स्कंध १ ला - अध्याय ३ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१८
विश्वोत्पत्तिहेतु धरुनि विराट । स्वरुपें भगवंत प्रगटला ॥१॥
महतत्व अहंकार तैं तन्मात्रा । रुप त्याचें कला षोडशही ॥२॥
प्रलयांत सर्वं होता जलमय । करी वासुदेव शयन तेथें ॥३॥
नाभींतूनि त्याच्या प्रगटला ब्रह्मा । निर्मी जो भुवना चतुर्दश ॥४॥
सहस्त्रशीर्षादि वर्णन तयाचें । सकलावतारांचे मूळ तेंचि ॥५॥
याचिरुपीं होती अवतार लीन । पातला होऊन कुमार हा ॥६॥
नैष्ठिक पाळिलें ब्रह्मचर्य यांनीं । सन्मार्ग हा जनीं स्थापावया ॥७॥
वासुदेव म्हणे अवतार प्रथम । कुमार होऊन आला देव ॥८॥

१९
रसातळीं जातां भूमि नारायण । वराह होऊन पुढती आला ॥१॥
पंचरात्रागम कथिला नारदें । तृतीय हें साचें भगवद्रूप ॥२॥
नारायणरुपें चतुर्थावतार । केलें तप घोर शांतीस्तव ॥३॥
सांख्यशास्त्र लुप्त होतांचि कपिल । होऊनि उद्धार करी त्याचा ॥४॥
अत्रि-अनसूयापुत्र दत्तात्रेय । होऊनि केशव पुढती येई ॥५॥
अलर्कादिकांचा तोचि ज्ञानदाता । वासुदेव त्याचा दीन दास ॥६॥

२०
ऋचि आकूतीचा यज्ञ नामें पुत्र । सप्तम अवतार यज्ञार्थ तो ॥१॥
परमहंसाश्रम दाविला ऋषभें । झाला नृप स्वांगे नवम पृथु ॥२॥
औषधिदोहनें अवतार हा श्रेष्ठ । पुढती मत्स्यरुप चाक्षुषांत ॥३॥
समुद्रमंथनीं घेई कूर्मरुप । धन्वंतरी देख द्वादश तो ॥४॥
त्याचिवेळीं मोह पाडाया दैत्यांसी । मोहिनी रुपेंसी प्रगटे देव ॥५॥
पुढती नृसिंहरुपें प्रगटला । वामन जाहला देवांस्तव ॥६॥
वासुदेव म्हणे विप्ररक्षणार्थ । जमदग्निपुत्र रुप घेई ॥७॥

२१
पराशर - सत्यवतीसुत व्यास । दावीतसे मार्ग मंदांप्रति ॥१॥
राजकुळामाजी पुढती रामचंद्र । कृष्ण बलभद्र पुढती होई ॥२॥
एकोनविंशति विंशतिसंख्यांक । अवतार श्रेष्ठ जाहले हे ॥३॥
बुद्धिविभ्रमार्थ असुरांची तो बुद्ध । होईल हें वाक्य ध्यानीं असो ॥४॥
कलीमाजी नृप तस्करांसमान । प्रजेसी लुटून धन घेतां - ॥५॥
कल्किरुपधारी होईल केशव । वंदी वासुदेव तयाप्रति ॥६॥

२२
सरोवरांतूनि पाट जे असंख्य । तैसेचि बहुत अवतार हे ॥१॥
वसिष्ठ,  मनु तैं इंद्रादिक देव । जाणावे ते सर्व अवतारचि ॥
अंशावतार ते, श्रीकृष्ण तो पूर्ण । करिती रक्षण सज्जनांचें ॥३॥
प्रात:सायंकाळीं अवताररहस्य । गातील तयांस मोक्षलाभ ॥४॥
वासुदेव म्हणे अवतारलीला । प्रिय श्रीहरीला सर्वकाल ॥५॥

२३
अरुप आत्म्याचें पृथक्‍ पृथक्‍रुप । भासतसे देख मायागुणें ॥१॥
सर्वद्रष्टा आत्मा रुपादि विहीन । भासवी अज्ञान रुप तया ॥२॥
वायुस्थ तो मेघ नभामाजी भासे । अथवा वायूतें सुगंध जैं ॥३॥
आरोप हे जैसे तैसा आत्म्यावरी । आरोप अंतरीं जाणा सर्व ॥४॥
आत्म्याहुनी जीव गुणसंगें भिन्न । भक्तिज्ञानहीन भ्रमतो भवीं ॥५॥
वासुदेव ह्मणे जीवात्मस्वरुप । जाणूनियां बोध घ्यावा मनीं ॥६॥

२४
एकमेव ब्रह्मज्ञानें मुक्त जीव । नसे जीव-शिवभेद सत्य ॥१॥
स्थूल-सूक्ष्म मायामय देह दोन । तादात्म्यें बंधनकारक ते ॥२॥
ब्रह्मज्ञानें त्यांचा सुटतां संबंध । तुटे भवबंध तत्काळचि ॥३॥
ज्ञानलाभार्थ ते कवी थोर थोर । वर्णिती चरित्र ईश्वराचें ॥४॥
सत्यरुपें तया नसे जन्म कर्म । हितार्थ वर्णन करिती कवी ॥५॥
वासुदेव म्हणे सुटतां आसक्ति । नसे बंधशक्ति कर्मामाजी ॥६॥

२५
अलिप्तभावेंचि अकर्तृत्व तया । जन्म स्थिती लया असूनि मूळ ॥१॥
सर्वांतर्यामी तो असूनि स्वतंत्र । साक्षी सर्वकाळ अकर्ताचि ॥२॥
अभिनयमर्म रसिकासी ज्ञात । ईशमायाबोध ज्ञात्यांसी तैं ॥३॥
वासुदेव म्हणे ज्ञाता महा भक्त । श्रीकृष्णपदाब्जमिलिंद जो ॥४॥

२६
ऋषींलागीं सूत म्हणे तुम्ही धन्य । तराल श्रीकृष्ण कथामृतें ॥१॥
वेदाचें गव्हर शास्त्रांचें हें सार । भागवत थोर पुराण हें ॥२॥
सर्व मंगलांचें मंगल माहेर । जाणावें साचार वेदांसम ॥३॥
रचिलें व्यासांनीं जनउद्धारार्थ । प्रथम शुकास कथिलें प्रेमें ॥४॥
परीक्षितासी तें कथितां शुकानें । ऐकिलें भाग्यानें मीही तदा ॥५॥
यथामति तेंचि कथितों मी तुम्हां । गेले निजधामा भगवंत ॥६॥
कलीप्रादुर्भूत अज्ञानांधकार । भागवतसूर्य नाशील तो ॥७॥
वासुदेव म्हणे कली मत्त झाला । सद्भावें गोपाला गावें नित्य ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP