स्कंध १ ला - अध्याय १८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१२२
सूत म्हणे ऐसा परीक्षिती थोर । विप्रशाप घोर मानीतसे ॥१॥
तयाच्या राज्यांत नव्हता अधर्म । असमर्थ दीन कलि तेथें ॥२॥
पुण्यवंता काय करील बापुडा । जाणूनि तयाचा वध न केला ॥३॥
कलीमाजी पुण्यकर्में संकल्पेंचि । पावती सिद्धीसी महिमा ऐसा ॥४॥
साक्षात्‍ क्रियेविण सिद्धि न दुष्कर्मा । सिध्दान्त हा आणा नित्य ध्यानीं ॥५॥
वासुदेव म्हणे कथा हे पावन । करी निवेदन सूत विप्रां ॥६॥

१२३
सूताप्रति मुनि म्हणती हो दीर्घायु । उपकार गाऊं केंवी तुझे ॥१॥
पाजिसी तूं आम्हां ईशकथामृत । येई अमरत्व तेणें आम्हां ॥२॥
अल्पही वैगुण्यें कर्मा विफलता । यास्तव दक्षता सत्रामाजी ॥३॥
तेणें धूम्रव्याप्त देह हे आमुचे । येई कथामृतें धीर आम्हां ॥४॥
साधुसमागमीं जावा प्रति क्षण । कथा हे ऐकून वाटे आम्हां ॥५॥
स्वर्ग मोक्षाहूनि संतसंग श्रेष्ठ । तेथ काय पाड वैभवाचा ॥६॥
शिव ब्रह्यातेंही अंत न जयाचा । कथीं त्याची कथा आम्हांप्रति ॥७॥
वासुदेव म्हणे सूता भागवत । महत्त्व समस्त पुशिती मुनि ॥८॥

१२४
सूत म्हणे वंद्य विप्रहो, मी हीन । जाहलों पावन आजी वाटे ॥१॥
अनंत अपार भगवंतलीला । पावन विश्वाला असतील ज्या ॥२॥
निवेदितों यथाज्ञान त्या तुम्हांसी । असमर्थ माझी मती परी ॥३॥
नभसंचारासी पक्षी असमर्थ । परी यथाशक्य भ्रमण करी ॥४॥
तेंवी यथाबोध ईश्वराचे गुण । गाऊनियां धन्य होईन मी ॥५॥
वासुदेव म्हणे गुण ते हरीचे । पामर मी कैसे गाऊं तरी ॥६॥

१२५
एकदां नृपाळ मृगयेसी जातां । काननीं हिंडतां श्रांत झाला ॥१॥
होऊनि तृषार्त धुंडितां तें वन । शमीकआश्रम पाहियेला ॥२॥
शमीक ध्यानस्थ झोते आश्रमांत । अंगावरी एक मृगाजिन ॥३॥
तुर्यावस्थेमाजी होतें चित्त लीन । मुनीसी पाहून वदला राव ॥४॥
म्हणे मुनीश्वरा, द्या मज उदक । याचना ते व्यर्थ नृपाळाची ॥५॥
विवेकहीनचि तदा परीक्षित । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥६॥

१२६
सत्कारभयानें केलें म्हणे ढोंग । तृणेंही स्वागत केलें नाहीं ॥१॥
पादोदक जया विप्र ब्राह्मणांचें । मति हे तयातें क्रोधें होई ॥२॥
तत्रस्थित एक मृतसर्प चापें । मुनीच्या गळ्यातें गुंडाळिला ॥३॥
ढोंगी हा भयानें होईल विव्हल । मानूनि तें स्थल त्यजूनि गेला ॥४॥
शृंगी शमीकाचा पुत्र पुण्यवंत । क्रीडामग्नचित्त होता वनीं ॥५॥
सवंगडे कोणी कथी तया वृत्त । होई खिन्नचित्त वासुदेव ॥६॥

१२७
ऐकूनि तें वृत्त शृंगी पावे क्रोध । म्हणे हे उन्मत्त होती नृप ॥१॥
रक्षावें जयांसी गांजितो हा तयां । उरला न या ठाया शास्ता कोणी ॥२॥
‘दावितों मी आतां’ बोलूनियां ऐसें । आचमन वेगें करी बाळ ॥३॥
पित्याच्या कंठांत घातला हा सर्प । तयासी तक्षक दंश करो ॥४॥
सप्तम दिनीं या वचनाची पूर्ती । होवो ऐसी उक्ति वदला क्रोधें ॥५॥
पुढती बालक आश्रमी पातला । पित्याच्या पाहिला सर्प कंठीं ॥६॥
दु:खाकुलें तेणें मांडिलें रुदन । येई देहभान मुनींप्रती ॥७॥
वासुदेव म्हणे वृत्तान्त कळतां । शमीकाच्या चित्ता खेद बहु ॥८॥

१२८
म्हणे मूढा, ऐशा क्षुल्लक कारणें । नृपासी दंडिलें क्रूरपणें ॥१॥
अजापालहीन अजा नष्ट होती । नृपाविण तैसी प्रजा नष्ट ॥२॥
नृपनाशें जीं जीं पातकें होतील । मस्तकीं येतील आपुल्या तीं ॥३॥
अराजक जनीं माजतां अधर्म । जाती-रीतिकर्म सुटूनि जाई ॥४॥
सूर्यासम राव परीक्षिती श्रेष्ठ । नव्हे या शापास योग्य कदा ॥५॥
वासुदेव म्हणे शमीक देवासी । प्रार्थूनियां भाकी क्षमादान ॥६॥

१२९
असूनि सामर्थ्य न करी प्रतिकार । तया भक्त थोर म्हणती मुनि ॥१॥
क्षमूनि रायासी, पुत्राचा अपराध । पाहूनियां खेद मानी ज्ञाता ॥२॥
सूत म्हणे सुखदु:ख देतां कोणी । सुखी दु:खी मनीं न होती जे ॥३॥
स्वानंदनिमग्न परी जे सर्वदा । तेचि साध ऐसा बोध घ्यावा ॥४॥
वासुदेव म्हणे शमीकाची क्षमा । उद्धरील जनां आचरितां ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP