स्कंध ५ वा - अध्याय २१ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१३७
मुनि शुकाचार्य बोलती रायासी । दलें ब्रह्मांडाचीं स्वर्ग भूमि ॥१॥
अंतरिक्ष त्यांच्या संयोगा कारण । सूर्यनारायण अंतरिक्षी ॥२॥
उष्णता प्रकाश देई तो सर्वत्र । वर्णिलें जें एथ तेंचि स्वर्गी ॥३॥
द्विद्वल धान्याचीं दलें जेंवी सम । तैसेंचि हें जाण नृपश्रेष्ठा ॥४॥
मंद शीघ्र सम सूर्याच्या या गति । दक्षिण उदीची मध्यगामी ॥५॥
दक्षिणायन तैं उत्तरायण तें । वैषुवत ऐसे भेद तेणें ॥६॥
दिनरात्रीमान गतीनें त्या भिन्न । दिनरात्र सम मेष तूळीं ॥७॥
वासुदेव म्हणे गतीचें परिमाण । निवेदिती जाण मुनिश्रेष्ठ ॥८॥
१३८
वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या । राशी या दिनमाना वुद्धिकारी ॥१॥
प्रतिमासीं एक घटिका ते वृद्धि । क्रमानें पुढती रजनी वाढे ॥२॥
वृश्चिक तैं धन, मकर, कुंभ, मीन । राशींप्रति जाण सूर्य यदा ॥३॥
होई दिनवृद्धि उत्तरायणांत । दक्षिणायनांत रजनी वाढे ॥४॥
नऊ कोटि एकावन्न योजनांचा । मार्ग दक्षिणेचा कथिला असे ॥५॥
‘देवधानी’ नामें मेरुच्या पूर्वेसी । नगरी इंद्राची राजधानी ॥६॥
दक्षिणेसी यमपुरी संयमनी । तेंवी निम्लोचनी पश्चिमेसी ॥७॥
वरुणनगरी तैसी विभावरी । सोमाची ते पुरी उत्तरेसी ॥८॥
वासुदेव म्हणे नगरी या चार । फिरे अहोरात्र सूर्यदेव ॥९॥
१३९
प्रात:काल यदा होई एक्या ठाईं । सायंकाळ पाहीं अन्यस्थळीं ॥१॥
मध्यान्ह ते मध्यरात्र ऐशा क्रमें । योग्य काळीं कर्मे मनुज करी ॥२॥
प्रदक्षिणावर्त प्रवह नामक । वायूनें आदित्य प्रदक्षिण ॥३॥
मेरुसभोंवतीं फिरतो आदित्य । सर्वदा प्रकाश मध्यान्हसा ॥४॥
दोन कोटी लक्ष अडतीस जाण । अर्ध लक्ष न्यून योजनांची ॥५॥
गति पंचदश घटीमाजी सूर्या । मेरुप्रति फेर्या ऐशा घाली ॥६॥
ज्योतिश्चक्रावरी चंद्रादिक ग्रह । नित्य अस्तोदय पावताती ॥७॥
वासुदेव म्हणे सूर्य प्रतिदिनीं । चारीही हिंडूनि येई पुरें ॥८॥
१४०
संवत्सररुप चक्र सूर्यरथा । मासात्मक वारा आरा तया ॥१॥
ऋतु त्याचि सहा धांवा तयाप्रति । काळ तीन नाभि, तया तीन ॥२॥
दक्षिण उत्तर आंसासी त्या ध्रुव । मेरुवरी स्थिर एक आंस ॥३॥
गायत्र्यादि सप्त छंद तेचि अश्व । अरूण तो अग्रभागीं स्थित ॥४॥
बालखिल्य साठ सहस्त्र सूर्यासी । नित्य स्तविताती वेदमंत्रें ॥५॥
द्वादश मासांचीं नामें तीं द्वादश । तैसेचि सेवक भिन्न भिन्न ॥६॥
सार्ध नवकोटी वरी कांहीं लक्ष । योजनें तो मार्ग आदित्याचा ॥७॥
वासुदेव म्हणे प्रतिक्षणीं दोन - । सहस्त्र योजन गति त्याची ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 07, 2019
TOP