स्कंध १ ला - अध्याय १४ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
९२
पुढती धर्मानें श्रीकृष्णभेटीसी । धाडिलें पार्थासी कुशल वृत्ता ॥१॥
तत्र पार्थाप्रति गेले बहुमास । धर्माच्या चित्तास चिंता बहु ॥२॥
गजपुरीं होती दुश्चिन्हें त्या काळीं । मर्यादा सोडिली षड्ऋतूंनीं ॥३॥
मतिभ्रष्टजनवृत्ति अनावर । असत्य सर्वत्र भरुनि जाई ॥४॥
व्यवहार वक्र, मैत्री शाठ्ययुक्त । कलह सर्वत्र आप्तांमाजी ॥५॥
कन्याविक्रय तैं मातृपितृद्वेष । ब्रह्मवादी शूद्र, विप्र मूढ ॥६॥
वासुदेव म्हणे भीमाप्रति धर्म । बोलला वचन पाहूनि हें ॥७॥
९३
भीमा, सप्तमास जाहले पार्थासी । येई न अद्यापि, भय वाटे ॥१॥
नारदोक्त घोर प्रसंग पातला । वाटतें या काला अंतरांत ॥२॥
श्रीकृष्णप्रसादें आम्हां सर्व लाभ । पहा हे उत्पात घोर होती ॥३॥
भौम, दिव्य तेंवी शारीरदुश्चिन्हें । पाहूनियां श्वानें रडली मज ॥४॥
घोर घूकशब्दें हृदय विदीर्ण । अचल चलन पावती हे ॥५॥
क्षोभल्या सरिता कांपली धरणी । धेनूंच्या नयनीं अश्रू येती ॥६॥
वासुदेव म्हणे धेनु न देवता । रडताती ऐसा घोर काळ ॥७॥
९४
पाहूनि हे घोर उत्पात श्रीकृष्ण । आम्हांसी त्यजून गेला वाटे ॥१॥
सौभाग्यविहीन वाटे वसुंधरा । कोठें शार्ड्गधरा पाहूं आतां ॥२॥
इतुक्यांत पार्थ पातला त्या ठाईं । अश्रुपूर येई नयनीं त्याच्या ॥३॥
ठेविलें मस्तक धर्माच्या चरणीं । शब्द न वदनीं उमटे कांहीं ॥४॥
वासुदेव म्हणे पाहूनि तें धर्म । बोलला वचन धरुनि धीर ॥५॥
९५
पार्था, मधु, भोज, दाशार्ह सात्वत । वृष्णि तैं अंधक आप्त सर्व ॥१॥
क्षेम असती कीं शूर पितामह । मातुल, वसुदेव देवक्यादि ॥२॥
उग्रसेन वृद्ध असे कीं सुखरुप । अक्रूर जय्म्त सारणादि ॥३॥
यादवप्रभु तो श्रेष्ठ बलराम । वसे कीं रे क्षेम सांगें मज ॥४॥
प्रद्युम्न, अनिरुद्ध तैसे ते सांबादि । तेंवी उद्धवादि यादववीर ॥५॥
गोब्राह्मणांचा प्रतिपालकर्ता । गोविंद भक्तांचा साह्यकर्ता ॥६॥
‘सुधर्मासभेसी’ शोभवी कीं नित्य । यादवां महत्त्व जया योगें ॥७॥
वासुदेव म्हणे धर्म ऐशापरी । अर्जुनासी करी प्रश्न बहु ॥८॥
९६
धर्म म्हणे पार्था, कां रे न बोलसी । अस्वस्थ कां ऐसी वृत्ति तव ॥१॥
काय अपमान यादवांनीं केला । कठोर बोलला काय कोणी ॥२॥
याचकांची इच्छा न करवे कीं पूर्ण । शरणार्थी रक्षण करवेना कीं ॥३॥
अगम्यगमन अथवा पराभव । क्षुद्रवीरें काय केला तुझा ॥४॥
योग्ग्यांसी त्यागूनि एकाकी भोजन । घडलें, कीं अन्य घडलें कांहीं ॥५॥
अर्जुना, न कांरे बोलसी तूं कांहीं । प्राण सर्वांचाही श्रीकृष्ण जो ॥६॥
ध्यातोसी तूं नित्य जयासी अर्जुना । तेणें काय आम्हां त्यागियेलें ॥७॥
वासुदेव म्हणे पार्थाचा उद्वेग । पाहूनि धर्मास खेद वाटे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2019
TOP