पंचम स्कंधाचा सारांश

या स्कंधांत अध्याय २६, मूळ श्लोक ६७८, त्यांवरील अभंग १५६



परम विरागी प्रियव्रताच्या ठिकाणीं त्याचा पिता जो मनु त्याच्याप्रमाणें राजाच्या अंगीं आवश्यक असे सर्व गुण होते. त्यामुळें ब्रह्मदेवानें त्याला निष्काम कर्माचें महत्त्व पटवून दिलें, व राज्य करण्यास प्रवृत्त केलें. त्याच्या पृथ्वी प्रदक्षिणेंत, त्याच्या रथाच्या चाकोर्‍यांपासून सप्तद्वीपें व सप्त समुद्र झाल्याचें वृत्त या स्कंधांत आहे. पुढें त्याच्याच वंशांतील ऋषभदेवाची रम्य कथा सांगितली आहे. ऋषभदेवाच्या अद्भुत जीवनाचा विपर्यास करुन, अर्हत राजा पाखंड माजवील असेंही तेथें सांगितलें आहे. ऋषभदेवाला शंभर पुत्र होते. त्यांतील कवि, हरि, इ० नऊ महायोगी होते. व या भरत खंडास ज्याच्यामुळें हें नांव मिळालें तो ‘भरत’ ऋषभदेवानंतर राजा झाला. त्याचें चरित्र अत्यंत महत्वाचें व फारच रम्य आहे. हा भरत दीर्घकाल राज्य केल्यावर शेवटीं वनांत गेला. परंतु तेथें एका परंतुअ तेथें एका मृगशावकावर दया केल्यामुळें त्याला हरिणाचा जन्म आला. त्यानंतर तो एका  त्यानंतर तो एका पुण्यवान्‍ ब्राह्मणाच्या कुळांत ‘जडभरत’ या नांवानें जन्माला आला. पूर्वजन्मस्मृतीमुळें आतां तो कुठेंही आसक्ति न धरतां केवळ ब्रह्मचिंतननिमग्न राहून व्यवहारांत जड मूढवत्‍ राहूं लागला. त्यामुळें त्याच्या आप्त बांधवांनीं त्याच्याकडे दुर्लक्ष केलें. पुढें एकदां रहुगणराजाच्या सेवकांनीं जडभरताला पालखीला भोई म्हणून वेठीला धरलें, तेव्हां जडभरत पायाखालीं कीडमुंगी मरुं नये म्हणून पालखी वाहतांना पायखाली पाहून चालूं लागला. त्यामुळें हिसके बसल्यानें राजाला त्याचा राग आला. त्यावेळचा त्याद दोघांचा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. या संवादांत जडभरतानें राजाला ज्ञानाचा उपदेश केला आहे. त्यांत भवबंधनाचें जें भरतानें वर्णन केलें आहे तें साधकास मननीय वाटेल. भरताच्या वैराग्याचें शुक महामुनी देखील मुक्त कंठानें वर्णन करीत आहेत. या नंतर भरताच्या वंशाचें वर्णन, भुवनकोश आणि जंबुद्वीपाचें वर्णन, गंगेची उत्पत्ति, त्या त्या खंडाचें वर्णन व तेथील उपास्य निवेदन, सप्तद्वीपें, सप्तद्वीपांतर्गत पर्वत इत्यादि सांगितलें आहे. पुढें सूर्याचें भ्रमण, ग्रह व त्यांचीं शुभाशुभ फलें, ध्रुवमंडल, चंद्रमंडल, नक्षत्रमंडल व इतर ग्रहमंडलें सांगितलीं आहेत. पुढें सप्त पाताळें, शेषवर्णन आणि तामिस्त्रादि अठ्ठावीस नरकांचें वर्णन करुन हा स्कंध संपविला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP