स्कंध ५ वा - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२४
नरदेहाचें सार्थक । नाहीं भोगूनियां भोग ॥१॥
बालकहो, विषयसौख्यें । अंतीं कष्टचि जनांतें ॥२॥
विष्ठाभक्षक कृमीही । विषय भोगिताती पाहीं ॥३॥
भोग भोगितां सार्थक । नव्हे जाणावें हें स्पष्ट ॥४॥
कांहीं असामान्य कर्म । घडावें हें चिंतो मन ॥५॥
नरजन्माचें सार्थक । घडे आचरितां तप ॥६॥
तपें होई चित्तशुद्धि । तेणें परब्रह्मप्राप्ति ॥७॥
झटूनियां रात्रंदिन । संपादावें एक ज्ञान ॥८॥
वासुदेव म्हणे संत । नरा दाविती सन्मार्ग ॥९॥

२५
संतसेवा हेंचि जाणा मुक्तिहार । जाणा भुक्तिद्वार विषयसंग ॥१॥
भूतमात्रीं प्रेम निर्विकार मन । जाणावे सज्जन तेचि लोकीं ॥२॥
इच्छिती सर्वदा सर्वांचें कल्याण । नित्य आचरण शुद्ध त्यांचें ॥३॥
ध्यानमग्नचित्त हाचि त्यां पुरुषार्थ । स्वार्थी कीं लोलुप रुचती न त्यां ॥४॥
प्राप्तचि त्या ठाईं तितुकाचि संबंध । ठेविती ते वंद्य पुण्यवंत ॥५॥
वासुदेव म्हणे संतांचीं लक्षणें । अंतरीं बिंबणें हेंचि भाग्य ॥६॥

२६
इंद्रियतृप्ति तो ज्ञानाचा विनाश । विनष्ट विवेक लाडें त्यांच्या ॥१॥
विवेकविनाशें दुष्कर्मप्रवृत्ति । योग्यता देहाची ध्यानीं घ्यावी ॥२॥
इंद्रियांचें कोड देहसौख्यास्तव । पुरवूनि काय लाभ जाणा ॥३॥
नश्वर तो अंतीं जाईल नासूनि । भोगाविण जनीं न चुके पाप ॥४॥
यास्तव या देहीं येऊनियां अन्य । येऊं नये जन्म ऐसें करा ॥५॥
सिद्धता न अन्य जन्माची घडावी । इच्छा हे धरावी नित्य मनीं ॥६॥
ईशस्वरुपाची जागृति जोंवरी । जन्म न तोंवरी ध्यानीं असो ॥७॥
ईशविस्मृतीनें अज्ञानावरण । शरीरबंधन तेणें घडे ॥८॥
शरीरसंबंधें विषयसंबंध । तेणें जन्मभोग वारंवार ॥९॥
वासुदेव म्हणे इंद्रियव्यापार । मानितां साचार भवबंध ॥१०॥
२७
इंद्रियांचे कोड पुरवितां ताप । भोगणें त्रिविध प्राप्त होई ॥१॥
वासनांत कामवासना प्रधान । पती-पत्नी मम भाव होई ॥२॥
गृह, क्षेत्र, पुत्र, आप्त, द्रव्यादिक । या ठाईं ममत्व तेणें जडे ॥३॥
अभिमानग्रंथि सुटेल ही जेव्हां । सायुज्यता तेव्हां मानवासी ॥४॥
वासुदेव म्हणे अभिमानग्रंथि । सुटावया युक्ति ऋषभ कथी ॥५॥

२८
हंसरुपी गुरु मीचि परमेश्वर । भक्ति निरंतर करा माझी ॥१॥
तेंवी, सोडूनियां भोगेच्छा सकळ । द्वंद्वेंही अटळ सहन करा ॥२॥
इहपरलोकीं संकटें जीवासी । भोगणें प्राप्तचि माना ऐसें ॥३॥
धरा ज्ञानइच्छा, आचरा आचारा । सदा तीं अव्हेरा काम्य कर्मे ॥४॥
कराल जीं कर्मे अर्पावीं तीं मज । कथागानीं नित्य रमवा चित्त ॥५॥
भक्तांची संगती धरा स्तवूनि तीं मज । बसावें निर्वैर सम शांत ॥६॥
देहगेहांची न धरावी आसक्ति । अध्यात्मविद्याचि अभ्यासावी ॥७॥
घ्राणेंद्रियें मन, आंवरावें नित्य । गुरु - वेदवच सत्य माना ॥८॥
वासुदेव म्हणे पुत्रांसी निमित्त । करुनि, ऋषभ ज्ञान कथी ॥९॥

२९
ब्रह्मचर्यव्रत कर्तव्यपालन । बोलावें भाषण नित्य सदा ॥१॥
सर्वत्र ईश्वरभाव न जोंवरी । ज्ञानाची तोंवरी कांस धरा ॥२॥
समाधीचा नित्य करावा अभ्यास । होई बहु लाभ ऐशा मार्गे ॥३॥
धैर्ये यत्न तेंवी मननाची शक्ति । येऊनियां, ग्रंथिभेद होई ॥४॥
समूळ अज्ञान नष्ट न जोंवरी । साधनें तोंवरी नित्य करा ॥५॥
राजा, पिता, गुरु, प्रजा, पुत्र, शिष्यां । बोधिती हें तयां प्रसन्न मी ॥६॥
न ऐकतां बोध फिरुनि करावा । क्रोध न च यावा अंतरांत ॥७॥
वासुदेव म्हणे सकामप्रवृत्ति - । प्रचार, कदापि न रुचे ज्ञात्या ॥८॥

३०
तात्पर्य, स्वार्थही न कळे अज्ञांसी । तुब्ध ते विषयांसी असती नित्य ॥१॥
अल्पसौख्यास्तव करिती अन्यद्रोह । न कळे पुढील दु:खभार ॥२॥
यास्तव ज्ञात्यानें अज्ञाननिवृत्ति । करावी जनांची महायत्नें ॥३॥
मार्गभ्रष्ट अंधा दावावा जैं मार्ग । सक्तासी असक्त करणें तेंवी ॥४॥
संसारमगरमिठी न सोडवी । तयासी गोसावी म्हणूं नये ॥५॥
नव्हेचि तो गुरु नव्हेचि तो आप्त । माता न दैवत पतीही न ॥६॥
अतर्क्य मी जाणा मूर्तिमंत धर्म । भरतवचन पाळा नित्य ॥७॥
वासुदेव म्हणे ऋषभ पुत्रांसी । म्हणे, भरत माझी मूर्ति ॥८॥

३१
पुत्रहो, चर ते अचेतनाहूनि । श्रेष्ठचि या जनीं ध्यानीं धरा ॥१॥
कृमिकीटांहूनि पश्चादिक श्रेष्ठ । मानव वरिष्ठ तयांहूनि ॥२॥
प्रथम गंधर्व सिद्ध किन्नर ते । वरिष्ठ तयांतें असुर जाणा ॥३॥
तयांहूनि श्रेष्ठ देवांसी गणावें । देवांत मानावें शंकरासी ॥४॥
तयांहूनि ब्रह्मा, विष्णु तया वंद्य । मजलागीं नित्य पूज्य विप्र ॥५॥
पुरातन माझें वेद जें शरीर । रक्षिताती विप्र मुख ते माझें ॥६॥
सत्त्व, शम, दम, सत्य, अनुग्रह । तप, अनुभव, तितिक्षा ते ॥७॥
वासुदेव म्हणे विप्राचे हे गुण । ऋषभ कथन करी प्रेमें ॥८॥

३२
विप्रांलागीं मम भक्ति । हेचि वाटते संपत्ति ॥१॥
धनादिक विषय त्यांसी । भक्तीविण तुच्छ होती ॥२॥
थोरपण त्यांचें ऐसें । मागती न कांहीं मातें ॥३॥
स्वर्ग मोक्षही देईन । जरी जाहलों प्रसन्न ॥४॥
परी कदाही न कांहीं । इच्छा तयांप्रति होई ॥५॥
कदाही न त्यांचें चित्त । स्वार्थइच्छेनें मोहित ॥६॥
स्थिरचर मीचि मानीं । पूजक तो नित्य जनीं ॥७॥
मुख्य कार्य इंद्रियाचें । आराधन व्हावें माझें ॥८॥
वासुदेव म्हणे पाश । भक्तांवांचूनि सकलांस ॥९॥

३३
आत्मज्ञ पुत्रांचें करुनि निमित्त । ऋषभें हा बोध सकळां केला ॥१॥
भक्ति ज्ञान वैराग्यादि निवेदन । सोंपविलें जाण भरतावरी ॥२॥
शतपुत्रांमाजी भरत तो श्रेष्ठ । महा भगवद्भक्त साधुप्रिय ॥३॥
अर्पूनियां राज्य तयासी ऋषभ । सर्वसंगत्याग करुनि गेला ॥४॥
केवळ शरीर राहिलें तयाचें । दिगंबर वेषें निरहंकार ॥५॥
पाचारण तया केलें बहुतांनीं । बधिर तो जनीं परी भासे ॥६॥
वासुदेव म्हणे उन्मत्त कीं जड । भासला पिशाच्च मूक, जनां ॥७॥

३४
घेऊनियां मौन, वनें उपवनें । आश्रमादि स्थानें बहुत हिंडे ॥१॥
जागोजागीं नीच गांजिती तयातें । प्रतिकार त्यांतें न करी कांहीं ॥२॥
मक्षिका गजासी पीडितां तो स्वस्थ । तैसाचि हा शांत सर्वकाळ ॥३॥
सामान्यासी सह्य नव्हते ते क्लेश । दाविती भयास ताडितांही ॥४॥
विष्ठा, मूत्रोत्सर्ग करिताती कोणी । थुंकताती कोणी अंगावरी ॥५॥
पुढती तयाच्या अधोवायुनाद । काढूनि प्रलाप करिती बहु ॥६॥
प्रतिकार परी न करीचि कांहीं । देहदु:ख पाही भासमात्र ॥७॥
अहंममत्याग ऐसा दृढ ज्याचा । वासुदेव त्याचा दास होई ॥८॥

३५
संचार नृपाचा आश्चर्य तें लोकां । मर्यादा न तर्कां-वितर्कांसी ॥१॥
कर चरण ते कोमल तयाचे । भरदार साजे वक्षस्थल ॥२॥
बळकट स्कंध पुष्ट त्याचा कंठ । तेज:पुंज मुख मनोरम ॥३॥
प्रफुल्लकमलदलासम नेत्र । तारका आरक्त आल्हादक ॥४॥
कपोल, नासिका, कर्णही सुबक । अहो गोड हास्य वर्णवेना ॥५॥
नागरिकस्त्रिया उद्दीपित होती । जटा पृष्ठभागीं रुळती बहु ॥६॥
विसंगत ऐसी पाहूनियां कृति । भूतबाधा त्यासी म्हणती कोणी ॥७॥
वासुदेव म्हणे अजगरवृत्ति । स्वीकारुनि अंतीं राव स्वस्थ ॥८॥

३६
यदृच्छालब्ध जें तेंचि सुखें भक्षी । मलमूत्रविधि एका ठाईं ॥१॥
अंगावरी पुटें पडलीं विष्ठेचीं । लोळे तो तेथेंचि परी सौख्यें ॥२॥
ऐकूनि वर्णन न येवो किळस । पसरे सुगंध विष्ठेचा त्या ॥३॥
असेल तैसाचि करी देहधर्म । नव्हतेंचि भान तया कांहीं ॥४॥
योगियांसी मार्ग दावी ऐशापरी । समर्थ तो जरी मोक्षपति ॥५॥
आनंद ते सर्व उपनिषदोक्त । जाहले त्या प्राप्त सहजपणें ॥६॥
सकल पुरुषार्थ सिद्धचि तयाचे । वंदिती तयातें सकल सिद्धि ॥७॥
परी ढुंकूनियां न बघे तयांसी । पात्रता ज्ञात्याची ऐसी थोर ॥८॥
वासुदेव म्हणे ऐशा समर्थाची । कल्पना मूढासी नसे कांहीं ॥९॥


References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP