स्कंध ५ वा - अध्याय १३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


७५
नृपा, हा संसार दु:खाचा सागर । यामाजी संचार अर्थेच्छूंचा ॥१॥
आडवनीं सार्थ चुकतां जेंवी धोका । जीवांची ते दशा तैसी एथ ॥२॥
वासनानायक कुमार्गे चालतां । वृक गोमायूंचा घेर पडे ॥३॥
षड्रिपुतस्कर निर्दय पीडिती । लतागुल्मांमाजी गुंततां ते ॥४॥
विघ्नरुपी दंश मशक त्या ठायीं । गांजिताती पाहीं सर्वकाल ॥५॥
गंधर्वनगरीसम रम्य देह । मानूनियां सत्य, भ्रमण होई ॥६॥
वासुदेव म्हणे भवाटवी थोर । पीडी अविचारमग्न जीवा ॥७॥

७६
कोठें ‘कोलती’ सुवर्ण । धरायास धांवे रान ॥१॥
रजस्वलावावटळ । करी तयासी व्याकूल ॥२॥
विसरे आत्मज्ञानदिशा । भ्रमतां होतसे निराशा ॥३॥
निंदामशकांचा दंश । पीडा देई अहर्निश ॥४॥
मशक सांपडे न कदा । असह्य त्या होती पीडा ॥५॥
ओरडती शत्रुघूक । कंप पावतें काळीज ॥६॥
दुष्ट काम-क्रोधवृक्ष । कवटाळिती ते क्षुधार्त ॥७॥
वासुदेव म्हणे मिथ्या । मृगजलाची त्यां आशा ॥८॥

७७
जलहीन सरितांमाजी । निमज्जनीं होई राजी ॥१॥
पुढती बहु हाल होती । शरण जाई बांधवासी ॥२॥
वणव्यामाजीही गवसे । लुटिती दैत्य सर्वस्वातें ॥३॥
कोणी बलिष्ठ ओढिती । दीनवाणा होई अंतीं ॥४॥
कांहीं आप्त देती धीर । परी क्षणिक आधार ॥५॥
कांटे, खडे रुतती पायीं । गिरिशिखरींही जाई ॥६॥
वासुदेव म्हणे मार्ग । वाटे तया अवघड ॥७॥

७८
निद्राअजगर ग्रासितो तयासी । मृतचि मानिती आप्त कदा ॥१॥
टाकितां वनांत पीडिताती सर्प । तेणें होई अंध दैवें कोणी ॥२॥
पतन तयाचें होई कूपामाजी । आक्रंदे पुढती करुण स्वरें ॥३॥
कदा परस्त्रीसी शोधितां कामांध । कळतां तें आप्त क्रुद्ध होती ॥४॥
होतांही ते वश अन्यचि तियेसी । हिरावूनि नेती बलात्कारें ॥५॥
शीतोष्णादि द्वंद्वें सहन न होती । कदा कपटकृति द्वेषमूळ ॥६॥
वासुदेव म्हणे नागवल्या जीवा । देई न विसावा कोठें कोणी ॥७॥

७९
परद्रव्यासक्ति उपजतां पोटीं । पावतो फजिती लोकांमाजी ॥१॥
परस्परांमाजी द्रव्यार्थ कलह । त्यांतचि विवाह करिती सौख्यें ॥२॥
ऐसे विषयांत रमूनियां जाती । संकटें यद्यपि येती बहु ॥३॥
मृतासी त्यागिती, जन्मे त्या पाळिती । ऐसा क्रमिताती पुढील मार्ग ॥४॥
परोपरी कष्ट यापरी भोगितां । कोणी मूळ शोधा प्रवर्तेना ॥५॥
पारही न कोणी जाई माझें माझें । करुनियां ओझें व्यर्थ वाहे ॥६॥
शासन कोणासी वैरभावें ज्ञाता । न करी, सायुज्यता तेणें पावे ॥७॥
वासुदेव म्हणे भवाटवीमाजी । विषयांत राजी जीव नित्य ॥८॥

८०
बाहुलतापाशीं बालक पक्ष्यांचे । बोल बोबडे ते मधुर मानी ॥१॥
कदाकाळीं कोणी सिंहासी भिऊनि । सख्यत्व जोडूनि कंक-गृध्रां ॥२॥
वंचित जाहल्यावरी हंसांप्रति । क्षणभरी जाती शरण दु:खें ॥३॥
त्यागूनि तयांही पुढती मर्कटांसी । जोडूनियां मैत्री विषयीं लुब्ध ॥४॥
विषयमग्नासी कालविस्मरण । होऊनि पतन होई घोर ॥५॥
दरींत त्या, मृत्युगजासी भिऊनि । जाळींत दडूनि स्वस्थ राहे ॥६॥
वासुदेव म्हणे वांचतां फिरुनि । रमे त्याचि कर्मी ज्ञानहीन ॥७॥

८१
राजा रहुगुणा, भवाटवीमग्ना । शासन न अन्या करीं गर्वे ॥१॥
सर्वभूतसख्यें करीं ईशसेवा । सकल विषयां अव्हेरुनि ॥२॥
पाजळतें ज्ञानखड्‍ग घेईं करीं । छेदीं हें सत्त्वरी भवारण्य ॥३॥
वासुदेव म्हणे भरताची वाणी । ऐकूनियां मनीं तुष्ट राव ॥४॥

८२
संतुष्ट नृपाळ म्हणे सज्जनांचा । संग देवादिकां दुर्लभचि ॥१॥
ईश्वरभजनें कंठिती जे वय । तयांचें सान्निध्य न मिळे देवां ॥२॥
मुने, दोन घटि सहवास झाला । अविवेक गेला तेणें माझा ॥३॥
नित्य पायधुळीमाजी जे लोळती । कां न मुक्त होती ऐसे नर ॥४॥
कोण्या वेषें साधु वसती न कळे । यास्तव जोडिले सकलां कर ॥५॥
वासुदेव म्हणे आशीर्वादइच्छा । धरील तयाचा उदय होई ॥६॥

८३
शुक रायाप्रति बोलले यापरी । उपदेश करी भरत नृपा ॥१॥
अवमानखेद नसेचि ज्ञात्यासी । रहुगुण वंदी प्रेमें तया ॥२॥
सद्‍गदित कंठ पाहूनि नृपाचा । मोद भरताचा प्रगट होई ॥३॥
निर्विकार क्षणीं होऊनि चालला । मोह नष्ट झाला नृपाळाचा ॥४॥
सत्संगमहिमा अगाध यापरी । राया, ध्यानीं धरीं म्हणती शुक ॥५॥
परीक्षिती म्हणे ज्ञानाचें महत्त्व । निवेदूनि अर्थ स्पष्ट करा ॥६॥
भवाटवीचें त्या स्पष्ट कथा ज्ञान । न कळे त्याविण सामान्यासी ॥७॥
वासुदेव म्हणे भवाटवीबोध । ऐका आतां स्पष्ट कथिती मुनि ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP