स्कंध १ ला - अध्याय १६ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१०६
सूत म्हणे ऐकें शौनका, पुढती । राज्य परीक्षिती करी सौख्यें ॥१॥
महाभक्त शौर्यधैर्यादि सद्गुण । मूर्तिमंत जाण परीक्षित ॥२॥
मातुल उत्तरकन्या, ‘इरावती’ । पुण्यवती त्याची भार्या होई ॥३॥
जनमेजयादि चार पुत्र तया । अर्पी कृपाचार्या ऋत्विजत्व ॥४॥
गंगातटीं करी अश्वमेध तीन । इंद्रादि प्रगटून हवि घेती ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसा पुण्यवंत । राजा परीक्षित राज्य करी ॥६॥
१०७
दिग्विजयार्थ तो जातां एका काळीं । मार्गी पाही कली शूद्ररुपें ॥१॥
धेनुवृषभांसी हाणी तो लत्तेनें । निग्रह नृपानें केला त्याचा ॥२॥
शौनक विचारी राजचिन्हधारी । कलीचा न करी वधे केंवी ॥३॥
वृन्तान्त्त तो कथीं भक्तभगवंत - । लीला, कांहीं तेथ असे तरी ॥४॥
वृथा वल्गना तो आयुष्याचा नाश । ऐके हा सिद्धान्त वासुदेव ॥५॥
१०८
आरंभिलें सत्रकार्य । आम्हां नसे मृत्युभय ॥१॥
मृत्यु बोलला आम्हांसी । पशुवधचि या सत्रीं - ॥२॥
करीन, इतरां न भय । कथा गातसों निर्भय ॥३॥
स्वस्थ बैसविलें एथें । कथाश्रवणार्थ मृत्युतें ॥४॥
वासुदेव म्हणे शक्ति । प्रगट करी ईश्वरभक्ति ॥५॥
१०९
शक्ति ते अत्यल्प तैसेंचि तें ज्ञान । अल्पायुष्य जाण मानवासी ॥१॥
तेंही अर्ध जाई निद्रेमाजी व्यर्थ । यास्तव भगवंत आठवावा ॥२॥
ऐसी सार्थकाची त्यजूनिया वाट । खटाटोप व्यर्थ मनुज करी ॥३॥
वासुदेव म्हणे शौनकाची वाणी । सुस्पष्ट ऐकुनि वदला सूत ॥४॥
११०
शौनका, राज्यांत प्रवेशला कलि । ऐसी कानीं आली वार्ता यदा ॥१॥
तदा परीक्षित होऊनि सहर्ष । होई रथारुढ ससाहित्य ॥२॥
भद्राश्च भारत केतुमाल आदि । जिंकूनि देशांसी पुढती जाई ॥३॥
पूर्वजांचें पुण्यवृत्त जागोजागीं । ऐकूनियां मार्गी होई तुष्ट ॥४॥
केवळ भक्तीनें वश होऊनियां । श्रीकृष्ण पांडवां रक्षी ऐसें ॥५॥
ऐकूनि नृपाच्या चित्तीं कृष्णप्रीति । उपजे अधिकचि स्वाभाविक ॥६॥
वासुदेव म्हणे एकदां अद्भुत । घडला वृत्तान्त ऐका काय ॥७॥
१११
धर्मवृषभ तो चरणें एकाचि । चाले धेनुरुपी पृथ्वी दु:खी ॥१॥
पाहूनि पृथ्वीसी पुशी धर्मवृष । कां वो ऐसें दु:ख तुजलागीं ॥२॥
वियोग आप्तांचा अथवा मम दु:ख । पाहूनि चित्तांत खिन्न होसी ॥३॥
अथवा पुढती शूद्रांचेंचि राज्य । लुप्त वेदमार्ग हेंचि दु:ख ॥४॥
दुष्काळ पुढती जाणूनि हा खेद । करिसी तूं सांग कां भूदेवी ॥५॥
वासुदेव म्हणे भूधेनूसी धर्म । करीतसे प्रश्न पुढती ऐका ॥६॥
११२
कलिप्रवृत्तीनें पती-पत्नी-पिता । पुत्र आणि माताकलहवृद्धि ॥१॥
कुमार्गप्रवृत्त विप्र वाग्देवीचा । करितील साचा दुरुपयोग ॥२॥
अथवा लोभानें नीचसेवारत । होतील सद्विप्र हेंचि दु:ख ॥३॥
अधार्मिक राज्यें उद्ध्वस्तचि राष्ट्रें । होतील या दु:खें रडसी काय ? ॥४॥
भक्ष्याभक्ष्य पेयापेयांच्या मर्यादा । संपूनि लालसा वाढतील ॥५॥
आहारनिद्रादि सहज प्रवृत्ति । वाढतील हेचि भीति काय ? ॥६॥
अथवा श्रीकृष्ण गेला निजधामा । म्हणूनि रुदना करिसी सांगें ॥७॥
वासुदेव म्हणे धर्माची ते वाणी । ऐकूनियां भूमि वदली ऐका ॥८॥
११३
भूमि म्हणे धर्मा, जाणसी तूं सर्व । परी प्रश्नास्तव कथितें ऐकें ॥१॥
तप, शौच, दया, सत्य चतुष्पादीं । होतासी तूं सुखी कृष्णाश्रयें ॥२॥
संतोषादि सर्व सद्गुणमंडित । गेला भगवंत निजधामासी ॥३॥
लोकांमाजी होई कलीची प्रवृत्ति । दु:ख अंतरासी बहुत तेणें ॥४॥
देव पितरादि वर्ण आश्रमहि । सर्वांस्तव पाहीं दु:खित मी ॥५॥
वासुदेव म्हणे सद्गुणांची वृद्धि । कृपा श्रीहरीची इतर कलि ॥६॥
११४
धर्मा, श्रीहरीचें काय वर्णूं भाग्य । सेवे पदांबुज लक्ष्मी, स्वयें ॥१॥
चरणचिन्हें तीं शोभा होती मम । धनधान्यसंपन्न होतें तदा ॥२॥
नाशकाल येतां गर्विष्ठ मी झालें । त्यागूनियां गेले देव मज ॥३॥
हरिला मम भार अव्यंगता तुज । दिधली तो वियोग केंवी साहूं ॥४॥
ऐसा तो संवाद ऐके परीक्षिति । निवेदी पुढती वासुदेव ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2019
TOP