स्कंध १ ला - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


७५
द्वारावतीमाजी प्रवेशतां हरि । पांचजन्य फुंकी दिव्य शुभ्र ॥१॥
आरक्त ओष्ठ ते कमळें भासती । हंसचि अंबुजीं पांचजन्य ॥२॥
नादें त्या द्वारकानिवासी यादव । स्वागतार्थ धांव घेती वेगें ॥३॥
सन्मानार्थ रत्नपात्रें वस्त्रें देती । दीप ते भासती सूर्यासम ॥४॥
म्हणती तूं देवा काळाचाही काळ । आमुचे सकळ आप्त तूंचि ॥५॥
कृपाकटाक्षें तूं पाहसी आम्हांतें । भाग्य तें आमुचें अंबुजाक्षा ॥६॥
देवा त्वद्वियोग न सहे आम्हांसी । एकेक क्षणही युग भासे ॥७॥
वासुदेव म्हणे प्रसन्न माधव । नगरीं अपूर्व प्रवेशला ॥८॥

७६
गुढया तोरणें विचित्र । उभारिती घरोघर ॥१॥
ध्वज असंख्य आकाशीं । आच्छादिती भास्करासी ॥२॥
सडा कुंकुमाचा मार्गी । अंगणीं तैं जागोजागीं ॥३॥
फुलें रांगोळ्या अक्षता । दूर्वा पल्लवांची शोभा ॥४॥
इक्षुदंड पुष्पें फळें । उदक कलश द्वारीं ठेले ॥५॥
धूपदीपें सुगंधित । नगर अवघें सुशोभित ॥६॥
वासुदेव म्हणे ज्ञाते । जाती सामोरे प्रभूतें ॥७॥

७७
उग्रसेन वसुदेव बलराम । अक्रूर प्रद्युम्न सांबादिक ॥१॥
हर्षभरें एक सालंकृत गज । घेऊनियां रथ करिती सिद्ध ॥२॥
वारांगना नट-नर्तक मागध । कृष्णलीला गात पुढती जाती ॥३॥
वंदनालिंगन करस्पर्श कोणा । अवलोकूनि कोणा, कोणा हास्य ॥४॥
कोणा वरदान, कोणासी भाषण । करुनि श्रीकृष्ण तोष देई ॥५॥
वसुदेवादि ते अंत्यजापर्यंत । भेट यथायोग्य घेती सुखें ॥६॥
वासुदेव म्हणे वंदूनि विप्रांसी । श्रीकृष्ण प्रासादीं प्रवेशला ॥७॥

७८
यादवांसी घडे दर्शन हें नित्य । परी ते अतृप्त सर्वकाल ॥१॥
सर्वदा श्री वसे जयाच्या सन्निध । मदनलज्जित रुपें ज्याच्या ॥२॥
अवयवीं ज्याच्या देवांची बसती । कैसी होई तृप्ती दर्शनें त्या ॥३॥
सभोंवार पुष्पें तेंचि तारांगण । वनमाला दोन इंद्रचापें ॥४॥
चामरें ते जणु पूर्णचंद्र । छत्र दीप्तिमान सूर्यचि तें ॥५॥
विद्युल्लतेसम शोभे पीतांबर । मेघ-कृष्णचंद्र, सम ऐसे ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा दीप्तिमंत । वंदी सदनांत मातांप्रति ॥७॥

७९
अंत:पुरामाजी पुढती प्रवेशे । सहस्त्रांवधि ते प्रासादचि ॥१॥
सतीधर्मे स्त्रिया विलासविहीन । स्वागत उठूनि करितीं प्रेमें ॥२॥
सानंद सलज्ज भेटल्या हरीसी । आनंदाश्रु नेत्रीं भरले त्यांच्या ॥३॥
नववसूहूनी श्रीकृष्णचरण । नित्य त्यांचें मन आकर्षिती ॥४॥
चंचलही लक्ष्मी स्थिर होई जेथें । स्थैर्य इतरांतें सहज कां न ॥५॥
भूभाहरण केलें परस्पर । आसक्त अंतर नव्हतें कोठें ॥६॥
सु:ख-दु:ख होतां बुद्धीसी न आत्मा । विकृत श्रीकृष्णा विषय तेंवी ॥७॥
वासुदेव म्हणे अज्ञानें त्या स्त्रिया । मानिती माधवा विषयाधीन ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP