नामदेव महाराज वाक्य-----
येता जातां थोर कष्टलों गर्भवासी । पडिलोगा उपवासी प्रेमाविण ॥१॥
बहुतांचा सेवकु झालों काकूळती न पावें विश्रांति कधी काळीं ॥२॥
ऐसें माझें मन शिणले नाना परी । घालीन आभारी संताचिया ॥३॥
वियोगे संताच्या व्याकुळ चिंतातुर । हिंडे दारोदार दीन रुपे ॥४॥
परि कोणी संताच्या न घालिती चरणी । तळमळी अनुदिनी श्रांत सदां ॥५॥
माझे माझे ह्मणवूनि जया घाली मिठी । दिसे तेचि दिठी नाहीं होय ॥६॥
तया शोकानळी संतप्त अंदोळ । गेले तें न मिळे कदां काळीं ॥७॥
न देखत ठायीय देखावया धांव । भ्रांतिभुले भावें नानामार्गी ॥८॥
तुझा स्वरुपा नंदु नाहीं ओळखिला । जाहली विठठला हानि थोर ॥९॥
लोहाचा कवळू लागल्या परिसातें । पढिये सर्वात होय जेंवि ॥१०॥
नामा म्हणे तैसी भेटी संतचरणी करुनि त्रिभुवनी होईन सरता ॥११॥ ॥धृ०॥
निष्कामता निज दृष्टी । अनंत पुष्पें कोट्यानुकोटी । रोकडी लाभे पाठी पाठी । तै होये भेटी हरि प्रियाची ॥२३३॥
व्याघ्रसिंहाचें दुध जोडे । चंद्रामृतही हाता चढे । परी हरिप्रियाची भेटी नातुडे । हे दुर्लभ भाग्ये गाढे मनुष्ये देहो ॥२३४॥
व्याघ्रसिंहा दुवासाठी । अती सबळता जोडे पुष्टी । परी जन्म मरणांची तुटी । दुधासाठी कदा नोहे ॥२३५॥
ह्मणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी । मुख्ये चंद्रची क्षयरोगी त्याचे अमृत निरोगी करी केंवी ॥२३६॥
व्याघ्रसिंह दुग्धशक्ती । प्राणी जै आजरामर होती । तै तेणे दुग्ध ज्यांची उत्पत्ती । ते का पहा मरती व्याघ्रसिंह ॥२३७॥
जै हरी भक्ताची भेटी घडे । तै न बाधी संसार सांकडे । जन्ममरण समूळ उडे । त्यांची भेटी आतुडे अती भाग्यें ॥२३८॥ ए०भा०अ०२
अभंग-११
श्री नामदेव महाराज वाक्य-----
संत चरण रज सेवितां सहज । वासनेचे बीज जळुनी जाय ॥१॥
मग रामनामीं उपजे आवडी । सूख घडोघडी वाढूं लागे ॥धृ॥
भेदभ्रम आटे आशा पाश तुट । विश्रांति हे भेटे संतासंगे ॥२॥
प्रेमें कंठ दाटे आनंदे पूर लोटें । ह्र्दयीं प्रगटे राम रुप ॥३॥
नामा म्हणें सोपे साधन गोमटे । साधे ज्या उत्कृष्टपूर्वपुण्ये ॥४॥ ॥धृ०॥
भावें धरिल्या सत्संगतीम साधका भवपाश निमुक्ति यालागि अवश्य बुध्दिमंति करावी संगती संतांची ॥३१४॥ ए०भा०अ०१२
अभंग-१२
श्रीज्ञानदेव वाक्य-----
आपणासि आपण उपदेशु कीजे । गुरुमुखी बुझिजे तेचि तूं ॥१॥
मी ते कवण हें तूं जाण । बुझे निर्वाण तेंचि तूं ॥धृ॥
सिध्द चि सांडूनि निघसी अन्य ठाई । तूं रिघे पांसोई संताचिया ॥२॥
जें तपा व्रतांचे ठायी यथाचि पाही । परि ते ठायीच्या ठायी ह्मणे ज्ञानदेवो ॥३॥॥धृ०॥
पाहतां लोखंडाचा आरिसा लोखंडेचि घडिजे जैसा लोखंडेचि उजळे कैसा, स्वप्रकाशा निजतेजे ॥३०॥
अभंग-१३
श्रीज्ञानदेव वाक्य-----
एकविध भाव संताच्या चरणीं । घेईन पायवणी धरणीवरी ॥१॥
आनंदे चरण धरीन आवडी । हीच माझी जोडी सर्व जाण्दा ॥२॥
उतराई तयाच्या नोहे उपकारा । धाडिती माहेरा निजाचिया ॥३॥
एका जनार्दनीं घडतां त्याचा संग । जन्ममरण पांग तुटे मग ॥४॥॥धृ०॥
एरव्ही तरी मी मूर्ख । जरी जाहला अविवेक । तरी संत कृपादीपक । सोज्वळ असे ॥७६॥
काम कल्पना त्यागावया जाण । मुख्य सत्संगची कारण । संताचे वंदिता श्रीचरण । कामकल्पना जाण उपमदे ॥३०९॥ ज्ञा०अ०१
अभंग-१४
श्रीतुकाराम महाराज वाक्य-----
श्रीसंताचिया माथा चरणांवरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१॥
विश्रांति पावलों सांभाळा उतरी । वाढलें अंतरी प्रेमसुख ॥२॥
डोरली हें काया कृपेच्या बोरसें । नव्हे आनारिसे उध्दरलो ॥३॥
तुका ह्मणी मज न घडतां सेवा । पूर्व पुण्य ठेवा ओढवला ॥४॥॥धृ०॥
माता सुख देतें नश्वर । तुमच्या आगमनी अनाश्वर । चित्सुक चिन्मात्र परत्परतर भोगावया ॥४६॥
अभंग-१५
श्रीतुकाराम महाराज वाक्य-----
आजिचें हे मज तुम्ही कृपादान दिलें संतजन मायबाप ॥१॥
आलीं मुखा वाटे अमृत वचनें । उत्तीर्ण ना येणी नोव्हे जन्में ॥२॥
तुका म्हणें तुम्ही उदार कृपाळ । शृंगारिले बाळ कवतुकें ॥३॥॥धृ०॥
स्वलीला कृपा केली तुम्ही तेणे परम सभाग्य झालो जी, मी तुमचेअनि आगमनें आम्हीं कृतकृत्य स्वामी संनिध पात्रें ॥४२॥ ए०भा०अ०२
अभंग -१६
श्री नामदेव महाराज वाक्य-----
परिसाचे निसंगे लोह होय सुवर्ण । तैसा भेटे नारायण संत संगे ॥१॥
किटकी घ्यातां भृंगी झाला तोची वर्ण । तैसा भेटे नारायण संतसंगे ॥२॥
वनस्पती परिमळु चंदन झाला जाण । तैसा भेटे नारायण संतसंगे ॥३॥
आग्नीस मिळे तें न ये परतोन । तैसा भेटे नारायण संतसंगे ॥४॥
सरितां ओघ जाय सिंधुसि मिळून । तैसा भेटे नारायण संतसंगे ॥५॥
नामा ह्मणे । केशवा मजदेई संतसंग । आणिक कांही तुज न मागे बापा ॥६॥ ॥धृ०॥
तैसी नव्हे सत्संगती । संगे सकळ संगाते छेदीती ठाकठोक माझी प्राप्ती । पंगिस्त न होतो अणिकाचे ॥४०॥
किटकी भ्रमरीच्या संगती । पालटिली स्वदेह स्थिती । तैसा धरलीय सत्संगती । भक्त पालटती मद्रूपे ॥४१॥
केवल पाहे पा जडमुड चंदनासभोवती झाडे । तै सुगंध झालेनी लांकडे मोल गाढे पावली ॥४२॥ ए०भा०अ०१२
अभंग -१७
श्री एकनाथ महाराज वाक्य-----
अपार महिमा संताचा । काय बोलू मी वाचा ॥१॥
मागे तरलें पुढें तरती । जड जीवा उध्दरती ॥२॥
नाम मात्र रसायन ॥ देउनि तारिती संतजन ॥३॥
ऐशा संता शरण जाऊ ल। एका जनार्दनी ध्याऊं ॥४॥ ॥धृ०॥
तैसी धरिल्या संतसंगती भक्त माझी पदवी पावती शंखी मजहि पूज्ये होती सांगू किती महिमान ॥४४॥ ए०भा०अ०१२
भजन
श्रीज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराज वाक्य-----
आरती १-- झाले समाधान । तुमचे वेखिले चरण ॥१॥
आतां उठावेसे मला । येत नाही नारायण ॥२॥
सुखडीकपणीं । एथें सांपडले केणीं ॥३॥
तुका ह्मणे भोत गेला निवारीला लाग ॥४॥॥धृ०॥
आरती -२ करुनि आरती । चक्रपाणी ओवाळीती ॥१॥
आज पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ॥२॥
पहापहा वो सकळा । पुण्यवंत तुम्ही बाळा ॥३॥
तुका ह्मणे वाहे टाळी । उभा सन्निध जवळी ॥४॥
आरती - ३-- प्रेम सप्रेम आरती । गोविंदासी ओवाळीती ॥१॥
धन्य धन्य ते लोचन । नित्य करिती अवलोकन ॥२॥
बाळा प्रौढा आणि मुगधा । ओवाळिती परमानंदा ॥३॥
नामा ह्मणे केशवातें । देखुनी राहिले निवांत ॥४॥
आरती श्रीज्ञानादेवाची ----- आरती ज्ञानराजा ॥धृ०॥
महाकैवल्य तेजा । सेविता साधुसंत । मनो वेधला माझा ॥१॥
लोपले ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । आवतार पांडुरंग नांव ठेविलें ज्ञानी ॥२॥
प्रगट गुह्य बोले । विश्वब्रह्मचि केले । राम जनार्दनी । पाय टकचि ठेले ॥३॥॥धृ०॥
नमन ----
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळयाने पाहीन रुप तुझें ॥
प्रेमें आलिंगीन आनंद्दे पूजिन भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥॥धृ०॥
भजन----
विठठल रखुमाई । विठोबा रखुमाई । विठोबा रखुमाई । पांडुरंगा ॥१॥
या संतासि निरवी हेचि मज देई । आणिक दुजे कांही न मागों तुज ॥२॥
तुका म्हणे आतां उदार तूं होई । ठेवी मजपायी संताचिया ॥३॥
भजन -----
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम । पुंडलिक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥॥धृ०॥
प्रसाद----
पाहे प्रसादाची वाट । द्यावे घेऊनिया ताट ॥१॥
शेष घेऊनि जाईन । तुमचे झालिया भोजन ॥२॥
झालो एक सेवा । तुम्हां आडूनिया देवा ॥३॥
तुका ह्मणे चित्त करुनी राहिलो निश्चित ॥४॥ ॥॥धृ०॥
प्रसाद पावल्यानंतरचे पद ------
पावला प्रसाद आतां विठु निजावे अपुलाले श्रम कळु येथें स्वभावें ॥१॥
आतां स्वामीं सुखें निद्रा करीबा गोपाळा । पुरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥२॥
तुम्हासी जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाभुभ कर्मे दोष हारावया पीडा ॥३॥
तुका म्हणे दिले उच्छेष्टाचे भोजन । नाही निवडिले अम्हां आपणा भिन्न ॥४॥॥॥धृ०॥
शेज आरती १----शब्दाचे पै रत्ने करुनि आलंकार । तेवो विश्वंभर पूजीयिला । भवाच्या उपचारे करुनि भोजन । तेणीं
नारायण जेवविला ॥२॥
संसारा हाती दिले आंचवण । मुखशुध्दी मन समर्पिले ॥३॥
रंगली इंद्रिये सुरेग तांबुलें माथां तुळसीदल समर्पिले ॥४॥
एकभाव दीप करुनी निरांजन । देऊनि आसन देहाचे या ॥५॥
न बोलोनी तुका करी चरणसेवा । निजविले देवा मजघरी ॥६॥॥॥धृ०॥
शेजआरती २-----
आड केले देवद्वार । येथें काय करकर । आतां चला जाऊं घरा । नका करुं उजगरा ॥२॥
देवा लागलीस नीज । येथें उभे काय काज ॥३॥
राग येतो देवा । तुका ह्मणे न घे सेवा ॥४॥॥॥धृ०॥
शेजआरती ३---
चंदनाची ओवरी उदविली प्रकारी । कनकाचा मंचक शेजेसुमनेवरी ॥१॥
ओवाळूं आलिया शेज आरती । निद्रा करी बापा लक्ष्मीपती ॥धृ०॥
संत सनकादिका यातें आज्ञा दीजे । शुकादिक ज्ञानी यांचा नमस्कार घेजे ॥२॥
बाळा प्रौढा मुग्धा याते आज्ञा दीजे मज सेवका संनिध पहुडविजे ॥३॥
विष्णुदास नाम राहिला द्वारा नेहेटी । जयजयकार करीत देतसे घिरटी ॥४॥॥धृ०॥
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम
N/A
References : N/A
Last Updated : December 05, 2019
TOP