स्कंध ५ वा - अध्याय १८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


११४
भद्राश्ववर्षी तो भद्रथवा राव । प्रार्थी हयग्रीव ईश्वरासी ॥१॥
म्हणे नमस्कार ईश्वरा, हा घेई । अंतपार नाहीं त्वन्मायेचा ॥२॥
पिता, पुत्र, आप्त, पावती मरण । जन त्यांचें धन इच्छिताती ॥३॥
चिरंजीव स्वयें मानूनि आपणां । पाहूनि हें मना नवल वाटे ॥४॥
हेचि तुझी माया शाश्वत तूं एक । निवेदिती देव स्पष्टपणें ॥५॥
चोरितां ते वेद दैत्यांनीं ईश्वरा । घेऊनि अवतारा अश्वरुपें ॥६॥
रसातळांतूनि आणूनियां वेद । देसी तूं ब्रह्मयास नमन तुज ॥७॥
वासुदेव म्हणे हयग्रीवाप्रति । आदरें प्रार्थिती भद्राश्वांत ॥८॥

११५
हरिवर्षी भक्त प्रल्हाद नृसिंहा । प्रार्थी तया देवा नमस्कार ॥१॥
वज्रनख वज्रदंष्ट्रा हो प्रगट । सकल तेजांस मूळ तूंचि ॥२॥
जाळूनियां टाकीं आमुच्या वासना । देईं नारायणा अभय आम्हां ॥३॥
परस्पर दया उपजो सर्वांसी । दुष्टत्व लयासी नेई सर्व ॥४॥
गृहधनासक्ति हरावी आमुची । निरंतर भक्ति जडो तव ॥५॥
केवळ शरीरकर्मे जो आचरी । कृपा तयावरी श्रीहरीची ॥६॥
अनुपम जगीं भक्तांचीं संगति । पावन करिती श्रवणें जनां ॥७॥
कर्णरंध्रद्वारा अंतरीं ईश्वर । प्रवेशूनि मळ सकळ हरी ॥८॥
गंगादिक तीर्थे नासे देहमल । अंतर निर्मल हरिभक्तीनें ॥९॥
वासुदेव म्हणे भक्ति ते निष्काम । करितां प्रसन्न होई देव ॥१०॥

११६
प्रसादें हरीच्या देवतासान्निध्य । सद्‍गुणांचा वास नित्य घडे ॥१॥
वरीवरी मोहकारी जे विषय - । सेवी, निरामय त्यजूनि ईश ॥२॥
तया सवैराग्य ज्ञान केंवी लाभे । जीवन मत्स्यांचें उदक जेंवी ॥३॥
तैसें सकलांचें जीवन श्रीहरी । कांस त्याची धरी तोचि श्रेष्ठ ॥४॥
दुर्लक्षिती तया, तयां शक्ति, वय । यांचेंचि श्रेष्ठत्व, ज्ञानावीण ॥५॥
ज्ञानकलेवीण श्रेष्ठत्व तें व्यर्थ । ज्ञानाविण व्यर्थ सकल कांहीं ॥६॥
सकल विकारकारण संसार । जाणूनि, आधार ईश्वरचि ॥७॥
दैत्यहो, तयाचा आश्रय करावा । प्रल्हाद केशवा स्तवी नित्य ॥८॥
वासुदेव म्हणे प्रल्हादाची वाणी । धरील जो ध्यानीं देवत्व त्या ॥९॥

११७
केतुमालवर्षी प्रजापतिकन्या । तेंवी लक्ष्मी धन्या करी विष्णु ॥१॥
कामदेवरुपें वसे तेथें हरी । संतुष्ट अंतरीं कन्या पुत्र ॥२॥
छत्तीस सहस्त्र पुत्र भाग्यवंत । तितुक्याचि तेथ कन्या जाणें ॥३॥
दिन-रजनीच्या देवता त्या दिव्य । प्रतिवर्षी गर्भपतन त्यांचें ॥४॥
पतींसवें त्यांच्या लक्ष्मी करी ध्यान । ईश्वरस्तवन करुनियां ॥५॥
वासुदेव म्हणे स्तवन तें ऐका । देवा कामरुपा लक्ष्मी स्तवी ॥६॥

११८
इंद्रियनियंत्या प्रभो, कामरुपा । जगीं उत्तमता सकळ तूंचि ॥१॥
क्रिया-ज्ञानशक्ति संकल्प विकल्प । सकलही तूंच शक्तिरुपें ॥२॥
वारंवार माझा घेई नमस्कार । पति तूं साचार एकमेव ॥३॥
निर्भय जो स्वयें संरक्षी सर्वांसी । सत्य तोचि पति जगीं एक ॥४॥
सकाम इच्छिती तेचि तयां देसी । इच्छा पुरवीसी निष्कामांच्या ॥५॥
सुखार्थ सर्वही इच्छिताती मज । लाभतें मी ज्यांस भक्तिप्रिय ॥६॥
ईशभक्तीवीण अन्य न पुरुषार्थ । ठेवीं कृपाहस्त शिरीं माझ्या ॥७॥
अतर्क्यचि तुझी माया म्हणे लक्ष्मी । वासुदेव पाणी जोडी तयां ॥८॥

११९
वैवस्वत मन प्रार्थी रम्यकवर्षांत ॥ अद्यापि आदरें मत्स्यरुपी ईश्वरास ॥१॥
मत्स्येश्वरा, असो नित्य नमस्कार माझा ॥ सर्वशक्ति सत्तारुपें आधार विश्वाचा ॥२॥
व्यापक गंभीर तुझा वेदरुप शब्द ॥ बाहुबलीसम हे सर्व देव परतंत्र ॥३॥
वैषम्यें त्यागितां तुज इंद्रादिक देवा ॥ पश्चात्ताप झाला पूर्वी प्रभो, देवदेवा ॥४॥
प्रलयकालीं तूं देवा रक्षिलेंसी मज ॥ प्रभो, नमस्कार माझा नित्य असो तुज ॥५॥
वासुदेव म्हणे विश्वचालक प्रभूसी ॥ सर्वकाळ प्रार्थीतसे मनु तया वर्षी ॥६॥

१२०
हिरण्मयवर्षी अर्यमा कूर्मासी । निरंतर प्रार्थी भक्तिभावें ॥१॥
कूर्मरुपी देवा, घेई नमस्कार । रचिते हें सर्व तव माया ॥२॥
आभासचि सर्व रुपे हीं ईश्वरा । जंगम स्थावरां तूंचि मूळ ॥३॥
असंख्यात नामरुपें ही असूनि । मर्यादा सांख्यांनीं कथिली त्यांची ॥४॥
कल्पनाचि परी वाटते ते मज । प्रार्थी ऐसें नित्य ईश्वरासी ॥६॥

१२१
भूमि त्या उत्तरकुरुवर्षामाजी । प्रार्थी वराहासी जनांसवें ॥१॥
देवा, यज्ञरुपा, वेदमंत्रें बोध । होई तव यश, सर्वयुगीं ॥२॥
विवेकेंचि तव बोध ज्ञानियांसी । नमन तुजसी असो भावें ॥३॥
निरपेक्षा भक्तांस्तव इच्छा तुज । तूंचि मायाधीश सकल साक्षी ॥४॥
लीलामात्रें मज सागरीं रक्षिलें । दैत्यासी वधिलें सहजपणें ॥५॥
प्रभो, मज पाईं लीन मी सर्वदा । वंदी तया रुपा वासुदेव ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP