स्कंध ५ वा - अध्याय २६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१५१
राव म्हणे मुने, सकाम कर्माचीं । भिन्न भिन्न कैसीं फलें सांगा ॥१॥
मुनि म्हणे श्रद्धा असे भिन्न भिन्न । भिन्न फल कर्म तेणें घडे ॥२॥
सात्त्विकासी सुख, दु:ख तामसातें । रजोगुणें द्वंद्वें प्राप्त होती ॥३॥
श्रुतिवर्ज्यकर्मे नरकयातना । नरकवर्णना करिती मुनि ॥४॥
राव म्हणे कोठें नरक कथावें । एथें कीं वदावें अन्य लोकीं ॥५॥
मुनि म्हणे अधोभागीं पातालाच्या । ऊर्ध्व उदकाच्या नरकलोक ॥६॥
दक्षिणेसी पितृपति वंशजांचें । नित्य कल्याण तें चिंतिताती ॥७॥
वासुदेव म्हणे यमाची ते दिशा । कर्मासम शिक्षा लाभे तेथें ॥८॥

१५२
तामिस्त्रादि अष्टविंशति नरक । निवेदिती शुक ऐका आतां ॥१॥
परद्रव्यादिक हरणें उपवासी - । ठेवूनि, हाणिती लगुड तेथें ॥२॥
‘तामिस्त्र’ तो, ‘अंधतामिस्त्र’ पुढती । वंचकां करिती अंध तेथें ॥३॥
स्वार्थाहंकारें जे नाडिती अन्यायें । भोगिती ते पाहें ‘रौरवातें’ - ॥४॥
रुरु नामें कृमि भक्षिती तयातें । ‘महारौरवीं’ ते द्रोही जाती ॥५॥
क्रव्याद मांसाचे लचके तोडिती । असह्यचि होती यातना त्या ॥६॥
‘कुंभिपाकीं’ पशु - पक्ष्यांसी जिवंत । शिजविती त्यांस तळिती दूत ॥७॥
पिता विप्र वेदद्वेष्टे । ‘कालसूत्र’ । घोर नरकांत पोळताती ॥८॥
परितप्त ताम्रपत्र्यांची ते भूमि । क्षुधार्तचि प्राणी लोळविती ॥९॥
रोमांच प्रमाण शब्दें ऐशापरी । स्मरे नरहरी वासुदेव ॥१०॥

१५३
‘असिपत्रवनीं’ मूढ अधार्मिक । भोगिताती दु:ख छिन्न देहें ॥१॥
इक्षुदंडासम सत्तांध सेवकां । पिळिती नरका ‘सूकरमुख’ ॥२॥
रांघिले जंतु ते भक्षिताती जेथें । ‘अंधकूप’ त्यातें संज्ञा असे ॥३॥
पंचयज्ञाविण भोजन करितां । ‘कृमिभोजनाचा’ नरक लाभे ॥४॥
‘संदंश’ नरकीं तप्त सांडसानीं । तस्करां भाजूनि काढिताती ॥५॥
व्याभिचारें तप्तमूर्तीसी बांधिती । ‘तप्तसूर्मि’ ऐसी संज्ञा तया ॥६॥
शाल्मली कंटक जेथ वज्रासम । पश्वादि ओढूनि तयां पाप्यां ॥७॥
वासुदेव म्हणे कंटकावरुनि । नेताती ओढूनि तयां पाप्यां ॥८॥

१५४
पू, विष्ठा, मूत्र, तैं रक्त, केश, अस्थि । चरबी, मांसादि सरितेसम ॥१॥
‘वैतरणी’ नाम तया सरितेसी । पापी नृपाळांसी वास तेथें ॥२॥
राजे राजदूत जे जे अधार्मिक । जंतु त्या नदींत टोंचिती त्यां ॥३॥
शूद्रस्त्रीनिरतां ‘पूयोद’ नरक । विष्ठा मूत्र कफ भरले जेथें ॥४॥
कुक्कुटश्वानादि पाळिती जे विप्र । तयां ‘प्राणरोध’ नरक लाभे ॥५॥
अधर्म्यहिंसा वा करिती तयांतें । गांजिती यमाचे दूत तेथें ॥६॥
ढोंगी याज्ञिकांसी लाभे ‘विशसन’ । क्रूरपणें यम कापी तयां ॥७॥
बलात्कारी विप्रां ‘लालाभक्ष’ रेत - । प्राशन, त्यां प्राप्त कामांधांसी ॥८॥
राजे, राजदूत, गरद, दाहक । श्वानभक्ष्य नीच यमलोकीं ते ॥९॥
वासुदेव म्हणे ‘सारमेयादन’ । सत्तांध जे जन लुटिती तयां ॥१०॥

१५५
व्यापारव्यवहारीं असन्मार्गे जातां । पाषाणाघात त्यां ‘अवीचि’ तो ॥१॥
विप्र, विप्रस्त्री वा करी मद्यपान । अथवा सोमपान क्षत्रियादि ॥२॥
करिती तयांसी तप्तलोहरस । ‘अय:पान’ तोच नरक असे ॥३॥
विद्वान तापसी सच्छीलावमानें । ‘क्षारकर्दमानें’ क्लेश होती ॥४॥
नरनारी कोणी नरमांस भोजी । तयांसी तोडिती कुर्‍हाडीनें ॥५॥
नरक तो ‘रक्षोगणभोजन’ ही । विश्वास घातेंचि ‘शूलप्रोत’ ॥६॥
निष्कारण जीवां छळितां ‘दंदशूक’ । भयंकर सर्पदंश तेथें ॥७॥
वासुदेव म्हणे अतिथिपीडनें । ‘पर्यावर्तन’ जाणे नेत्रभंग ॥८॥

१५६
अंधारीं वा कोठें कोंडूनि मारितां । विषारी धूम्राचा लोट जेथें ॥१॥
नाम हें ‘अवटनिरोधन’ त्याचें । गुदमरे तेथें जीव बहु ॥२॥
‘सूचिमुख’ अंत्य नरक जाणावा । कृपणांचा ठेवा अंती हाचि ॥३॥
माता, पिता, गुरु यांस्तवहि धन । वेंचिती न, प्राण मानूनियां ॥४॥
पिशाच्चासम जे रक्षिती द्रव्यासी । द्रव्यार्थ पातकीं मग्न होती ॥५॥
अनंत यातना भोगिती ते येथें । असंख्यचि ऐसे नरक राया ॥६॥
चतुर्दश ऐसीं जाणितां भुवनें । होई सहजपणें सूक्ष्म ज्ञान ॥७॥
वासुदेव म्हणे स्कंध हा पंचम । पूर्ण, नारायण, तोषो येणें ॥८॥

इतिवासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंद ५ वा समाप्त.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : November 08, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP