स्कंध १ ला - अध्याय २ रा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१०
ऐकूनियां प्रश्न आनंदित सूत । म्हणे व्यासां शुक त्यजूनि जाई ॥१॥
सर्वसंगपरित्यागी योगिश्रेष्ठ । व्यासांसी वियोग न सहे त्याचा ॥२॥
पुत्रा, पुत्रा, ऐशा मारिती ते हांका । वृक्ष तदा व्यासां म्हणती ओ, ओ ॥३॥
सर्वत्र मी ऐसें सुचविलें शुकें । सर्वांतर्यामीतें नमन तया ॥४॥
संसृतिसागरीं बुडत्या जनांसी । शुकें भागवती श्रेष्ठ कथा - ॥५॥
कथिली, तें सार सर्व पुराणांचें । गाढ तमीं यातें दीप जाणा ॥६॥
वासुदेव म्हणे प्रज्वाळिला जेणें । दीप त्या शुकातें सूत नमी ॥७॥
११
बदरीवनींचे नरनारायण । शारदाचरण तेंवी वंदू ॥१॥
भगवान् व्यासां वंदूनि या ग्रंथा । आरंभीन आतां सूत म्हणे ॥२॥
कथा जे अंतरीं ऐकावी हा हेतु । तेणें भवसिंधु तरती जन ॥३॥
वासुदेव म्हणे कृष्णकथासेतु । नेई भवसिंधुपार लोकां ॥४॥
१२
निष्काम निश्चळ अधोक्षजीं भक्ति । करी जे चित्तासी सुप्रसन्न ॥१॥
उपजवी ऐसी भक्ति तोचि धर्म । कथेवरी प्रेम उपजो धर्मे ॥२॥
उपजे न भक्ति तरी धर्म व्यर्थ । धर्मार्थचि अर्थ, कामार्थ न ॥३॥
मोक्षार्थचि धर्म, नव्हे अर्थास्तव । अर्थ धर्मास्तव, भोगार्थ न ॥४॥
प्राणरक्षणार्थ विषय सेवावे । कोड न पुरवावे इंद्रियांचे ॥५॥
चित्तशुद्धिद्वारा व्हावें तत्वज्ञान । यास्तवचि प्राण संरक्षावे ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वकाल ध्येय । ध्यानीं धरी होय कृतार्थ तो ॥७॥
१३
सर्वत्र सर्वचि ईश्वर हें तत्व । ब्रह्म भगवंत परमात्मा तें ॥१॥
अनासक्तकर्म, वेदान्तश्रवण । घडतां होई ज्ञान सवैराग्य ॥२॥
तेणें दृढभक्ति वसे अंतरांत । तदाचि हें तत्व प्रगटे तेथें ॥३॥
यास्तव विहित कर्मे ईशप्रेम । उपजे तैं धर्म घडला जाणा ॥४॥
जाणूनि स्वधर्म आचरुनि सदा । भजावें गोविंदा, घ्यावें गावें ॥५॥
वासुदेव म्हणे तुटतां बंधन । हरिगुणगान सकलां रुचे ॥६॥
१४
तीर्थयात्रा, संतशुश्रूषा विश्वास । वेदशास्त्रीं नित्य वसे जरी ॥१॥
तरीच उपजे हरिकथा प्रेम । जेणें नारायण हृदयीं वसे ॥२॥
समूळ उच्छेद करी तो रिपूंचा । भक्तीसी दृढता येई तेणें ॥३॥
ऐसा विशुदात्मा सर्वसंगत्यागें । अंतर्बाह्य रंगे आत्मरंगीं ॥४॥
अहंवृत्तिरुप तुटे हृदयग्रंथि । सर्व नष्ट होती संशय ते ॥५॥
सहजचि सर्व कर्मांचा तैं क्षय । करिती यास्तव भक्ति ज्ञाते ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तीचा महिमा । सयुक्तिक जाणा ऐशापरी ॥७॥
१५
त्रिगुणातीत पर पुरुष सांख्यांचा । आश्रयें मायेच्या सृष्टि रची ॥१॥
सत्व, रज, तमें विष्णु, ब्रह्मा, शिव । विष्णु सत्वमय मोक्षकारी ॥२॥
काष्ठाहूनि धूम, धूमाहूनि वन्हि । जेंवी श्रेष्ठ जनीं तैसेचि हें ॥३॥
सत्वगुणें घडे ब्रह्मसाक्षात्कार । तेणेंचि तो थोर गुणांमाजी ॥४॥
यास्तव तामस राजस देवांत । सात्विक तो श्रेष्ठ अधोक्षज ॥५॥
धनार्थ पितर, भूतें ऐश्वर्यार्थ । जनीं सुपुत्रार्थ प्रजापती ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णभक्ति श्रेष्ठ । जाणा मुक्तिप्रद निर्हेतुकी ॥७॥
१६
वेदें वासुदेवप्राप्ति । यज्ञ वासुदेवार्थचि ॥१॥
तप, योग, क्रिया सर्व । करणें वासुदेवास्तव ॥२॥
वासुदेवास्तव ज्ञान । वासुदेवास्तव धर्म ॥३॥
परमगति वासुदेव । अन्य नुरे ‘वासुदेव’ ॥४॥
१७
व्यक्ताव्यक्तरुप मायेचा आश्रय । करुनियां, विश्व रचिलें ईशें ॥१॥
त्रिविध निर्मूनि वस्तु त्यांत शिरे । त्रिविध भासलें रुप तेणें ॥२॥
गुणामाजी लिप्त नसे तो अनंत । काष्ठासम रुप अग्नीचें जैं ॥३॥
प्रवेशूनि भूतांमाजी तो भूतात्मा । स्वयेंचि आपणा उपभोगी तो ॥४॥
सत्वाभिवृद्धीनें संरक्षावे जन । ऐसें नारायण इच्छी स्वयें ॥५॥
इंद्र राम कृष्ण तेंवी वराहादि । रुपें, स्वभक्तांसी रक्षीतसे ॥६॥
वासुदेव म्हणे भिन्न भिन्न रुपें । धरुनि अनंतें खेळ केला ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2019
TOP