स्कंध १ ला - अध्याय १७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


११५
सरस्वतीतीरीं धर्म-पृथ्वीचा हा । संवाद चालतां तया स्थानीं ॥१॥
परीक्षिति येतां राजचिन्हांकित । ताडी एक शूद्र तयां पाही ॥२॥
शुभ्रवर्ण वृष थरथरां कांपे । मूत्र उर्त्सगातें करी भयें ॥३॥
लत्ताप्रहारें ती दीन होई गाय । अश्रुधारा हाय नेत्रीं तिच्या ॥४॥
पाहूनि तें राव ओढी निज चाप । कोण रे तूं शूद्र राजवेषें ॥५॥
दुर्बलां ताडन करिसी क्रूरपणें । नृपाळवेषानें छळिसी जनां ॥६॥
वासुदेव म्हणे अन्याया शासन । करी तोचि जाण क्षत्रिय खरा ॥७॥

११६
बोलूनि कलीसी वृषभासी राव । म्हणे मज देव भाससी तूं ॥१॥
एकाचि चरणें चालसी तूं कैसा । लवहीन आतां करीं दु:ख ॥२॥
रक्षिलें पृथ्वीसी पौरववीरांनीं । तेथ अन्य कोणी दु:खी नसे ॥३॥
धेनूतें नृपाळ म्हणे वध याचा । तुम्हांस्तव आतां करीन मी ॥४॥
अपराधहीन जनां दु:ख जेथ । ऐश्वर्यविनाश नरक नृपा ॥५॥
कोणी हे वृषभा, दुखविलें तुज । निग्रहानुग्रह धर्म माझा ॥६॥
वासुदेव म्हणे परीक्षितीप्रति । उत्तरें धर्माचीं ऐका आतां ॥७॥

११७
कुलोचित राया, भाषण हें तव । कोण दु:खमूळ समजेनाचि ॥१॥
वितंडवादानें मोह पडे आम्हां । म्हणती कोणी आत्मा मित्र-शत्रु ॥२॥
वर्णिती ग्रहांसी कोणी, कोणी कर्मा । स्वभावचि अन्यां मूळ वाटे ॥३॥
लीला ईश्वराची कथिताती कोणी । स्वयेंचि तूं मनीं चिंती राया ॥४॥
वासुदेव म्हणे ऐकूनि ते वाणी । आश्चर्यचि मनीं नृपाळासी ॥५॥

११८
परीक्षिती म्हणे वृषभा, तू धर्म । वाटे हें वचन ऐकूनियां ॥१॥
सर्वज्ञ असूनि कथिसी न नाम । शास्त्रातें स्मरुन निश्चय हा ॥२॥
पापी तेवीं नाम उच्चारी जो त्याचें । होई उभयांतें अघोगति ॥३॥
शास्त्रवचन हें धर्मा जाणतोसी । अगाध हरिची अथवा माया ॥४॥
विस्मयानें तप, कुसंगाने शौच । दयेचा विनाश उन्मादानें ॥५॥
पाद तव तीन नामशेष झाले । चतुर्थ उरलें सत्य मात्र ॥६॥
वासुदेव म्हणे सत्यही असत्यें । नष्ट करुं ऐसें इच्छी कली ॥७॥

११९
अवतरुनियां दुष्टांचा विनाश । करुनि पृथ्वीस तोषविलें ॥१॥
गोमुखें तें अद्य ऐकुनि भविष्य । दु:ख अंतरांत वाटे बहु ॥२॥
बोलूनियां ऐसें कलिविनाशार्थ । उपसूनि शस्त्र सिद्ध राव ॥३॥
कलि तदा येई शरण विप्रासी । यास्तव तयासी अभय लाभे ॥४॥
परी कलीप्रति आज्ञा करी राव । न करीं वास्तव्या मम राज्यांत ॥५॥
वासुदेव म्हणे कलीचा प्रभाव । कथीतसे राव श्रवण करा ॥६॥

१२०
राजदेहामाजी प्रवेशतां कलि । लोभ असत्यहि, येई तेथ ॥१॥
चौर्य, दुर्जनत्व, कापट्य, कलह । ढोंग, अवैभव, धर्मत्याग ॥२॥
मागोमाग त्याच्या गोळा होती, तेथ । प्रजा धर्मभ्रष्ट होई तेणें ॥३॥
ब्रह्मावर्तदेशीं यास्तव कलीचा ॥ संचार न कदा व्हावा म्हणे ॥४॥
कलि म्हणे राया, करिसील आज्ञा । करीन त्या स्थाना वास्तव्य मी ॥५॥
वासुदेव म्हणे द्यूत, मद्य, स्त्रिया । हिंसा, हेम तया स्थानें दावी ॥६॥

१२१
अनृत, उन्माद, काम, तैं क्रूरत्व । सर्वही एकत्र कनकामाजी ॥१॥
यास्तव ऋषीहो, आसक्ति या ठाईं । ठेवूं नये पाहीं कदा सुज्ञें ॥२॥
राजा, गुरु आदि श्रेष्ठांनिं कदापि । न धरावी आसक्ति सुवर्णांची ॥३॥
रायानें पुढती धर्म चतुष्पाद । करितां पृथ्वीस मोद वाटे ॥४॥
सूत म्हणे त्याचि राज्यामाजी तुम्ही । सत्र आरंभूनि बैसलांती ॥५॥
वासुदेव म्हणे चतुष्पाद धर्म । जाणूनियां मर्म आचरावा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP