स्कंध ५ वा - अध्याय १ ला

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य



भगवच्चिंतनें पंचम हा स्कंध । आरंभू गोविंदसंतोषार्थ ॥१॥
परीक्षिती म्हणे मुने, प्रियव्रत । असूनियां भक्त विषयमग्न ॥२॥
निवेदिलें ऐसें केंवी तें कथावें । नि:शंक करावें मन माझें ॥३॥
निवेदिती मुनि जरी दैवयोगें । संकट भक्तांतें प्राप्त झालें ॥४॥
गुणकथा तरी ऐकती ते प्रेमें । प्रियव्रत जाणें मर्म हेंचि ॥५॥
नारदोक्तज्ञानें कृतार्थ तो अंतीं । सद्गुणी नृपती होता बहु ॥६॥
मनु कथी तया रक्षावें भूमीसी । मानिली पित्याची आज्ञा दु:खें ॥७॥
वासुदेव म्हणे ब्रह्मभावाविघ्न । राज्य हें म्हणून दु:ख तया ॥८॥


प्रियव्रहेतु जाणूनियां ब्रह्मा । सोडूनि स्वस्थाना आला तेथ ॥१॥
गंधमादनीं त्या गुहेमाजी येतां । पाही प्रियव्रता मनूसवें ॥२॥
नारदही भाग्यें होता तयास्थानीं । ब्रह्मयासी पाहूनि उठले सर्व ॥३॥
सन्मान तयाचा योग्य तोचि होतां । ब्रह्मा प्रियव्रता बोध करी ॥४॥
कालस्थलातीत ईश्वराची इच्छा । योग्यचि सर्वदा जाणावी ते ॥५॥
आधीन तयाच्या सकलही आम्हीं । देहधारी प्राणी तेंवी सर्व ॥६॥
तप, विद्या, योग, बुद्धि, धर्म, अर्थ । जाण असमर्थ तद्विरोधा ॥७॥
वासुदेव म्हणे ईश्वरेच्छा श्रेष्ठ । लंघावया मार्ग नसे जनीं ॥८॥


बाळा, जन्म, मृत्यु, शोक, मोह, प्रीति । सुख-दु:ख भोगी जीव देहीं ॥
वत्सा, सर्व आम्हीं वेदाचे अंकित । बंध सत्त्वादिक आपणासी ॥२॥
चतुष्पाद जेंवी मानवाचे दास । तेंवी ईश्वरास भजणें आम्हीं ॥३॥
छाया आतपीं वा डोळस अंधासी । नेई तेथ त्यासी जाणें प्राप्त ॥४॥
गुणकर्मे तेंवी वांटयासी जे भोग । येतील ते प्राप्त भोगणेंचि ॥५॥
हेचि स्थिति बाळा, मुक्तांसीही जाण । जाणूणि हें स्वप्न वर्ते ज्ञाता ॥६॥
संसारींही ज्ञाता वसे निर्वासन । आसक्ति धरुन वन व्यर्थ ॥७॥
दुर्गाश्रयें राव जिंकी जैं शत्रूंसी । लाभ गृहस्थासी तोचि घडे ॥८॥
वासुदेव म्हणे धर्म आश्रमांचे । पावन नरातें करिती कर्मे ॥९॥

ऐकूनियां ऐसा बोध । प्रियव्रत तो लज्जित ॥१॥
अंतीं म्हणे आज्ञा मान्य । ब्रह्मा पावे अंतर्धान ॥२॥
स्वायंभुवही संतुष्ट । होऊनियां करी तप ॥३॥
प्रियव्रत राज्य करी । ईशा आठवी अंतरीं ॥४॥
प्रजापतिकन्या अंतीं । वरी नामें ‘बर्हिष्मती’ ॥५॥
गुणवंत दहा पुत्र । कन्या ‘ऊर्जस्वती’ एक ॥६॥
वासुदेव म्हणे ऐका । पुत्रांचीं त्या नामें आतां ॥७॥


आग्नीध्र तो इध्मजिव्ह, यज्ञबाहु । महावीर, गाऊं कनकरेता ॥१॥
धृतपृष्ठ, तेंवी सवन, मेधातिथि । वीतिहोत्र अंतीं,  कवि जाणा ॥२॥
कवि, महावीर, सवन हे तीन । आबाल्य निमग्न चिंतनांत ॥३॥
ब्रह्मबोधें अंतीं जाहले कृतार्थ । आधार त्यां एक ईश्वरचि ॥४॥
उत्तम, तामस, रैवत हे तीन । अन्येसी हे जाण पुत्र होती ॥५॥
मन्वंतराधिप पुढती ते होती । प्रिवव्रता ऐसी संतति हे ॥६॥
वासुदेव म्हणे अनासक्त कर्म । आचरी तो धन्य प्रियव्रत ॥७॥


बर्हिष्मती पाही प्रणयें नृपासी ।सलज्ज कदा ती स्मित करी ॥१॥
पाहूनि ते भाव रावही त्यापरी । दावी भाव परी चित्तीं बोध ॥२॥
प्रकाशित, अर्ध, अर्ध तमोमय । पाहूनियां राव भूमि दु:खी ॥३॥
प्रदक्षिणा घाली मेरुसी तो सप्त । भासला प्रदीप्त सूर्यचि तैं ॥४॥
अंधकार तदा सर्व नष्ट झाला । यापरी शोभला प्रियव्रत ॥५॥
रथचक्रें तदा होती जे आघात । जाणावे ते सप्तसिंधु जगीं ॥६॥
वासुदेव म्हणे मर्यादा सिंधूची । पडतां ते होती सप्तद्वीपें ॥७॥


जंबु, प्लक्ष तेंवी शाल्मलि तें कुश । क्रौंच तेंवी शाक, पुष्करही ॥१॥
एकाहूनि दुजें द्विगुण विशाल । जाणावा विस्तार यथाक्रमें ॥२॥
क्षार, इक्षु, मद्य, घृत, दुग्ध, दधि । उदक, उदधि ऐसे सप्त ॥३॥
खंदकांसम ते द्वीपांच्या भोंवतीं । योजी आग्नीधादि पुत्रा नृप ॥४॥
शुक्रासी अर्पिली ऊर्जस्वती कन्या । देवयानी धन्या कन्या तिज ॥५॥
ईशभावें जेणें जिंकियेलें चित्त । अलौकिक तेथ सहज गुण ॥६॥
वासुदेव म्हणे ईश्वरस्मरण - । सामर्थ्ये जो हीन तोही श्रेष्ठ ॥७॥


असो राया, अंतीं प्रियव्रताप्रति । होई अलंबुद्धि विषयांत ॥१॥
यथान्याय, अंतीं विभागूनि राज्य । वांटिलें पुत्रांस शांतपणें ॥२॥
कांतेसवें तुच्छ लेखूनि विषय । भावें धरी पाय श्रीहरीचे ॥३॥
प्रियव्रत ऐसी करुनियां कृति । आश्चर्य या लोकीं करुनि गेला ॥४॥
सप्तद्वीपें सप्त समुद्र ज्या योगें । संभ्रमण ऐसें केलें तेणें ॥५॥
नद्या पर्वतही निर्मूनि त्या स्थानीं । तुष्ट केलें मनीं सकल जीवां ॥६॥
लेखूनियां तुच्छ त्रैलोक्यसंपदा । अंतीं तो मुकुंदा शरण गेला ॥७॥
वासुदेव म्हणे शुक्र ऐसें वृत्त । कथिती नृपास अत्यानंदें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP