स्कंध ५ वा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३७
परीक्षिती म्हणे ज्ञानाग्नीनें दग्ध । कर्मबीजें त्यास सिद्धिपीडा - ॥१॥
नसतांही, त्याग केला कां ऋषभें । निवेदावें मातें मुनिश्रेष्ठा ॥२॥
शुक म्हणे ज्ञाते चंचल मनाचा । भरंवसा कदा धरितीचिना ॥३॥
जालस्थही मृग पळती व्याध मानी । तैसा नित्य ज्ञानी सावधान ॥४॥
मानूनि विश्वास करुं नये सख्य । शिवाचाही घात केला मनें ॥५॥
जारिणी आश्रय करुनि जाराचा । घात स्वपतीचा करी जेवीं ॥६॥
तेंवी कामक्रोधां आश्रय देऊनि । नष्ट करी जनीं योग्यां मन ॥७॥
विकारमूळ त्या मनासी जिंकिता । दक्षचि सर्वदा असणें योग्य ॥८॥
वासुदेव म्हणे रायालागीं शुक । कथिती वृत्तान्त पुढती ऐका ॥९॥

३८
राया, भूषण जो लोकपालांतेंही । जडचि तो पाहीं भासे जनां ॥१॥
प्रभाव तयाचा कळलाचि न कोणा । आदर्श मरणा सिद्ध होई ॥२॥
अभेदानुभवें जीव विषयांचा । संगचि सोडितां शांत होई ॥३॥
काढितांही दंड कुलालाचें चक्र । फिरे कांहीं काळ तैसेंचि हें ॥४॥
प्रारब्धें भ्रमतो कुटक पर्वतीं । ग्रास घेई मुखीं पाषाणांचा ॥५॥
मुक्तकेश, नग्न, जडासम हिंडे । काननीं तैं सुटे थोर वारा ॥६॥
घर्षणें त्या वेळीं पेटे वेणुवृंद । भस्म वणव्यांत ऋषभ होई ॥७॥
वासुदेव म्हणे निर्भय, वनांत । प्रारब्धाअंकित केला देह ॥८॥

३९
कोंक, वेंक तेंवी कुटक प्रदेश । होईल ‘अर्हत’ राजा तेथें ॥१॥
परमहंसाचें वृत्त तें ऐकूनि । पावेल तो मनीं दैवें मोह ॥२॥
निर्भयपणेंचि स्वधर्म त्यागील । पाखंड रचील स्वबुद्धीनें ॥३॥
आधींच तो कलि त्यांत ऐसा राजा । अधार्मिक होतां काय न्यून ॥४॥
नृपाळानुरोधें वर्णाश्रमधर्म । त्यागितील जन स्वैराचारें ॥५॥
स्नान आचमनादिक ते मंगल - । विधि, त्यागितील शास्त्रोक्त जे ॥६॥
केशोत्पाटक कीं कर्तन रुचेल । मनसोक्त होतील सकल विधि ॥७॥
वासुदेव म्हणे स्वैर निर्भयता । नाश मानवाचा करीतसे ॥८॥

४०
कलि अधर्माचें मूळ । जनां मोहांत पाडील ॥१॥
देव, ब्राह्मण, सज्जन । श्रद्धा जाईल उडून ॥२॥
जन नास्तिक होतील । शास्त्रप्रामाण्य त्यजितील ॥३॥
स्वबुद्धीनेंचि अर्हत । चालवील धर्मपंथ ॥४॥
वेदबाह्य ऐशा पंथें । जातील त्यां नरक लाभे ॥५॥
वासुदेव म्हणे बुद्धि । अपूर्णचि मानवाची ॥६॥

४१
रजोगुणव्याप्त जनांचा उद्धार । करण्या अवतार ऋषभाचा ॥१॥
ऋषभासंबंधीं बोलती सज्जन । ऐकें पुरातन भाषण तें ॥२॥
सप्तद्वीपांमाजी श्रेष्ठ हें भारत । गोविंदचरित्र गाती जेथें ॥३॥
धन्य प्रियव्रतवंश तो पावन । जेथें नारायण ऋषभ झाला ॥४॥
ऋषभाचा योग योग्यांसी दुर्लभ । ऐकतां हें वृत्त भक्ति लाभे ॥५॥
अर्पील श्रीहरी मुक्तीही एकदां । परी भक्ति कदा अर्पिचिना ॥६॥
सद्गतीचा मार्ग दाविला ऋषभें । नमस्कार त्यातें असी नित्य ॥७॥
वासुदेव म्हणे ऋषभआख्यान । करील पावन साधकासी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP